राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
प्रो. राजेंद्र सिंह
राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांचा कार्यकाळ आजीवन
असतो हे मी या आधीच्या लेखातच स्पष्ट केले होते. १९२५
साली संघाची स्थापना करणाऱ्या डॉ. हेडगेवार यांच्या पश्चात गुरुजी व त्यांच्या
पश्चात बाळासाहेबांनी सरसंघचालक पदाची धुरा वाहिली. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
चतुर्थ सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैय्या याला एका अर्थाने अपवाद
ठरले. बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसल्यामुळे सरसंघचालक पदाची
जबाबदारी पार पाडणे त्यांना कठीण जात होते. अशा वेळी बाळासाहेब स्वतःहून सरसंघचालक
पदावरून मुक्त झाले व त्यांच्या सूचनेनुसार प्रो. राजेंद्र
सिंह यांची सरसंघचालक म्हणून घोषणा करण्यात आली.
संघाच्या
इतिहासात अशी घटना प्रथमच घडत होती. एक सरसंघचालक हयात असताना दुसऱ्या व्यक्तीची
सरसंघचालकपदी निवड होणे अपेक्षित नव्हते.
पण संघकार्याला पूर्ण वेळ देता येत नाही म्हणून स्वतःहून त्या सर्वोच्च पदावरून
निवृत्त होणाऱ्या व दुसऱ्या योग्य व्यक्तीकडे ते पद सोपवून त्याला नेतृत्वाची संधी
देणाऱ्या बाळासाहेबांसारख्या थोर स्वयंसेवकाने घालून दिलेले त्यागाचे हे मूर्तिमंत
उदाहरण आहे.
रज्जूभैय्या
यांचा जन्म २९ जानेवारी १९२२ चा. त्यांच्या आईचे नाव ज्वालादेवी व वडिलांचे नाव
बलबीर प्रताप थोमर. राजपूत घराण्यातील रज्जूभैय्या जन्मले व वाढले ते उत्तर
प्रदेशात. त्यांचे प्राथमिक शिक्षण नैनितालमधे तर त्यानंतरचे सारे
शिक्षण अलाहाबाद म्हणजे सध्याचे प्रयागराज येथे झाले. रज्जूभैय्यांचे वडील हे भारतीय
अभियांत्रिकी सेवेत दाखल होणारे पहिले हिंदुस्तानी अभियंता होते व त्यांनी ब्रिटिश
राजवटीत सिंचन खात्यात मुख्य अभियंता म्हणून सेवा बजावली होती. याआधी अशा
प्रकारच्या उच्च पदस्थ सरकारी नोकरीत फक्त गोऱ्या लोकांनाच प्रवेश असे. गोऱ्या
लोकांची ही मक्तेदारी त्यांनी मोडीत काढली हे विशेष. भौतिकशास्त्र व विशेषत:
अणूविज्ञान हा रज्जूभैय्यांचा आवडीचा विषय होता. नोबेल पारितोषिक विजेते डॉ. सी. व्ही. रमण पदव्युत्तर
परीक्षेचे त्यांचे परीक्षक होते.
रज्जूभैय्यांच्या अणुविज्ञानाच्या
अभ्यासाने डॉ. सी. व्ही. रमण एवढे प्रभावित झाले की त्यांनी रज्जूभैय्यांना बंगळुरू येथील
राष्ट्रीय प्रयोग विज्ञान संस्थेत
त्यांच्या मार्गदर्शनाखाली अणुविज्ञान क्षेत्रात पुढील संशोधन करण्याचे आमंत्रण दिले. पण आपले पुढील
आयुष्य हे संघ कार्यासाठीच आहे हे माहीत
असलेल्या रज्जूभैय्यांनी त्याऐवजी
प्रयागराज विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून सेवा देण्याचे
ठरविले. यामागे त्यांचा
उद्देश होता की प्राध्यापक म्हणून सेवा करताना उरलेला वेळ संघकार्याला देता येईल.
रज्जूभैय्यांची राहणी
अतिशय साधी होती. अयोध्येतील राममंदिर बळकावून तेथे केलेले
अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त झाल्यावर मुलायम सरकारने रज्जूभैय्यांसहित अनेक संघ
पदाधिकाऱ्यांना तुरुंगात डांबले. राजकीय कैदी असल्याने जरी त्यांची सारी व्यवस्था सरकारतर्फे
तुरुंगात करण्यात आली होती तरी रज्जूभैय्या स्वतःचे कपडे स्वतः धूत व नंतर घडी घालून
उशीखाली ठेवत. साधेपणा हा गुण त्यांच्या असाधारण व्यक्तिमत्वाचा एक अविभाज्य घटक
होता. प्राध्यापक म्हणून त्यांना मिळालेल्या
पगाराचा ते अत्यंत काटकसरीने वापर करीत व शिल्लक रक्कम गरीब व गरजू मुलांच्या फी
साठी खर्च करीत. त्यांच्या घरच्यांनी त्यांना राहण्यासाठी प्रयागराज येथे एक घर
खरेदी करून दिले होते. कालांतराने त्यांनी ते घरही एका संस्थेस दान करून संघ
कार्यालयात राहणे पसंत केले. अखेरपर्यंत रज्जूभैय्यांचे कोणतेही बँक खाते नव्हते व
एक इंचभर जमीनही त्यांच्या नावे नव्हती. वडिलोपार्जीत संपत्तीतील आपला हिस्सा घेण्यासही त्यांनी नकार दिला होता.
रज्जूभैय्या
पहिल्यापासून जाज्वल्य राष्ट्रभक्त. १९४२ च्या चलेजाव आंदोलनात त्यांनी भाग घेतला
व त्यानंतर ते संघाच्या संपर्कात आले. संघ विचारांनी त्यांच्या मनावर गारुड केले व
त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संघ कार्यासाठी समर्पित केले. सर्वसाधारणपणे
प्रथम, द्वितीय, तृतीय संघशिक्षा वर्ग पूर्ण केल्यावर संघ
स्वयंसेवकाला दायित्व म्हणजे जबाबदारी दिली जाते. परंतु रज्जूभैय्या याला अपवाद
ठरले. त्यांचा अभ्यास, हुशारी, नेतृत्व
गुण व समर्पण या गुणांमुळे त्यांच्यावर संघाच्या चढत्या क्रमाने जबाबदाऱ्या
सोपविण्यात आल्या. रज्जूभैय्यांचे वैशिष्ट्य हे की विविध जबाबदाऱ्या पार पाडत
असतानाच ते तृतीय वर्ष शिक्षितही झाले. त्यांच्या या कृतीने त्यांनी
स्वयंसेवकांसमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले.
रज्जूभैय्यांच्या
सरसंघचालक पदाच्या काळाची पार्श्वभूमी अतिशय अस्थीर अशी होती. याच कालखंडात एकीकडे विश्व हिंदू परिषद रामजन्मभूमी आंदोलनाचे नेतृत्व
करीत होती तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीची लोकप्रियता वाढत होती. हिंदुत्वाची
विचारधारा तेवत ठेवून हिंदूंच्या संघटनेचा वटवृक्ष अधिक मजबूत करण्याबरोबर
देशाच्या राजकीय पटलावर अतिशय वेगाने घडणाऱ्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आपल्या
लक्ष्याप्रती मार्गक्रमण करण्याचे अतिशय अवघड काम रज्जूभैय्यांच्या नेतृत्व
गुणांमुळे सहजसाध्य झाले. त्यांच्याच कार्यकाळात संघाच्या एका स्वयंसेवकाने
भारताचा पंतप्रधान म्हणून ३ वेळा शपथ घेतली. पहिल्यांदा १६ दिवसांसाठी, दुसऱ्यांदा
१३ महिन्यांसाठी तर तिसऱ्यांदा १९९९ साली संपूर्ण कार्यकाळासाठी अटल बिहारी
वाजपेयींनी हिंदुस्थानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षात संघ स्वयंसेवक पंतप्रधानपदी आरूढ होणं हाच मुळी
अमृततुल्य योग होता. सध्याचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी नुकतीच या विक्रमाची
बरोबरी केली. संघाच्या शतक महोत्सवी वर्षात
हिंदुस्थानचे नेतृत्व एक संघ स्वयंसेवक करतोय हे जगाने पाहिले एवढेच नव्हे तर भविष्यात
रज्जूभैय्यांचा विक्रम तोडण्याची तयारीही संघ करतोय ही आनंदाची बाब आहे.
इतिहासाची पुनरावृत्ती
होते असे म्हणतात. एक सरसंघचालक हयात असतानाच दूसरा सरसंघचालक घोषित होण्याची
घटना रज्जूभैय्यांच्या जीवनात दोन वेळा घडली. बाळासाहेबांनी आपल्या हयातीतच प्रकृतीच्या कारणास्तव संघाची
सूत्रे रज्जूभैय्यांच्या हाती दिली तर त्याच कारणास्तव रज्जूभैय्यानी सरसंघचालक
पदाची जबाबदारी २००० साली सुदर्शनजींवर सोपवली. त्यानंतरचे आपले उर्वरीत आयुष्य त्यांनी पुणे येथे
घालविले. संपूर्ण आयुष्य संघ कार्याला समर्पित करणाऱ्या राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाच्या परमपूज्य सरसंघचालकांच्या मालिकेतील या असाधारण
व्यक्तिमत्त्वाने १४ जुलै २००३ रोजी आपला नश्वर देह त्याज्य करून अनंताकडे झेप
घेतली तेव्हा त्यांच्या अंत्यदर्शनासाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह देशाचे
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, उपपंतप्रधान लाल कृष्ण अडवाणी व
उपराष्ट्रपती भैरव सिंह शेखावत उपस्थित होते. भौतिक शास्त्रातील अध्यापनाच्या त्यांच्या योगदानाला
प्रयागराज विश्व विद्यालयाला त्यांचे नाव देवून त्यांचा
मरणोत्तर सन्मान करण्यात आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा