संघाचा गुरु : भगवा ध्वज
‘गुरु बिन ज्ञान न उपजै,
गुरु बिन मिलै न मोष.
गुरु बिन लखै न सत्य को,
गुरु बिन मैटैं न दोष’.
कबीराच्या या दोह्यात
गुरूचे महात्म्य अतिशय कमी शब्दात पण यथार्थ रीतीने वर्णित केले आहे. व्यक्ती असो वा संस्था, मार्गदर्शनासाठी गुरु हा
लागतोच लागतो. सृष्टीचा निर्माता ब्रम्हा, पालनकर्ता विष्णु व
लयकर्ता महेश यांचे एकत्रित रूप, अत्री कुलोत्पन्न व माता अनुसूयेचा पुत्र दत्तात्रेय यांना ‘गुरूंचे गुरु’ असे संबोधले जाते. त्या
दत्तात्रयांना देखील २४ गुरु होते असा पुराणात उल्लेख आहे. यावरून भारतीय
संस्कृतीत गुरूंचे महत्व अधोरेखित होते.
प्रत्यक्ष परमेश्वर
असलेल्या व जगाला गीतेद्वारे ज्ञान देणाऱ्या श्रीकृष्णाला सांदिपनी ऋषींना गुरु
मानून, त्यांच्या आश्रमात राहून शिक्षण घ्यावे लागले होते तर
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला वशिष्ठ ऋषींना शरण जावून, त्यांना गुरु मानून, ज्ञान प्राप्त करावे
लागले. गुरूच्या श्रेष्ठतेची असंख्य उदाहरणे आपल्या संस्कृतीत आहेत. एवढेच नव्हे
तर गुरुआज्ञा ही अंतिम असून मातृआज्ञा, पितृआज्ञा वा राजाज्ञा पेक्षाही
गुरुआज्ञा सर्व श्रेष्ठ आहे असे आपले धर्मग्रंथ सांगतात.
गुरु हा आपला
आदर्श व आपल्यासाठी ‘ज्ञानाचा स्रोत’ असतो. आधुनिक
काळातील गुरु हा ‘विश्वकोष’ असतो. गुरु
आपल्यासाठी सतत दिशा दाखविणारे ‘होकयंत्र’ तर अडचणीच्या
काळात मार्गदर्शन करणारा व अंधारातही प्रकाश देणारा ‘दीपस्तंभ’ असतो. चुकांना पोटात
घालणारा व संकटात धावून येणारा गुरु हा आपला कधी ‘सखा’ असतो, तर कधी मदतीला
धावून येणारा ‘सवंगडी’ देखील असतो. तो कधी पित्याहून पवित्र अशा ‘कुलदैवताच्या’ स्वरूपात भेटतो तर कधी
मातेहून मायाळू अशा ‘इष्टदेवतेच्या’ रूपात प्रकट होतो.
मायेची फुंकर घालणाऱ्या ‘बहिणीसारखा’ तो आपला सांभाळ करतो तर ‘वडील भावाप्रमाणे’ सदैव पाठीशी उभा राहतो. म्हणून आपण
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,
गुरु देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरुवे नमः
अशी प्रार्थना म्हणत गुरूंच्या श्रेष्ठतेला वंदन करीत
असतो.
मनुष्य हा स्खलनशील असतो.
कित्येक वेळा कळत-नकळत त्याच्या हातून चुका होवू शकतात, प्रमाद घडू शकतात, अपराध होवू शकतात. जाणते-अजाणतेपणे त्याच्याकडून इतर व्यक्ती दुखावल्या जावू शकतात, चुकीचे निर्णय घेतले जावू
शकतात किंवा स्वार्थ आड येवून, अप-पर भाव जागृत होवून, कोणाच्या बाबतीत ममत्व
तर कोणाच्या बाबतीत द्वेष भावना उत्पन्न होवून न्यायोचित वर्तन न घडण्याची शक्यता
असते. मानवी स्वभावाचे व्ययछेधक लक्षण असलेले काम क्रोध लोभ मोह मद व
मत्सर हे षड्रिपू कधी एखाद्याचा घात करतील
याची काहीच खात्री नसते. आजच्या युगात तर याचे दाखले
तर पदोपदी मिळतात. पण आपल्या पोथी-पुराणात तसेच रामायण-महाभारता सारख्या अनेक
ग्रंथातही थोरा-मोठ्या लोकांच्या स्खलनाच्या गोष्टी आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. अगदी
विश्वामित्रासारखे ऋषी सुद्धा याला अपवाद नव्हते. त्यांना मेनकेचा मोह टाळला आला
नाही. तर रामायणात माता सीतेलाही सुवर्णमृगाचा मोह टाळला आला नाही. त्यामुळेच रामायण घडले. मानवी स्वभावाच्या या
मर्यादा अचूक ओळखून संघाच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या दूरदर्शी आद्य
सरसंघचालकांनी अनेक दिवसांच्या चिंतनानंतर संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून
त्याला वंदन करण्यास सुरुवात केली.
खरे पाहता हिंदूंची
संगठना म्हणून देवाधिदेव
भोलेनाथ शंकर, मर्यादा
पुरुषोत्तम श्रीराम, ‘अहम ब्रम्हस्मी’ अशी घोषणा करून
अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणारे भगवान श्रीकृष्ण, पार्वतीपुत्र व बुद्धीची
देवता गणाधीश गणपती यांच्यासारखे देव
अथवा शक्तीची देवता उमा पार्वती तथा अंबा माता, १६ विद्या व ६४
कलांची देवता माता सरस्वती, वैभवाची देवता
असलेली माता लक्ष्मी सारख्या देव-देवता, साऱ्या भारताला पूजनीय असलेले हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी
महाराज किंवा धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यापैकी कोणालाही
संघाच्या गुरुस्थानी मानण्यास कोणतीच अडचण नव्हती व तसा निर्णय झाला असता तर त्यात
गैर असे काहीही नव्हते.
एवढेच कशाला, ज्याप्रमाणे शीख धर्मात
गुरु ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथाला गुरुस्थान अर्पित करण्यात आले आहे त्याच
परंपरेने चार वेद, भगवतगीता, रामायण अथवा महाभारत यासारख्या हिंदू धर्मातील कोणत्याही
पवित्र ग्रंथाला गुरुस्थानी मानले गेले असते तरी त्याला मान्यता मिळाली असती.
परंतु एवढे सारे पर्याय उपलब्ध असतानाही संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थान अर्पित
करणे हे संघ नेतृत्वाच्या दूरदृष्टीचाच नव्हे तर प्रचंड मोठ्या बौद्धिक
क्षमतेचा परिचय आहे.
भगवा ध्वज हा भारताच्या
ऐतिहासिक आणि प्राचीन सांस्कृतीचे प्रतीक आहे. भगवा ध्वज हा हिंदू आणि बौद्धांच्या
पूजनीय प्रतीकांपैकी एक आहे. भगवा रंग त्याग, ज्ञान, पवित्रता आणि सेवा यांचे
प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा
म्हणजेच मराठा साम्राज्याचा ध्वज भगवा होता. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन
यांच्या रथांवर भगवा ध्वज फडकवण्यात येत असे. सर्व हिंदू मंदिरांच्या कळसावर हा ध्वज फडकवला जातो. सनातन
हिंदू धर्माचे धर्मगुरू आद्य शंकराचार्य देखील भगव्या ध्वजाला सदैव आपल्या सोबत ठेवत व त्याला धर्मदंडा एवढाच सन्मान देत.
भगवा रंग हा वैराग्याचे व विरक्तीचे
प्रतीक आहे. म्हणूनच हिंदू आणि बौद्ध साधू-संत भगवी वस्त्रे परिधान करतात. मुघलांच्या
आक्रमणाच्या वेळी, जेव्हा आपला पराभव होत आहे हे लक्षात यायचे त्यावेळी आपली अब्रू वाचविण्यासाठी
राजपूत स्त्रिया त्यागाचे प्रतीक असलेली केसरी म्हणजेच भगवी वस्त्रे परिधान
करून अग्नी समर्पण करीत. आधुनिक शास्त्रात हे सिद्ध झाले आहे की भगवा रंग हा अगदी कमी प्रकाशात व ज्यावेळी
दृश्यमानता अतिशय कमी असते त्यावेळीही चटकन उठून दिसतो. रात्री-अपरात्री यात्रा करत असताना
हातात असलेल्या भगव्या ध्वजामुळे व भगव्या वस्त्रामुळे साधुसंत सहजच ओळखू येतात. आपण पाहिले असेलच की रेल्वे व रस्त्यावर काम करणारे अभियंते व कर्मचारी
भगव्या रंगाचे जॅकेट घालतात. त्यामुळे त्यांच्याजवळ येणाऱ्या वाहनांना अंधुक प्रकाशातही ते चटकन दिसू
शकतात.
भगवा ध्वज पवित्र अशा
अग्नीच्या ज्वालांचा आहे. हा रंग उगवत्या सूर्याचा आहे. सर्व शक्तिमान रामभक्त
हनुमानाला आवडणाऱ्या शेंदूरचा रंग भगवा आहे. हिंदूंच्या व हिंदुस्थानच्या
अस्मितेचे प्रतीक व हिंदू राज्यांच्या अद्वितीय पराक्रमाच्या इतिहासाचा भगवा ध्वज
हा साक्षीदार आहे. म्हणूनच की काय राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाने भगव्या ध्वजाला आपला गुरु मानला आहे. संघाच्या प्रत्येक शाखेत
प्रतीदिनी भगव्या ध्वजाचे सन्मानाने आरोहण व अवरोहण केले जाते. ध्वजाला सामूहिक प्रणाम
करून संघ प्रार्थना म्हटली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगव्या ध्वजाचे पूजन करून
संघ स्वयंसेवक आपापल्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा अर्पण करतात. माझ्या माहितीप्रमाणे
ध्वजाला गुरु मानणारी संघ ही एकमेव संघटना असावी. संघाच्या अनेक एकमेवाद्वितीय
बाबींमधील गुरुस्थानी असलेला भगवा ध्वज ही एक बाब असावी यात शंका नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा