राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 



डॉ. केशव बळीराम हेडगेवार


डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच वर्षप्रतिपदा अथवा गुढीपाडव्याला (दिनांक १ एप्रिल १८८९बळीराम व रेवतीबाई (पूर्वाश्रमीच्या यमुनाबाई पैठणकर) या दांपत्यापोटी नागपूर येथे झालात्यांचे मूळ घराणे हे तेलंगणा मधील कुंदकुर्ती या गावचेकेशवजींचे  पणजोबा नरहरशास्त्री हे अठराव्या शतकात नागपुरात येऊन नागपूरकर भोसल्यांच्या आश्रयाखाली स्थायिक झाले. अध्ययन व अध्यापन ही या घराण्याची परंपरा असून केशवरावांनी व्यवहारापुरते वेदविद्येचे शिक्षण घेतले होते. त्यांना दोन वडीलबंधू आणि तीन धाकट्या  बहिणी होत्या


शाळेत असताना व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई त्यांनी रागाने फेकून दिली होती. तसेच ‘वंदे मातरम्‌’ ही घोषणा दिल्याबद्दल त्यांना शाळेतून काढूनही टाकण्यात आले होते. इ.स. १९१० साली शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते जाणीवपूर्वक कोलकत्त्याला गेले. त्यामुळे त्यांना बंगालमधील क्रांतिकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेता आला. १९१४ साली कोलकत्त्याला नॅशनल मेडिकल कॉलेजमधून त्यांनी एल्. एम्. अँड एस्. ही वैद्यकीय पदवी मिळविली. त्या दरम्यान त्यांनी बंकिमचंद्र चटर्जी यांच्या प्रेरणेने अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे कामही केले.

 

डॉक्टर हेडगेवार सुरुवातीला काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते व पदाधिकारी होते. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त होते त्यांच्यावर लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव होता. डॉ. बाळकृष्ण मुंजे यांना डॉक्टर हेडगेवार हे गुरुस्थानी मानीत. कोलकात्याला वैद्यकीय शिक्षण घेताना, नागपूरमधे काँग्रेसचे काम करताना व अनेक प्रांतात जावून ब्रिटिशांविरोधात भाषणे करुन जनजागृती करताना डॉक्टरांनी हिंदू समाज जवळून पाहिला, अनुभवला. हिंदू समाजाला एवढी प्राचीन परंपरा, प्रदीर्घ इतिहास व सांस्कृतिक वारसा असतानाही हा देश गुलाम का झाला, या प्रश्र्नाने डॉक्टरांना अंतर्मुख केले. हिंदू समाजातील जाती भेद राष्ट्रीय हितापेक्षा वैयक्तिक हिताला प्राधान्य दिले जाणे या दोन दुर्गुणांमुळेच देश गुलाम झाला असे त्यांचे मत झाले.

 

डॉक्टरांच्या असे लक्षात आले की या देशात अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही संगठना नाही. जोपर्यंत या भूमीतील रहिवासी एकत्र येत नाहीत आणि आपल्या सांस्कृतीचा अभिमान बाळगत नाहीत, ‘धर्म’ आचरणात आणत नाहीत, या महान भूमीसाठी लढा देत नाहीत, तोपर्यंत भारताला त्याचे जुने वैभव परत मिळवता येणार नाही, असा त्यांचा ठाम विश्वास होता. हिंदू समाज जागृत झाला, तर स्वातंत्र्य आमच्यापासून दूर नाही. हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळणार असेल, तर ते हिंदुत्वाच्या विचाराने हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला.


हिंदू समाजाची ससेहोलपट थांबविण्यासाठी, हिंदू संघटित झाले पाहिजेत. यासाठी स्वतंत्र संगठन हवे व ते संघटन हे एका भव्य अशा राष्ट्रीय संकल्पनेवर आधारीत असले पाहिजे असे त्यांचे मत होते. लोकांचा धर्म, संस्कृती देश, भाषा, इतिहास जर समान असेल तर त्यातून आपण सर्व एक आहोत अशी आत्मियतेची भावना निर्माण होते व हृदयात बंधूभाव उंचबळून येतो हे ते जाणून होते.

 

योगायोगाने त्याच वेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा हिंदुत्व’ हा ग्रंथ प्रकाशित झाला तो  डॉ. हेडगेवारांच्या वाचनात आला. ‘हिंदुत्व’ या ग्रंथाच्या पारायणाने डॉ. हेडगेवार अत्यंत प्रभावित झाले. डॉक्टरांच्या मनातील हिंदुत्वाच्या आणि हिंदू राष्ट्रीयत्वाच्या कल्पना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथाच्या लेखणीतून मुक्तपणे प्रकट झाल्या होत्या. हा एक शुभसंकेत असावा, असे डॉ. हेडगेवारांचे मत झाले. प्रदिर्घ मंथनातून एक अमृतकुंभ डॉक्टरांच्या हाती लागला आणि तो म्हणजे ‘हिंदू राष्ट्रवाद.’ हिंदू धर्म म्हणजे केवळ पोथी, पुराण, पूजा, आरती, उपास, तापास ही कर्मकांडे नव्हेत. हिंदू धर्म हा गणेशोत्वाच्या मिरवणुका किंवा काकड आरतीच्या दिंड्या काढण्यापुरता मर्यादित नाही. हिंदू धर्म हा अनादी आहे, अनंत आहे, अवध्य आहे ही सावरकरांनी त्यांच्या कवितेतून व्यक्त भावना डॉक्टरांनाही आपलीच भावना आहे असे वाटले.

 

या हिंदू राष्ट्रवादाचा अमृतकुंभ हाती घेऊन, ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आणि राष्ट्रीयत्व हेच हिंदुत्व’ या सिद्धांतावर त्यांनी १९२५ साली दसर्‍याच्या शुभमुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. त्यांनी हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. यालाच पुरक पण अधिक कडवी अशी धर्मांतर म्हणजेच देशांतर ही भूमिका स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी मांडली होती. याच राष्ट्रीयम्हणजेच हिंदू समाजाला संघटित करून राष्ट्राला परमवैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला.

 

हेडगेवारांनी संघकार्याची रचना कौटुंबिक मूल्यांवर केली होती. संघ हे आपले कुटुंब आहे आणि कुटुंबात जसा आपण व्यवहार करतो, तसाच संघात केला पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी लोकशाही, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था यांविषयी मूलभूत चिंतन मांडलेले नाही परंतु कोणतीही संस्था चांगल्या व दीर्घकाळ रीतीने चालविण्यासाठी काय केले पाहिजे, याचा त्यांनी जो मार्ग सांगितला, तो आता संघाने शंभरीत प्रवेश केल्यावर सिद्ध झाला आहे. माणसाला संस्कारित केल्याशिवाय व स्व-बांधवांविषयी आपुलकीची आणि कर्तव्याची भावना निर्माण केल्याशिवाय कोणतीही व्यवस्था कल्याणकारी ठरणार नाही, असे त्यांचे मत होते.

 

दिनांक २१ जून १९४० रोजी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघ स्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्चित अशी कार्यपद्धती तयार केली. सभासद नोंदणी-अध्यक्ष-सचिव-संचालक मंडळ या प्रचलित पद्धतींना फाटा देणारी व भगवा ध्वज, गुरू, गुरूदक्षिणेची संकल्पना, विचारांना मुख्य स्थान व व्यक्तीनिरपेक्ष संघटन, सामूहिक निर्णय पद्धती, पूर्णकालीन प्रचारक, दैंनदिन शाखा आदी वैशिष्ट्ये असलेली कार्यपद्धती डॉ. हेडगेवार यांनी संघामध्ये रुजवली.


स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय राजकारणात गांधीजींसारखे काही जण अशक्यप्राय अशा हिंदू- मुस्लिम ऐक्याचे ढोल, ताशे नगारे बडवत असताना होय मी म्हणतो, भारत हे हिंदूराष्ट्र आह" हे सांगण्याचे धैर्य जर कोणा एका व्यक्तीने दाखवले असेल तर ती व्यक्ती होती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. हिंदूराष्ट्राच्या पूर्ण स्थापनेसाठी समर्पित केलेले त्यांचे ऋषितुल्य जीवन हे संघाच्या राष्ट्र उभारणीचे बलस्थान होते. नव्या हिंदुराष्ट्रवादाचे जनक आणि सुप्त हिंदुराष्ट्राचे प्रबोधक मानले जाणाऱ्या डॉ. हेडगेवारांना स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुराष्ट्रवादाचा आधारस्तंभ म्हटले ते अतिशय योग्यच आहे.

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा