राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 


सरसंघचालक

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक हे अत्युच्च्य पद आहे. संघाचे नेतृत्व करीत असताना त्याला दिशा देण्याचे व संघाची वैचारीक बैठक पक्की करण्याची जबाबदारी सरसंघचालकांची असते. एकदा निवड झाली की त्यानंतर सरसंघचालक पदी असलेली व्यक्ती आजीवन त्या पदावर राहते. परंतु कोणत्याही कारणास्तव सरसंघचालकांना जर असे वाटले की ते त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीचे वहन करू शकत नाहीत तर अश्या वेळी सरसंघचालक स्वतः त्या पदाहून पायउतार होवू शकतात.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापनाच मुळी प.पू. डॉ केशव बळीराम हेडगेवार यांनी केली असल्यामुळे संघाचे आद्य सरसंघचालक होण्याचा बहुमान नैसर्गिकपणे त्यांनाच मिळाला. डॉक्टरांच्या निधनानंतर त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्या नंतर प.पू. माधव सदाशिव गोळवलकर, जे गुरुजी या नावाने सुपरिचित आहेत, यांनी सरसंघचालक पदाची धुरा वहावी अशी ईच्छा प्रदर्शित केली. आद्य सरसंघचालकांच्या इच्छेचा सन्मान करत संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने गुरुजींची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक म्हणून निवड केली. सरसंघचालक निवडीची ही प्रथा, एक अपवाद वगळता, आजतागायत तशीच चालू आहे.


गुरुजींनंतर मधुकर उर्फ बाळासाहेब देवरस, प्रो. राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जूभैय्या, कृपाहल्ली सीतारमैया सुदर्शन उर्फ सुदर्शनजी व त्यानंतर वर्तमानात संघाच्या सरसंघचालक पदाची धुरा वाहणारे डॉ. मोहन  भागवत असे एकूण ६ सरसंघचालक संघाने   समाजाला दिले आहेत.


डॉ. केशव बळीराम हेडगेवारांनी संघाची स्थापना केली, संघाची दिशा ठरवली व संघाचा ढाचा तयार केला. गुरुजींनी संघाच्या विचारांची बैठक पक्की केली व चिंतनाच्या बळावर संघाला एक अधिष्ठान प्राप्त करुन दिले. त्यानंतर बाळासाहेब देवरसांच्या कालखंडात संघाची न भूतो अशी वाढ झाली. संघाचा विस्तार झाला. अनेक क्षेत्रात संघ स्वयंसेवकांच्या कार्याचे दृश परिणाम समाजापर्यंत पोहोचू लागले. त्यामुळे डॉक्टर, गुरुजी व बाळासाहेब हे संघाची त्रिमूर्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू, महेश आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.


सरसंघचालकांच्या नियुक्तीसंदर्भात, वर सांगितल्याप्रमाणे एक अपवाद झाला. बाळासाहेब देवरसांनी, प्रकृती अस्वास्थ्यतेमुळे सरसंघचालकपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली व त्यांनी आपल्या हयातीतच प्रो. राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जूभैय्या यांची सरसंघचालक म्हणुन निवड केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षाच्या या दीर्घ कालखंडात केवळ ६ महानुभावांना सरसंघचालक हे पद मिळाले आहे यावरून या पदाचे महत्त्व, त्या व्यक्तीत असलेले गुण आणि संघात त्या व्यक्तीबाबत असलेली परकोटीची आदर भावना याची कल्पना येते. संघाच्या घटनेत जरी उल्लेख नसला तरीही आजपर्यंतचे सर्व सरसंघचालक हे अविवाहित होते/आहेत हा निश्चितच योगायोग नसावा. परंतु देशकार्यासाठी संपूर्ण जीवन वाहून देण्यासाठी इतर कोणतीही जबाबदारी , मोह, माया, पाश नकोत ज्याजेणे निरपेक्ष भावनेने, स्थितप्रज्ञ वृत्तीने, निश्चल मनाने ही जबाबदारी पार पाडता येईल अशी धारणा असावी.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अगदी सुरुवातीला प्रार्थनेच्या वेळी समर्थ रामदास स्वामींचा जयजयकार केला जात असे. समर्थ रामदास स्वामींनी घेतलेली अखंड ब्रह्मचर्याची शपथ व त्यानंतर बलसंवर्धनातून राष्ट्ररक्षणासाठी त्यांनी उभारलेली युवकांची फळी यावरून आद्य सरसंघचालकांनी समर्थ रामदास स्वामींकडून ब्रम्हचर्य राखण्याची प्रेरणा घेतली असावी असा कयास बांधता येतो.

 

(संघाचे राजकीय अपत्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचे आजपर्यंत झालेले दोन्ही पंतप्रधान त्या अर्थाने कौटुंबिक जबाबदारीपासून मुक्त आहेत हेही येथे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण? याचाही अंदाज लावायचाच असेल तर लावता येतो.)

 

डॉ. केशव बळीराम हेडगेवारांचा सरसंघचालक म्हणुनचा कालखंड १९२५ ते १९४० हा होता तर गोळवलकर गुरुजींना १९४० ते १९७३ हा ३३ वर्षांचा प्रदिर्घ कालखंड मिळाला. बाळासाहेब देवरस हे १९७३ ते १९९४ या काळात सरसंघचालक म्हणून काम पहात होते तर १९९४ ते २००० हा सर्वात कमी वेळ रज्जूभैय्याना मिळाला. सुदर्शनजींच्या २००० ते २००९ या काळादरम्यानच्या कारकीर्दीनंतर डॉ॰ मोहनराव भागवत हे आजगायत सरसंघचालक पदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

 

सर्व सरसंघचालक हे उच्चशिक्षित होते. आद्य सरसंघचालक डॉ केशव बळीराम हेडगेवार हे डॉक्टर होते तर द्वितीय सरसंघचालक माधवराव गोळवलकर गुरुजी हे एमएससी , एलएलबी चे शिक्षण पूर्ण झाल्यावर प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस हे प्रथितयश वकील होते तर चौथे सरसंघचालक राजेंद्र सिंह जी (रज्जू भैया) हे भौतिक विषयात एमएससी होते व पेशाने प्राध्यापक होते. त्यांच्यानंतर झालेले सरसंघचालक के सुदर्शन जी अभियंता होते तर वर्तमान सरसंघचालक डॉ मोहन जी भागवत हे पेशाने पशुवैद्य आहेत. डॉक्टर हेडगेवार जरी नागपूरचे असले तरी गोळवलकर गुरुजी हे मूळचे इंदूरचे. बाळासाहेब देवरस हे मूळचे तत्कालीन आंध्र प्रदेशातील. रज्जूभैय्या उत्तरेकडील तर सुदर्शन जी दाक्षिणात्य. वर्तमान सरसंघचालक जरी महाराष्ट्रीयन असले तरी संघामधे कोण कोणत्या प्रांतातला याला काहीही महत्त्व नसल्यामुळे अनेक भाषिक व प्रांतिक स्वयंसेवकांना सरसंघचालक पदाची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वैशिष्ठ हे की वर उल्लेखिलेल्या सर्व ६ सरसंघचालकांचा एकमेकांशी कोणताही नातेसंबंध नाही. आणि असलाच तर एकाच भारतमातेची लेकरे असल्याने तयार झालेला बंधुभाव. हिंदू सारे बंधू हा भ्रातृभाव. वर उल्लेखिलेल्या सर्व सरसंघचालकांची प्रकृती जरी वेगवेगळी असली तरी त्यांची विचारधारा, उद्दिष्ट व समर्पणाची भावना मात्र सारखीच होती/आहे.



या समानतेच्या जोडीलाच सर्व सरसंघचालक हे उच्चशिक्षित तर होतेच पण त्यांची राहणी अतिशय साधी व सात्विक. स्वयंसेवकांना स्फुरण चढेल अशी वकृत्वशैली हे सर्व सरसंघचालकांचे वैशिष्ठ. चौफेर वाचन व प्रवास हा सर्व सरसंघचालकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक. याला कोणीही अपवाद नाही. प्रचंड लोकसंग्रह व रत्नपारखी नजर यामुळे या सर्वांच्याच काळात संघ विस्तार झाला. संघावर आलेली संकटे निर्धाराने परतवून लावण्याची शक्ती यांच्यात होतीच पण त्याबरोबर राष्ट्र वा समाजावर आलेल्या संकटाला संघ स्वयंसेवकांना सोबत घेवून भिडण्याची वृत्ती देखील होती. संघाच्या या सर्व ६ सरसंघचालकांविषयी अधिक माहिती व त्यांचे गुणविशेष यापुढील भागात मी सादर करण्याचा प्रयत्न करेन.


 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा