राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
मधुकर दत्तात्रेय उपाख्य बाळासाहेब देवरस
बाळासाहेबांचा जन्म ११ डिसेंबर १९१५ रोजी नागपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील महसूल खात्यात नोकरीला होते. नागपूरच्या
इतवारीत देवरस कुटुंबाचे निवास स्थान आणि
गोंदियाजवळ कारंजा गावात वडिलोपार्जित शेती होती.
बीए. एलएलबी पर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. लहानपणापासूनच संघस्वयंसेवक म्हणून
संघात प्रवेश केलेल्या बाळासाहेबांना डॉक्टरांच्या व गुरुजींच्या प्रत्यक्ष
सहवासाचा लाभ झाला. त्यांच्यावर डॉक्टरांचे व गुरुजींचे संस्कार झाले. त्यामुळे
त्यांच्यात एक आदर्श ‘संघानुकूल’ स्वयंसेवक घडत गेला.
गुरुजींच्या प्रेरणेने १९५० साली त्यांनी
‘श्रीनरकेसरी प्रकाशन ट्रस्ट’ स्थापन करून मराठी दैनिक ‘तरुण भारत’ चालविण्याची
जबाबदारी घेतली. ते स्वतः या ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यानंतरच देशात ‘संघविचार म्हणजेच राष्ट्रविचार’ जनमानसात पोहचविण्याच्या उद्देश्याने विविध दैनिके, साप्ताहिके प्रकाशित होण्यास सुरुवात झाली. संघशाखा अधिक
समाजोन्भिमुख करण्याकडे त्यांचे लक्ष असे. प्रत्येक शाखेने एक तरी वस्ती दत्तक
घ्यावी व तेथे समाजोपयोगी
कार्य करावे असे ते सांगत. याचा उपयोग असा झाला की
शाखेशेजारील वाडीवस्त्यात सुरू असलेल्या समाजोपयोगी कामांचा दृश्य परिणाम लोकांना
जाणवू लागला व शाखेत येणाऱ्या स्वयंसेवकांची संख्या झपाट्याने वाढू लागली.
सर्वांनाच माहीत आहे की संघाच्या ९९ वर्षाच्या
ईतिहासात ३ मोठी संकटे आली. १९४८ च्या गांधीहत्येशी संघाचा जाणूनबुजून संबंध जोडला
गेला बंदी आणण्यात आली. तो गुरुजींच्या नेतृत्वाच्या कसोटीचा काळ होता. गुरुजी व संघ त्यातून
सोन्याहून लख्ख उजळून निघाले. तसाच दुसरा काळ हा १९७५ ते १९७७ च्या काळ्याकुट्ट
आणीबाणीचा होता. सरसंघचालक ते देशभरातील सामान्य स्वयंसेवक हे सारेच
जेव्हा इंदिरा गांधींच्या इशाऱ्याने तुरुंगात डांबले गेले होते तेव्हा संघाचे
धीरोदत्त नेतृत्त्व करुन, आणीबाणी विरुद्ध निकराचा लढा देवून, इंदिरा गांधींना पराभूत करुन भारताला
पुन्हा एकदा लोकशाही बहाल करण्याचे ऐतिहासिक काम बाळासाहेब देवरसांनी केले.
आणीबाणीच्या काळात तुरुंगवासात असताना बाळासाहेबांचे
विरुद्ध विचारसरणीच्या अनेक नेत्यांशी संबंध आले. वैचारीक देवाणघेवाण झाली. या
विचारमंथनातून बाळासाहेबांनी अनेक नवे मित्र जोडले. संघाबद्दलचे गैरसमज दूर
करण्यात ते यशस्वी ठरले. त्यामुळेच नंतरच्या काळात भाजपाला जॉर्ज फर्नांडिस सारखा एक कट्टर डावा
मित्र मिळाला. याच काळात त्यांची
अनेक मुस्लीम नेत्यांशी संघाबद्दल चर्चा होत असे. पुढे बंदी उठविण्यात आल्यानंतर
संघ आणि मुस्लीम नेत्यांमध्ये संवाद सुरू झाला. या संवादातून मुस्लीम समाजातील संघाबद्दलचे गैरसमज दूर करण्यास मदत
झाली. संघात मुस्लीम युवक सहभागी होऊ लागले. माजी न्यायमूर्ती महम्मद करीम
छागलासारखे मुसलमान “मी वंशाने हिंदू व धर्माने मुस्लीम आहे” असे उघडपणे बोलू लागले. बाळासाहेबांच्या नागरी
सत्कार कार्यक्रमात तर त्यांनी अध्यक्षस्थान ही भुषविले होते.
बाळासाहेबांच्या कार्यकाळात त्यांनी २ वेळा संघबंदीचा
यशस्वी सामना केला व दोन्ही वेळा संघ पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झाला. असे म्हणतात
की काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव यांचा बाबरी
मशिदीचा विवादित ढांचा पाडण्यास अप्रत्यक्षरित्या पाठिंबा होता. त्यामुळे
त्यांच्या काळात संघावर १० डिसेंबर १९९२ रोजी घातलेली बंदी ही केवळ राजकीय
अपरिहार्यतेमुळे घालण्यात आली होती. अल्पमतातील सरकार चालवताना आघाडीतील मुलायम
सिंह व लालू प्रसाद यादव यांच्या दबावाखाली किंवा दुसऱ्या भाषेत त्यांचा राग काही
प्रमाणात शांत करण्यासाठी नरसिंहरावांनी हा निर्णय घेतला असावा. परंतु या तिसऱ्या
संघबंदीची आधीच्या दोन बंदींप्रमाणे कठोर अंमलबजावणी करण्यात आली नव्हती व केवळ ६
महिन्यातच ४ जून १९९३ रोजी ती विनाअट उठवण्यात आली. त्यामुळेच की काय, बहुतेक जणांना संघावरील पहिल्या २ संघबंदीच
फक्त लक्षात आहेत व त्यामानाने अगदी अलीकडच्या काळात घातली गेलेली तिसरी संघबंदी विशेष
चर्चेत राहिली नाही.
‘‘या देशातील मुस्लीम व ख्रिश्चन हे बाहेरून आले नाहीत, ते इथलेच आहेत. काही पिढ्यांपूर्वी त्यांनी उपासना पद्धती बदलली असेल,
पण त्यामुळे त्यांचे पूर्वज, संस्कृती आणि
मातृभूमी बदलत नाही’’ हे विचार बाळासाहेब सार्वजनिकरित्या मांडत असत. भारतीय मुस्लिमांना जर हे सत्य समजले, तर ‘भारत विश्वगुरु बनू शकतो’ असे बाळासाहेबांचे मत होते. या दूरदृष्टीने
त्यांनी मुस्लिमांशी संवाद साधत त्यांना देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात
आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.
नागपूरला विश्व हिंदू परिषदेच्या धर्मसंसदेत जमलेल्या
शंकराचार्य, महामंडलेश्वर,
संत आणि साधू-महात्मे अशा धर्माचार्यांनी ‘यति सम्राट’ पदवीने
बाळासाहेब देवरस यांचा गौरव केला. १९९६ साली १३ दिवसांचे का होईना, पण संघस्वयंसेवक अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचे
सरकार सत्तेवर आले, त्यावेळी बाळासाहेब शारिरीक दृष्ट्या ठीक नव्हते पण अटलजींच्या
शपथग्रहण समारंभाचे दृश्य दूरचित्रवाणीवर पाहताना त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच समाधानाचे तेज पसरले असेल. बाळासाहेब देवरस नावाच्या एका सामाजिक
योद्ध्याच्या जीवनातील तो एक सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. त्यानंतर
काहीच दिवसांनी १७ जून १९९६ ला ते नश्वर देहाचा त्याग करून अनंतात विलीन झाले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा