राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 


मोपल्यांचे दंगे : हिंदूंचा नरसंहार

 



खिलाफत चळवळीच्या पार्श्वभूमीवर मोपल्यांचे दंगे अभ्यासणे गरजेचे आहे. मोपल्यांचे दंगे हा उठाव किंवा बंड नसून मलबारमधील अल्पसंख्यांक हिंदूंचा बहुसंख्याक मुस्लिमांनी केलेला नरसंहार आहे. त्याला कुठे बंड तर कुठे उठाव अशी विशेषणे लावून त्याचे उदात्तीकरण करणे जेवढे चुकीचे आहे तेवढेच ते इतिहासाशी प्रतारणा करण्याजोगे आहे. इतिहासाचा मागोवा घेताना हे लक्षात येत की मोपल्यांच्या या छळाची व नरसंहार करण्याच्या वृत्तीची सुरुवात खूप आधीपासून, म्हणजे १८३६ सालापासूनच झाली होती. दंगेखोर, हिंसक व धर्मांध मोपले जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा लहान मोठे दंगे घडवून हिंदूंना एकतर ठार मारायचे किंवा त्यांची लूट करायचे. हा क्रम १९१९ पर्यंत अथक चालूच होता. त्याचा हिंदूंवरील सर्वात मोठा, संघटीत व नियोजनबद्ध हल्ला हा काँग्रेसने खिलाफत चळवळीला पाठिंबा दिल्यानंतर झाला. म्हणूनच मोपल्यांचे दंगे हे खिलाफत चळवळीचे अनौरस अपत्य आहे असे म्हटले तर ते अधिक न्याय्य होईल, योग्य ठरेल.

 

एकीकडे मुस्लिमधार्जिणी देशबाह्य खिलाफत चळवळ मुस्लिम समुदायात जोर पकडत होती तर दुसरीकडे भोळसट हिंदू, गांधीजींच्या असहकार आंदोलनात, (जे की खिलाफत चळवळीला हिंदूंकडून बळ मिळावे म्हणून सुरु झाले) सहभागी झाल्यामुळे गाफील होते.  याच सुमारास तिकडे केरळच्या मुस्लिमबहुल मलबार भागात दोन चिंताजनक घटना घडल्या. एकीकडे मुस्लीम शेतकरी विरुद्ध हिंदू जमीनदार असा वाद सुरू झाला तर दुसरीकडे अरबस्तानातील कडव्या पुनरुत्थानवादी, जिहादी, सकल इस्लामवादी, वहाबी विचारांचा पगडा तेथील मुस्लीम शेतकऱ्यांवर (ज्यांना मोपले म्हणत) बसू लागला. थोड्याश्या आर्थिक पण प्रामुख्याने धार्मिक कारणांवरून मुस्लिम व मुस्लीमेतर असा धार्मिक संघर्ष उद्‌भवला गेला. परिणामी मोपल्यांमध्ये पुनरुत्थानवादी कडव्या वहाबी विचारांची पकड अधिकच घट्ट झाली. वहावी उद्दिष्टे प्रत्यक्षात आणण्यासाठी १९१९ साली मोठ्या प्रमाणावर हिंसा करून एका तालुक्यात वहाबी अंमल स्थापण्याचाही मोपल्यांकडून प्रयत्न झाला पण तो ब्रिटिश सरकारने लगेचच हाणून पाडला. त्यानंतर वर्षभरातच गांधीजींनी खिलाफत आंदोलनाला आपला व काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे मलबारमध्ये भडकाऊ व जहाल भाषण करणाऱ्या वहाबी मुल्ला मौलवींना मोकळे रान मिळाले, मुस्लिम समाजात अफाट लोकप्रियता मिळाली व त्यातुनच त्यांच्या धर्मयुद्धाच्या भडक प्रचाराला विखारी धार आली. बघता बघता मुळात ब्रिटिशांविरोधात आहे असे भासविणारे मोपले काफीर हिंदूंविरोधात सशस्त्र एकवटले.

 

१९१९ सालचा वहाबी अंमल स्थापण्याचा मोपल्यांचा प्रयत्न फसल्यानंतरही त्यांनी चिकाटी न सोडता १९२१ च्या ऑगस्ट महिन्यात मलबारमधे मोठ्या प्रमाणावर निशस्त्र हिंदूंविरोधात दंगे, खून, लुटालूट व स्थानिक हिंदूंच्या जबरदस्तीने धर्मांतराचे निंद्य प्रकार केले. यात कित्येक हजार हिंदू महिला, पुरुष व निरपराध बालके ठार झाली. लाखो हिंदूंनी मलबारहून इतरत्र पलायन केले. काही हजार महिलांवर बलात्कार, अत्याचार झाले. हिंदूंची करोडो रुपयांची संपत्ती लुटली गेली. मंदिरे तोडण्यात आली व त्यांच्या जागी मशिदी बांधण्यात आल्या. हिंदूंच्या घरादारावर व जमिनीवर मुस्लिमांनी बळजबरीने कब्जा मिळवला. क्रूरतेची व अत्याचाराची परिसीमा गाठत गरोदर स्त्रियांनाही तलवारीने ठार करण्यात आले. वरवर पाहता हे दंगे ब्रिटीश सरकारविरुद्ध आहेत असे जरी भासविण्यात आले असले तरी त्याचे खरे रूप धार्मिक होते. अखेर हे दंगे पुन्हा एकदा ब्रिटिश सरकारने लष्कराकरवी मोडून काढले खरे पण या दंग्यांमुळे हिंदूंच्या हृदयात कधीही न भरून येणारी जखम कायमची ठसठसत राहिली.

 

मोपल्यांचे हिंसाचार आणि अत्याचार यांचा खिलाफत आंदोलनाशी काहीही संबंध नाही असे जरी काँग्रेस व खिलाफत नेत्यांनी जाहीर केले, तरी या गोष्टीचा साधा निषेध करण्याचे धैर्यही काँग्रेस नेत्यांना झाले नाही. मोपल्यांच्या या दंग्याविरोधात एकही , एका ओळीचाही, ठराव काँग्रेसने पारित केला नाही. खुद्द गांधीजींनी ‘माझे मुस्लिम बांधव वेडे झाले आहेत’ अश्या सौम्य शब्दात हा प्रश्न निकालात काढला. खिलाफत नेत्यांनी तर या हिंसाचारी कृत्यांचे अप्रत्यक्षतः समर्थनच केले. काँग्रेसच्या या धोरणाची देशभर तीव्र प्रतिक्रया उमटली. खिलाफत आंदोलनाला मदत करून हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्याचे गांधीजींचे बालिश स्वप्न यामुळे धुळीला मिळाले.

 

डॉ. अ‍ॅनी बेझंट यांनी या इस्लामिक धर्मांधांवर जोरदार टीका केली. त्यात त्या म्हणाल्या ‘इस्लामिक राजवट भारतात आणि भारतातील लोकांना काय करू शकते हे आपल्याला मलबार प्रसंगातून दिसले आहे. असे कुठेही घडू नये याची पूर्णपणे काळजी घ्यावी आणि अश्या धर्मांध लोकांना वेळेस शिक्षा देण्यात यावी’.

 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या पुस्तकात ते म्हणतात की  ‘मलबारमधील मोपल्यांनी हिंदूंवर अनन्वित असे रक्तरंजित अत्याचार केले. संपूर्ण दक्षिण भारतात हिंदूंमध्ये एक भयंकर भीतीची लाट पसरली होती. जेव्हा काही खिलाफत नेते मोपल्यांच्या फायद्यासाठी चालवलेल्या धर्माच्या लढ्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचे ठराव पास करण्याइतके भरकटले होते तेव्हा ती लाट अधिक तीव्र झाली होती. हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी ही फार मोठी किंमत आहे असे कोणीही म्हणू शकले असते. पण गांधीजींना हिंदू-मुस्लिम ऐक्य प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेने एवढे वेड लागले होते की ते मोपल्यांच्या खून, लुटालूट , धर्मांतर, महिलांवर बलात्कार आदि निंद्य कृत्यांवर पडदा टाकण्यासही तयार झाले. एकीकडे मोपल्यांचे आणि खिलाफतांचे अभिनंदन केले जात होते तर दुसरीकडे मोपला ज्याला धर्म मानतात आणि ज्याला ते धार्मिक मानतात त्या पद्धतीने ते लढत होते अशी सारवासारव करून त्यांना शूर-पापभीरू म्हणून गांधीजी गौरवत होते.


मुल्लामौलवींच्या तब्लीग आणि तंजीम (धर्मप्रसार आणि संघटना) या कडव्या धोरणाची प्रतिक्रिया म्हणून हिंदूंची संघटन व स्वामी श्रद्धानंदांच शुद्धी आंदोलन सुरू झाल पण त्यानंतर अब्दुल  राशीद खान नावाच्या धर्मांध मुस्लिम अतिरेक्याने स्वामी श्रद्धानंदांची हत्या केली. या घटनेवर भाष्य करताना गांधीजींनी अब्दुल राशीद खानला ‘भाई’ असे संबोधले एवढेच नव्हे तर या हत्तेला अब्दुल राशीद खान नव्हे तर हिंदू व मुस्लिमात तेढ लावणारे जबाबदार आहेत असे बोलून अप्रत्यक्षपणे स्वामी श्रद्धानंदांनी सुरू केलेल्या शुद्धीकार्यामुळे ही घटना घडली असे दर्शविले. थोडक्यात स्वामी श्रद्धानंदाच्या हत्येला स्वतः श्रद्धानंदच जबाबदार आहेत असा एकतर्फी निकाल देवून टाकला.


मोपल्यांच्या दंग्यांमुळे त्या दशकात देशात अभूतपूर्व अशा जातीय दंगलीचे वातावरण उत्पन्न झाले. हिंदू बहुसंख्याक असूनही हिंदूंच्या देशात हिंदूच सुरक्षित नाहीत ही भावना प्रबळ झाली. अशा वातावरणात डॉ केशव बळीराम हेडगेवार यांच्यासारख्या द्रष्ट्याला संघासारखी हिंदूंची संगठना उभी करावी असे वाटावे यात नवल ते काय?

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा