संघ
प्रार्थना
असंख्य संघ स्वयंसेवकांची
आध्यात्मिक प्रेरणा
देश म्हणजे केवळ एक
जमिनीचा तुकडा नाही. देश म्हणजे केवळ नदी, नाले,
जंगल, डोंगरांचा प्रदेश नाही तर एका यथार्थ
मानवी संस्कृतीची शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक भूक भागवून
तिचे संपूर्ण पालन पोषण करणारी भूमी आहे. म्हणूनच ती आईसारखी वंदनीय व पवित्र अशी
देवभूमी आहे. मातृभूमी आहे.
या देवभूमीच्या विकासासाठी, संवर्धनासाठी
व रक्षणासाठी तन-मन-धनाने व समर्पित भावनेने काम करणे हे आपले जीवित कर्तव्य आहे. आणि म्हणूनच मातृभूमीप्रती असलेली अपार श्रद्धा व्यक्त
करताना तिला जगाचा पालनकर्ता भगवान विष्णू यांची पत्नी असे संबोधुन सकाळी उठल्यावर
‘विष्णुपत्नि, नमस्तुभ्यं पाद्स्पर्श्म क्षमस्वमे’ अशी
प्रार्थना करुनच मग जमिनीवर पाय ठेवण्याची जशी आपली संस्कृती आहे तशीच ‘तुजसाठी
मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण’ अशी भावना निर्माण करणारी
आपली परंपरा आहे. याच
पवित्र भूमीला माता असे संबोधून ‘वंदे मातरम’ अशी घोषणा देत हसत हसत फासावर जाण्याचा जसा आपला इतिहास आहे तसंच बंकीमचंद्रांनी
राष्ट्रगीतात वर्णन केलेल्या
तुमि विद्या तुमि धर्म, तुमि
ह्रदि तुमि मर्म
त्वं हि प्राणाः शरीरे
बाहुते तुमि मा शक्ति,
हृदये तुमि मा भक्ति,
तोमारै प्रतिमा गडि
मन्दिरे-मन्दिरे
या भारतमाते बद्दलच्या
भावनेला अनुरूप अशीच संघ प्रार्थनेची रचना आहे.
मातृभूमीलाच देवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता, जे काही
म्हणायचं आहे ते म्हणा, जे काही मानायचं आहे ते माना,
त्वमेव माता च पिता त्वमेव |
त्वमेव बन्धुश्च सखा
त्वमेव।।
त्वमेव विद्या द्रविणं
त्वमेव।
त्वमेव सर्वं मम देव
देवः।।
असे समजून तीची प्रार्थना हीच
राष्ट्राची, राष्ट्रासाठी, राष्ट्रभक्तानी
केलेली प्रार्थना आहे, तीचे पूजन आहे. आणी याच भावनेतून संघ
प्रार्थनेची रचना झाली आहे.
संघाच्या पहिल्या
मराठी-हिंदी प्रार्थनेची जुळणी अनंत गणेश उर्फ अण्णा सोहोनी यांनी केल्याचे मानले
जाते. एका आर्यसमाजी कवितेत थोडासा बदल करून अण्णा सोहोनी यांनी पहिली प्रार्थना
लिहिली. प्रार्थनेतील मराठी श्लोकही कोण्या एका श्लोकात थोडासा बदल करून घेतला
असावा. संघाची मूळ प्रार्थना कवी गोविंद दरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘अभिनव
भारत’ च्या प्रार्थना पुस्तिकेत होती.
दि. २० फेब्रुवारी १९३९ ला वर्धा जिल्ह्यातील सिंदी या गावी
संघाच्या बैठकीत प्रार्थना संस्कृत भाषेत असावी असे ठरले. या बैठकीत ठरलेला आशय
नेमकेपणाने व्यक्त करणारी, अचूक शब्दयोजना असलेली प्रार्थना
निवडण्यास १९४० चा मार्च महिना उजाडला. नागपूरचे संस्कृत पंडित नरहर नारायण भिडे
यांची संस्कृत मधील गेय रचना सर्वांनाच आवडली. त्याच वर्षी दि. २३ एप्रिल १९४० ला
पुणे येथील संघाच्या प्रशिक्षण वर्गात ही नवीन संस्कृत प्रार्थना गायली गेली. तेव्हापासून
आजपर्यंत प्रत्येक संघ शाखेत, उत्सवात गायली जाणारी संघ
प्रार्थना सर्व भाषांची जननी व भारतीय संस्कृतीचे अती
प्राचीन अस्तित्व जगापुढे अभिमानाने मिरवणाऱ्या संस्कृत मधे आहे व भाषेच्या सर्व
भिंती तोडून प्रत्येक संघ स्वयंसेवकाला मुखोधगत आहे.
नमस्ते सदा वत्सले
मातृभूमे
त्वया हिन्दुभूमे सुखं
वर्धितोऽहम् |
महामङ्गले पुण्यभूमे
त्वदर्थे
पतत्वेष कायो नमस्ते
नमस्ते ||
प्रभो शक्तिमन् हिन्दुराष्ट्राङ्गभूता
इमे सादरं त्वां नमामो
वयम् |
त्वदीयाय कार्याय बद्धा
कटीयम्
शुभामाशिषं देहि
तत्पूर्तये ||
अजय्यां च विश्वस्य देहीश शक्तिम्
सुशीलं जगद्येन नम्रं
भवेत् |
श्रुतं चैव
यत्कण्टकाकीर्णमार्गम्
स्वयं स्वीकृतं नः
सुगंकारयेत् ||
समुत्कर्ष निःश्रेयसस्यैकमुग्रम्
परं साधनं नाम वीरव्रतम् |
तदन्तः स्फुरत्वक्षया
ध्येयनिष्ठा
हृदन्तः प्रजागर्तु
तीव्राऽनिशम् ||
विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्
विधायास्य धर्मस्य
संरक्षणम् |
परं वैभवं नेतुमेतत्
स्वराष्ट्रम्
समर्था भवत्वाशिषा ते
भृशम् ||
॥भारत माता की जय॥
संघाची प्रार्थना ही काही एक धार्मिक प्रार्थना नाही तर ती
निश्चितच एक राजकीय प्रतिज्ञा आहे. यात धर्माचे रक्षण करणे हा उद्देश तर आहेच पण
संघाच्या अंतिम धेयाचा ‘हिंदूराष्ट्राचा’ जाणीवपूर्वक उल्लेखही आहे व त्या
धेयपूर्तीसाठी प्राण खर्ची घालण्याचा ‘प्रण’ पण आहे. परंतु ही प्रतिज्ञा काही
भावनेच्या भरात किंवा कोणी सांगितली, जबरदस्ती
केली म्हणून घेतली नसून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या शब्दात
सांगायचं झाल तर
कीं घेतले व्रत न हे अम्ही अन्धतेने |
लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्ग
माने ||
जे दिव्य-दाहक म्हणोनी
असावयाचे |
बुद्ध्याची वाण धरिले करी
हे सतीचे ||
ती विचारपूर्वक, जाणीवपूर्वक,
डोळसपणे व कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता घेतली आहे. तसेच ही प्रतिज्ञा घेताना
छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी रोहीडेश्वरी आपल्या निवडक मावळ्यांसोबत
हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची जी शपथ घेतली त्यावरून नक्कीच प्रेरणा घेतली असावी असे वाटते.
संघाच्या प्रार्थनेत आपले हे धेय अवघड असून त्याप्रद
जाण्याचा मार्ग खडतर असल्याची प्रामाणिक कबुली आहे तर जागतिक स्तरावरील कोणत्याही
शक्तीने या धेयाकडे जाण्यापासून रोखू नये म्हणून अतिशुद्ध चारित्र्याचे वरदान
मिळावे म्हणून विनवणी देखील आहे.
या प्रार्थनेत ‘निःश्रेयस’ (पारमार्थिक), समुत्कर्ष (इहलौकिक), अभ्युदय
(उत्कर्ष) अशा शब्दांच्या वापरातुन
देशाची सेवा करत असताना आपला इहलौकिक व पारमार्थिक असा दोन्हींचा उत्कर्ष साधायचा
आहे ही कल्पना आहे. त्यामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी
दुरिताचें तिमिर जावो |
विश्व स्वधर्म सूर्यें
पाहो ||
जो जे वांछील तो ते लाहो |
प्राणिजात ||
असा सकल जीवसृष्टीचा अंतर्भाव असणाऱ्या पसायदानातून जो विचार
जगापुढे मांडला, तो विचार आहे तसेच कोणत्याही श्रेयाची
अपेक्षा न बाळगण्याचा ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या भगवान श्रीकृष्णाने
गीतेत सांगितलेल्या सल्ल्याचा अंतर्भाव देखील आहे.
त्याच प्रमाणे ‘तेरा वैभव अमर रहे माँ, हम दिन चार रहे ना रहे’ अशी समर्पणाची भावना देखील आहे.
पण ही प्रार्थना कशासाठी? हेही संघ
प्रार्थनेतच अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मातृभूमीला परमवैभवाप्रत
नेण्यासाठी, तीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी व यशाच्या उंचच
उंच शिखरावर विराजमान करण्यासाठीच हे व्रत आहे,
ही प्रार्थना आहे. संघ प्रार्थनेत मातृभूमी प्रती जी समर्पणाची
भावना आहे अगदी तशीच भावना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देखील एक कवी,
लेखक, प्रखर वक्ता म्हणून व्यक्त करताना
दिसतात.
हे मातृभूमि तुजला मन
वाहियेले |
वक्तृत्व वाक्-विभव ही
तुज अर्पियेले ||
तुंतेंची अर्पिली नवी
कविता वधूला |
लेखां प्रति विषय तूची
अनन्य झाला ||
आणि म्हणूनच संघ
प्रार्थना ही सर्वकालीन, सर्वव्यापी व सर्वकष होते हे या
प्रार्थनेचे मोठे यश आहे. असंख्य संघ स्वयंसेवकांकडून रोज म्हटली जाणारी ही
प्रार्थना जो ‘भाव’ जागा करते तीच संघाची खरी शक्ती आहे. संघ शाखा हे जर संघाचे
गंडस्थळ असेल तर संघ प्रार्थना ही संघाची आध्यात्मिक प्रेरणा आहे. याबद्दल अधिक
पुढील लेखात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा