राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
संघाचे उत्सव व त्यांचे महत्त्व – भाग १
हिंदुस्थान हा बहुविध संस्कृतीने नटलेला देश आहे. जगाच्या
पाठीवर इतर कोणत्याही देशात नसतील एवढ्या संस्कृती, भाषा, चालीरीती, मान्यता,
पंथ, देवी-देवता या
देशात प्रचलित आहेत. हिंदू, बौद्ध, जैन, शीख आदी प्रमुख धर्मांची हिंदुस्थान ही पितृभूमी
आहे. विविध प्रकारच्या संस्कृतीने नटलेल्या आपल्या देशात उत्सवांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसे पाहिले तर भारतीय संस्कृती हिच मुळी उत्सवप्रिय आहे.
वर्षाच्या सुरवातीपासून अखेरपर्यंत बदलत जाणारे ऋतुमान व हवामानात
होणारा नैसर्गिक बदल याची सांगडसुद्धा या सणांसोबत घातलेली आढळते. आपल्या संस्कृतीतील प्रत्येक उत्सवांना
कुठल्या ना कुठल्या धार्मिक, पौराणिक, सामाजिक
वा नैसर्गिक गोष्टींचे अधिष्ठान आहे, पार्श्वभूमी आहे.
हिरवागार, निसर्गसंपन्न भारत म्हणजे सणांची रांगोळी व रंगांची उधळण. हिंदुस्थानच्या मातीला येथील उच्चतम प्राचीन पण विकसित संस्कृतीचा गंध
येतो तर येथील हवेच्या झुळुकीसोबत मोगरा, चाफा, बकुळफुलांचा सुगंध येतो. येथील संगीतात सूर व तालाची धून आहे तर नृत्यात
पैंजणांची रुणूझुण आहे. येथील गंगा,
यमुना, कृष्णा, गोदावरीसारख्या
नद्यांच्या पाण्याला पियुषाची चव आहे तर येथील तरु-लतांच्या
स्पर्शाने मोहरून जाणारी अंगावरील लव आहे. येथील सूर्यप्रकाश ज्ञानाच्या जोडीने
तेजोमय होतो तर येथील शितल चंद्र देखील आल्हाददायक सुखाची अनुभूती देतो. यावेळी
आपणा सर्वांना आपण भारतीय आहोत याचा खूप अभिमान वाटतो.
आपले उत्सव
हे आपल्या विविधतेतील एकतेचे प्रतिक आहेत. धार्मिक व भावनिक दृष्ट्या सणांना
आपल्या जीवनात खूप महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक उत्सवाचा निसर्गाशी खूप जवळचा
संबंध आहे. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, राशी, व नक्षत्रे यांच्यापासून तयार झालेल्या नैसर्गिक दिनदर्शिकेवर आधारित
असलेले आपले सारे उत्सव अस्सल भारतीय आहेत. त्याला एक नैसर्गिक व आध्यात्मिक बैठक
आहे.
आपले
उत्सव हे जरी मनोरंजनाचे, करमणुकीचे काम करीत असले तरी हे प्रत्यक्षात त्यातील मनोरंजन व करमणुक
ही केवळ लोकांना त्याकडे आकृष्ट करण्यासाठी आहे. प्रत्यक्षात संस्कृती जोपासणे, ती पुढील पिढीला हस्तांतरित करणे व आचार-विचारांनी उत्तम पिढ्या घडवण्याचे
कार्य हे उत्सव करीत असतात. समाजात जे-जे
चांगले म्हणून आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचवणे आणि समाजातील वाईट, चुकीचे म्हणून जे-जे आहे त्याचा निषेध करणे, म्हणजे
एकप्रकारे समाजप्रबोधन करण्याचे कार्य या उत्सवांनी केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वर्णन केल्याप्रमाणे ‘जे
जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते’ सर्व काही घेवून समाजाची उभारणी
करणे हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश आहे. याच विचारसरणीने संघाने, ज्यातून समाज आणि धर्म जोडले जाऊ शकतात असे वर्ष प्रतिपदा, हिंदू साम्राज्य दिन, गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन, विजयादशमी व मकरसंक्रांती हे ६ उत्सव
निवडले,. यातील पहिल्या २ उत्सवांचा परिचय आपण या लेखातून
घेणार आहोत.
वर्ष
प्रतिपदा
चैत्र
शुक्ल प्रतिपदा म्हणजेच हिंदू दिनदार्शिकेच्या नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसापासून नवीन हिंदू वर्ष सुरू होते. शिशिर ऋतुत झालेल्या पानगळीनंतर
वसंत ऋतूत, चैत्रात, झाडांना नवी पालवी
फुटते. तिला चैत्रपालवी असेही म्हणतात. चैत्र महिना नवउन्मेषाचा साक्षीदार आहे.
म्हणूनच चैत्र महिन्याचा पहिला दिवस कोणत्याही शुभकार्याचा आरंभ करण्यास अतिशय
योग्य दिवस आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. याच दिवशी प्रभू रामाने
रावणावर, नीतीने अनितीवर, पुण्याने
पापावर, धर्माने अधर्मावर विजय मिळविला व वनवास संपवून
अयोध्या नगरीत प्रवेश केला. त्याबद्दलचा आनंद आपण गुढी उभारून व्यक्त करीत असतो.
शालिवाहनाने
परकीय व आक्रमक क्रूर शकांचा पराभव करण्यासाठी सहा हजार सैनिकांच्या मातीच्या
मूर्ती तयार करून त्यात प्राण भरले. या सैनिकांच्या मदतीने त्याने ज्या दिवशी
शकांचा निर्णायक पराभव केला तो दिवस म्हणजे गुढी पाडवा.
शालिवाहन
हा केवळ पराक्रमी नव्हता तर तो सृजनशील नवनिर्मितीचा जनक होता. त्याने ज्यांना स्वतःची ओळख नाही, अस्मितेची जाणीव
नाही, धेयाची आसक्ती नाही अशा
अनेक सामान्य नागरिकांत विरत्वाचे स्फुलिंग चेतविले, त्यांना त्यांच्या
स्वाभिमानाची, अस्मितेची जाण करून दिली, सत्वाची ओळख पटवून दिली, त्यांचे नेतृत्व केले व एका
निश्चित धेयाप्रती जाण्यासाठी लागणारे मार्गदर्शन केले. यामुळे त्या सैनिकांत
चैतन्य निर्माण झाले, त्यांना स्फुरण चढले. ज्यामुळे त्या सैनिकांनी आपल्या पराक्रमाने आक्रमक शकांचा पराभव केला व
देशसेवेच्या कार्याची गुढी उभारली.
हिंदू साम्राज्य दिन
ज्येष्ठ
शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी
स्वतःच्या राज्याला हिंदू राज्य व स्वतःला हिंदू राजा म्हणून घोषित केले. स्वराज्याच्या
चारही बाजूला सुलतानी संकटे असून देखील, आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही
व मोगलाई सारखे हिंदवी स्वराज्याचे शत्रू स्वराज्याचे लचके तोडायला सज्ज असतानाही
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू पतपातशाहीची मुहूर्तमेढ रोवली व असंख्य हिंदुंना
त्यांच्या अस्मितेची जाणीव करुन दिली. शेकडो वर्षे पराभूत मनोवृत्तीत असलेल्या
हिंदूंमधे छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रेष्ठत्वाची भावना जागवली व हा देश
मुघलांच्या जोखडाखालून मुक्त केला. ज्या दिवशी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर ज्या
तेजस्वी, महापराक्रमी, सात्विक,
धार्मिक, सत्शील राजाच्या नेतृत्वाखाली या
देशात पुनः एकदा एक नवे व अस्सल हिंदूराष्ट्र उदयाला आले, त्या
छत्रपती शिवाजी महाराजांची केवळ आठवण म्हणूनच नाही तर त्यांना करोडो तोफांची सलामी
देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा होतो.
या सणाच्या दिवशी सर्व स्वयंसेवक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण
करून त्यांना नमन करतात आणि राष्ट्ररक्षणाची शपथ घेतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा