राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
वर्तमानात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व करणारे सरसंघचालक डॉ.
मोहनराव भागवत व संघाचे राजकीय अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व करणारे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही समवयस्क. दोघांचाही जन्म १९५० सालातला. दोघेही
प्रखर हिंदुत्वाचा वसा घेतलेले पण तेवढेच आधुनिक
विचारांचे सुधारणावादी नेते. यामुळेच की काय, दोघांच्याही
आचारात, विचारात कमालीचे साम्य पाहायला मिळते. या दोघांचे
सूर जुळल्यामुळेच, मोहनराव भागवतांनी संघाचे नेतृत्व करायला
सुरुवात केल्यापासून भाजपाने कात टाकली व २०१४ साली नरेंद्र मोदींच्या
नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचे पूर्ण बहुमतातील सरकार स्थापन झाले.
याआधी देखील अटल
बिहारी वाजपेयी हे ३ वेळा पंतप्रधान झाले होते पण त्यातील दोन वेळा ते सरकार
अल्पायुषी ठरले. अपवाद १९९९ च्या वाजपेयी सरकारचा,
जे संपूर्ण कार्यकाळ चालले. परंतु ते सरकारही युतीचे असल्यामुळे किमान समान
कार्यक्रमाच्या पलीकडे इतिहासावर छाप उमटेल व ‘संघाला
अपेक्षित’ असे निर्णय घेवू शकले नाही. युती वा आघाडीच्या
सरकारची ती अपरिहार्यता होती. परंतु २०१४ ते २०२४ पर्यंत
पूर्ण बहुमतातील व त्यानंतर २०२४ ला आलेले युतीचे पण स्थिर सरकार लाभल्याने मोहन
भागवतांच्या काळात ‘संघाला अपेक्षित’ असे अनेक कायदे मंजूर तर झालेच पण अनेक रखडलेली प्रकरणे कायम स्वरुपी निकाली
निघाली. या दृष्टीने सद्य सरसंघचालकांचा पायगुण चांगला
आहे असेच म्हणावे लागेल.
पूर्णवेळ
प्रचारक म्हणून मोहनरावांनी काम करायला सुरवात करताच
काही दिवसातच इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. अनेक संघस्वयंसेवकांची धरपकड
झाली. मोहनरावांच्या आई-वडिलांना
तुरुंगात जावे लागले. त्यावेळी अटक टाळण्यासाठी संघनेत्यांच्या आदेशावरून तरुण मोहनराव भूमिगत झाले व आणीबाणी संपेपर्यंत अनेक
ठिकाणी गुप्तपणे राहून त्यांनी संघकार्य सुरूच ठेवले. या १९ महिन्यांच्या भूमिगत
कालावधीत त्यांनी अनेक संघस्वयंसेवकांच्या कुटुंबांना मदत केली व आधार दिला.
“वंश टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जोडप्याने किमान ३ अपत्यांना जन्म दिला
पाहिजे” हे त्यांचे विधान याआधी अनेक मानववंशशास्त्रज्ञांनी
व्यक्त केले आहे व त्याला ऐतिहासिक पुरावा आहे. याचा अभ्यास न करता उथळ विरोधकांनी
त्याच्यावर टीका करणे जसे विरोधकांच्या अज्ञानाचे प्रतीक आहे तसेच ते त्यांच्या
कोत्या मनोवृत्तीचे लक्षण आहे.
मोहनराव अखंड हिंदुस्थानचे पुरस्कर्ते
आहेत. ‘फाळणीचे दुःख
तेव्हाच दूर होईल जेव्हा अखंड हिंदुस्थान निर्माण होईल’ तसेच ‘हिंदू धर्म हाच खरा धर्म आहे आणि इतर धर्म हे त्यातून उत्पन्न झालेले पंथ (उपासना पद्धती) आहेत’ हे ते कोणतेही आढेवेढे न
घेता सांगतात तेव्हा त्यांच्या विचारांची खोली स्पष्ट होते.
परंपरेला व मान्यतेला धक्का देणारे मोहनराव तृतीय पंथीयांच्या बाबतीत संवेदनशील आहेत. “तृतीयपंथी लोक या समाजाचा एक हिस्सा असून
इतर नागरिकांप्रमाणेच त्यांना सन्मानाने वागवले गेले पाहिजे”
आवाहन त्यांनी केले आहे. “तृतीयपंथी असणे यात अनैसर्गिक असे
काही नाही. जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत जैविक दृष्टिकोनातून तृतीयपंथी सुद्धा
मानवी जीवनाचा अविभाज्य घटक” आहे हे शाश्वत सत्य ते जगापुढे मांडतात.
मोहनराव चांगले गायक आहेत. संघगीतांना चाली लावून ती गाणे
हा त्यांचा छंद आहे. संगीताची आवड असलेल्या मोहनरावांना त्यात उत्तम गती आहे. ते
स्वतः सुंदर बासरी वाजवतात. त्यांच्या या संगीत प्रेमामुळे ते घोषावर विशेष लक्ष
देतात. घोषाला लागणाऱ्या विविध वाद्यांच्या निर्मितीत तसेच त्यांच्यात सुधारणा
करण्याच्या बाबतीत त्यांचे अधिक लक्ष असते.
मोहनरावांना प्रवासाची आवड आहे. सरसंघचालक या नात्याने
त्यांना दरवर्षी प्रत्येक प्रांतात किमान एकवेळा तरी प्रवास करावा लागतो. संघाच्या
वाढत्या प्रभावामुळे आज जगभर संघाबद्दल उत्सुकता व आकर्षण आहे. त्या दृष्टीने मोहनरावांना
जगभर प्रवास करावा लागतो. या प्रवासा दरम्यान हिंदू संस्कृती, सभ्यता, सांस्कृतिक
परंपरा व इतिहास यांचा प्रचार-प्रसार करता येतो व
हिंदुस्थानच्या महानतेची ओळख परदेशी नागरिकांना करून देण्याची संधी देखील प्राप्त
होते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खुप नवीन माहिती मिळाली
उत्तर द्याहटवाधन्यवाद. संघावर एकूण ५३ लेख लिहिणे अपेक्षीत आहेत. १५ प्रसिद्ध केले. यापुढे आठवड्याला २ असे प्रसिद्ध करेन
हटवाअशी माहिती देणे आवश्यक होते. उत्तम.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाछान लिहिलंय. सुंदर 🙏😊🙏
उत्तर द्याहटवा