राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 


कुप्पाहल्ली सीतारामैया सुदर्शन

 



या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे चतुर्थ सरसंघचालक रज्जूभैय्या यांनी प्रकृतीच्या कारणावरून सरसंघचालक पदावरून निवृत्त होण्याची ईच्छा प्रकट केली. त्यावेळी हो.वे.शेषाद्री हे सरकार्यवाह होते. असे म्हणतात की राज्जुभैय्यांची ईच्छा होती की शेषाद्री यांनी आपल्यानंतर सरसंघचालक पदाची धुरा वाहावी. पण त्यावेळी त्यांचीही तब्येत ठीक नसल्याने त्यांनी ही मोठी जबाबदारी विनम्रपणे नाकारली. त्यानंत जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी संगठनेचे पाचवे सरसंघचालक म्हणून सुदर्शनजींची निवड झाली.


मूळचे कर्नाटकातील कुप्पाहल्ली या गावचे असलेले संघाचे पाचवे सरसंघचालक कुप्पाहल्ली सीतारामैया सुदर्शन यांचा जन्म १८ जुन १९३१ ला छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे झाला. त्यांचे वडील सीतारामैया तत्कालीन मध्यप्रदेशच्या वन विभागात कार्यरत होते. त्यांना तीन भाऊ व दोन बहिणी होत्या. अवघ्या ९ व्या वर्षी संघशाखेत जाण्यास सुरुवात करणारे सुदर्शनजी १९५४ साली संघाचे पूर्णकालीन प्रचारक बनले. प्रगल्भ बुधिमत्तेचा वारसा मिळालेल्या सुदर्शनजी यांनी त्यादरम्यान आपले शिक्षण पूर्ण करून जबलपूर विश्वविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली व २०१२ साली रायपूर येथेच त्यांचे निधन होईपर्यंत सुमारे ५८ वर्षे ते संघवाढीसाठी चंदनाप्रमाणे झिजले.

 

पूर्णकालीन प्रचारक म्हणून संघकार्याला सुरुवात केल्यानंतर सरसंघचालक पदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी सुदर्शनजींनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. विशेष म्हणजे सुदर्शनजी वेगवेगळ्या कार्यकाळात संघाचे बौद्धिक प्रमुख व शारीरिक प्रमुख म्हणूनही कार्यरत होते. हा एक दुर्मिळ योगायोग होता. अनेक जेष्ठ संघस्वयंसेवकांनी संघाचे कार्य पूर्वोत्तर भारतात रुजवले, वाढविले व फुलविले. सुदर्शनजींनी देखील अनेक वर्षे पूर्वोत्तर भारतात संघकार्य करून त्या भागाला राष्ट्राच्या मूलप्रवाहात आणण्यासाठी आपले योगदान दिले.


सुदर्शनजी स्वदेशीचे कट्टर पुरस्कर्ते होते. स्वदेशीच्या पुरस्काराने रोजगार वाढीस, विशेषता महिलांच्या रोजगार वाढीस चालना मिळेल, पर्यावरणपूरक अर्थव्यवस्था उभी राहील, देश आत्मनिर्भर बनेल व ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होईल यावर ते ठाम होते. आपली मते ते निर्भीडपणे मांडीत. हिंदुत्ववाद रोखठोक भाषेत व अधिक आक्रमक पद्धतीने मांडण्यात ते मुळीच संकोच करीत नसत. त्यांच्या कार्यकाळात भाजपा प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार असताना त्यावरही टीका करताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. राजकारणात नव्या नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे यासाठी ते आग्रही होते. स्वतः इंजीनियर असलेल्या सुदर्शनजींनी संघात सोशल इंजीनियरिंगचे अनेक प्रयोग केले व ते यशस्वीही झाले. जातीपातीत भेदभाव न करणे हा संघाचा यूएसपी आहे व त्यामुळेच संघ जातीपातीच्या भिंती तोडून चहूबाजूंनी विस्तारत आहे. सुदर्शनजींनी या संबंधात लक्षणीय काम केले आहे.

 

पांचजन्यऑर्गनायझर या संघाच्या मुखपत्रांकडे त्यांचे विशेष लक्ष असे. समाजातील विविध विषयांवर संघाची मते ते नि:संकोचपणे मांडीत. स्त्रीभ्रूण हत्तेसंबंधातील त्यांचे भाषण जसे गाजले तसेच १९७१ च्या बांगलादेश मुक्तीसंग्रामासंबंधात त्यांनी केलेली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रशंसा देखील संघवर्तुळात वादाचा विषय ठरली. गमतीची गोष्ट ही की त्याच इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित झाल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांना अटक केली व संपूर्ण १९ महिने तुरुंगात डांबले.

 

जीवन-सत्य-ज्ञान यांच्या स्वरुपाविषयीचे तत्वज्ञान असो की र्यावरण विषय असो, आंतरराष्ट्रीय राजकारण असो की शेती हा विषय असो, जवळ-जवळ सर्वच विषयांचा त्यांचा गाढा व्यासंग होता. वैयक्तिक संबंध ते अतिशय महत्वाचे मानीत व ते दृढ करण्यासाठी ते विशेष प्रयत्न करीत. विविध विषयांवर तासनतास ते दिग्गजांशी व तज्ञांशी चर्चा करीत. सुदर्शनजी बहू-भाषिक होते. कन्नड़, बंगाली, आसामी, हिंदी, इंग्लिश, मराठी, भोजपुरी आदी कित्येक भाषांमधे ते सहज संवाद साधत. विविध भाषात त्यांची भाषणे ऐकून श्रोते आश्चर्यचकीत होत असत. अतिशय संवेदनशील हृदयाचे सुदर्शनजी भेटण्यासाठी, सभा, समारंभ, चर्चा व व्याख्यानासाठी सहज उपलब्ध होत. जेवढा हिंदू धर्माबद्दल त्यांचा अभ्यास होता तेवढाच अभ्यास त्यांचा इस्लाम धर्माबद्दल होता. त्यामुळे अनेक वेळा निष्णात मुस्लिम धर्मगुरू देखील त्यांच्यासमोर नि:शब्द होत.


सुदर्शनजी आधुनिक विचारांचे होते. एकचालानूवर्तीत्व हा संघावर विरोधकांनी अकारण मारलेला शिक्का त्यांनी आपल्या कृतीतून पुसून टाकला. बैठकीत चाललेल्या चर्चेवेळी कोणालाही आपले मत मांडण्याची परवानगी होती. एवढेच नव्हे तर एखाद्या मताचा प्रतिवाद करणे, विरोध दर्शविणे वा नाखुशी व्यक्त करणे हे त्यांच्या दृष्टिकोनातून प्रगल्भतेचे लक्षण होते. अशाच विचारमंथनातुन योग्य अशा निर्णयाचा अमृतकुंभ हाती लागतो ही त्यांची धारण होती. पूर्वी शाखेत नित्य-नियमाने प्रात:स्मरण म्हटले जायचे. सुदर्शनजींनी त्याऐवजी एकात्मतास्तोत्र म्हणायला सुरवात केली. त्यांनी संघांतर्गत राष्ट्रीय मुस्लिम एकता मंच स्थापन करून मुस्लिम समाजात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यास चालना दिली.

 

पंजाबमधील खलिस्तानी आंदोलन असो किंवा आसाममधील बांगलादेशी घुसखोरीची समस्या असो, सुदर्शनजींनी आपल्या चिंतनाने संघ स्वयंसेवकांना एक निश्चित दिशा दिली ज्यामुळे हे प्रश्न अधिक न चिघळता हळू-हळू थंड झाले. प्रत्येक केसधारी शिख हा हिंदू आहे तसेच सर्व हिंदू हे शिखांच्या सर्व १० गुरूंप्रती तसेच पवित्र अशा गुरुवाणीवर श्रद्धा, आस्था ठेवतात म्हणून शिख आहेत असे विचार ते मांडत. बांगलादेश मधून भारतात येणारे मुस्लिम 'उपद्रवकारी' आहेत व त्यांची पुन्हा त्यांच्या देशात हकालपट्टी झालीच पाहिजे याबद्दल ते आग्रही होते. पण त्याच वेळी धार्मिक अत्याचार असह्य झाल्यामुळे बांगलादेशातून भारतात येणाऱ्या हिंदू शरणार्थ्यांना भारतात स्थान दिले पाहिजे असाही त्यांचा आग्रह होता. मोदी सरकारने संसदेत मंजूर झालेले नागरिकता संशोधन विधेयक हे त्यांच्याच चिंतनातून साकारले गेले आहे यात शंका नाही.

 

पैशाची असो वा साधन सामग्रीची, पाण्याची असो वा अन्नाची, कोणत्याही प्रकारची उधळपट्टी न करण्यावर त्यांचा कटाक्ष होता. खर्चिक लग्न समारंभावर ते नाराजी प्रकट करीत. साध्या-साध्या गोष्टी सुद्धा जपून वापरल्या पाहिजेत असे ते सांगत व त्याप्रमाणे कृती देखील करत. पिण्याचे पाणीही ग्लासात आवश्यक असेल एवढेच घ्यावे असा अलिखित नियमच त्यांनी कार्यालयासाठी बनविला होता.


जे याआधी बाळासाहेब व रज्जूभैयांच्या बाबतीत घडले, दुर्दैवाने तेच सुदर्शनजींच्या बाबतीत घडले. २००९ साली प्रकृती साथ देत नाही हे लक्षात आल्यावर सरसंघचालकपदाची जबाबदारी डॉ. मोहनराव भागवत यांच्या खांद्यावर सोपवून १५ सप्टेंबर २०१२ रोजी सुदर्शनजी अनंताच्या यात्रेस निघून गेले. प्रखर बुद्धिमत्ता असलेला भारतमातेचा हा सुपुत्र भावी पिढीला प्रेरणादायी ठरतील असे विचार व आठवणी मागे ठेवून काळाच्या पडद्याआड कायमचा निघून गेला.

 

 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा