राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
राष्ट्रीय स्वयंसेवक
संघाचे द्वितिय सरसंघचालक माधव सदाशिव उपाख्य गोळवलकर गुरुजींकडे
संघ विचार परिवारात स्वामी विवेकानंदांचे सर्वात मोठे
आध्यात्मिक वारसदार म्हणून
पाहिले जाते. ‘बंच ऑफ थॉट्स’ या गुरुजींच्या लेखन आणि भाषणांचे विवादीत पुस्तक संघाची भगवद्गीता
म्हणून ओळखले जाते. गुरुजींनी संघ विचारांचा विस्तार केला व त्याला राष्ट्रीय अधिष्ठान प्राप्त करून दिले. डॉ हेडगेवारांच्या
विचारांना व भूमिकेला लिखित व संघटित रूप देण्याचे कार्य गुरुजींनी केले. म्हणूनच संघाचे एक प्रमुख विचारवंत मा. गो. वैद्य यांनी गुरुजींना ‘विसाव्या शतकातील हिंदू समाजाला मिळालेली सर्वात मोठी देणगी’ म्हणून गौरविले
आहे.
माघ वद्य एकादशी शके १८२७
ला (१९ फेब्रुवारी १९०६) नागपूर जवळील रामटेक येथे गुरुजींचा जन्म झाला. गोळवलकर घराणे मूळचे
रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली गावचे. गुरुजींचे
वडिल सदाशिवराव तर आई लक्ष्मीबाई. या दांपत्याला ९ अपत्ये झाली परंतु दुर्दैवाने
गुरुजींची सारी भावंडे दगावली व गुरुजीच केवळ वाचले.
१९३४ च्या अकोला व १९३८ च्या नागपूर मधील संघशिक्षा
वर्गात गुरुजींनी ‘प्रमुख’ म्हणून काम केले. १९३९ मध्ये त्यांची संघाचे सरकार्यवाह म्हणून नेमणूक करण्यात आले. त्याच दरम्यान १९३५ मध्ये
ते वकीलीची परीक्षाही उत्तीर्ण
झाले. ऑक्टोबर १९३६ मध्ये गुरुजी कोलकात्यापासून १९०
किलोमीटर लांब असलेल्या सारगाछी येथील स्वामी अखंडानंद यांच्या
आश्रमात गेले. स्वामी अखंडानंदांनी गुरुजींना दीक्षा दिली, गुरुमंत्र
दिला आणि समाजात जाऊन कार्य करण्यासाठी आशीर्वाद दिला. त्यानंतर गुरुजी नागपूरला परत आले.
१९४० मध्ये पुन्हा त्यांना नागपूरच्या संघशिक्षा वर्गाचे ‘प्रमुख’ म्हणून नेमण्यात आले. या
वर्गाच्या समारोपाला डॉक्टरांनी आपले शेवटच भाषण केले. आपला उत्तराधिकारी म्हणून डॉक्टरांनी गुरुजींचे नाव जाहीर
केले. २१ जून १९४० ला डॉक्टरांच्या
निधनानंतर गुरुजी सरसंघचालक झाले.
३० जानेवारी १९४८ ला गांधीजींची हत्या झाली. गांधीजींच्या हत्येशी संघ किंवा
गुरुजी यांचा काहीही संबंध नव्हता पण नेहरू सरकारने संघकार्य बेकायदा असल्याचे घोषित केले.
गुरुजींना गांधीजींच्या हत्येचा कट
करणे, सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न करणे,
असे खोटे आरोप ठेवून स्थानबद्ध करण्यात आले. त्याविरुद्ध संघाने
देशव्यापी सत्याग्रहाची हाक दिली. शेवटी संघावरील बंदी विनाअट उठविण्यात आली.
१९६२ च्या चिन विरुद्धच्या युद्धकाळात गुरुजींच्या नेतृत्वाखाली संघाने बजावलेल्या भूमिकेने तत्कालीन लष्करप्रमुख एवढे प्रभावित
झाले होते की त्यांनी पंतप्रधान नेहरूंना आग्रह करून १९६३ च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये
संघाची ३००० संघ स्वयंसेवकांची एक संपूर्ण तुकडी पूर्ण गणवेशात आणि बँडसह सहभागी करुन घेतली. १९६५ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धा दरम्यान
तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी ज्या
मोजक्या अ-राजकीय लोकांचा सल्ला घेतला होता
त्यात गुरुजी हे एक होते.
प्रसिद्ध पत्रकार खुशवंत सिंग यांनी गुरुजींशी झालेल्या मुलाखती दरम्यान त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही मुस्लिमांच्या इतके
विरोधात का आहात? गुरुजींनी उत्तर दिले “सर्वप्रथम, मुस्लिमांनी भारतावर कधी काळी राज्य केले होते हे विसरले पाहिजे. दुसरे, त्यांनी परकीय मुस्लिम राष्ट्रांना आपले मानणे बंद केले पाहिजे आणि तिसरे, त्यांना भारताच्या मुख्य प्रवाहात सामील झाले पाहिजे”
इंदिरा गांधीजी कधीच गुरुजींना भेटल्या नाहीत. नेहरूंजींप्रमाणे त्यांनीही संघाला विरोध केला. पण संघाने ना
त्याची पर्वा केली ना त्याला महत्त्व दिले. शेवटी संघाला टोकाचा विरोध करणाऱ्या
काँग्रेस व साम्यवाद्यांच्या नाकावर टिच्चून संघाच्या दोन स्वयंसेवकांनी ३-३ वेळा
भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
आज राष्ट्रीय राजकारणात संघाचे जे महत्त्व आहे त्याचे श्रेय
गुरुजींना द्यायला हवे. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संघ देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकला. स्वातंत्र प्राप्तीनंतर गुरुजींनी संघाला नवी दिशा दिली. समाजाच्या एकाच अंगाकडे न पाहता समाजातील शिक्षण, उद्योग, शेती, धर्म आदी सर्व क्षेत्रात काम केले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता. गुरुजींच्या प्रेरणेनेच डॉ. शामा प्रसाद मुखर्जी राजकीय
क्षेत्रात काम करू लागले. ‘भारतीय जनसंघ’ या नावाने राजकीय पक्ष स्थापन करण्यात
आला. विद्यार्थी परिषद, मजदूर संघ, विश्व
हिंदु परिषद, वनवासी कल्याण, महारोगी
सेवा, राष्ट्रीय शिशू शिक्षण आदी अनेक संस्था गुरुजींच्या
प्रेरणेने सेवा करू लागल्या. डॉ. हेडगेवार यांच्या समाधी स्थानी स्मृती मंदिराची
उभारणी, कन्याकुमारीचे विवेकानंद शिलास्मारक, तसेच शेकडो शिक्षण संस्था गुरुजींच्या प्रेरणेने उभ्या राहिल्या.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा