राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५



 घोष 


संघाच्या माथ्यावरील टीळा


 



भारतीय संस्कृतीत प्रतिकांना अतिशय महत्त्व आहे. ज्या वेळी लिपी नव्हती, लेखनाची पद्धत नव्हती त्या अतीप्राचीन काळापासून दगडी शिल्पाच्या माध्यमातून, शिल्पकलेतून, वेगवेगळी प्रतीके वापरून संदेश देण्याचे संस्कृती संवर्धनाचे काम आपल्या पूर्वजांनी अतिशय यशस्वी पद्धतीने पार पाडले आहे. भारतीय संस्कृती ही मूर्तीपूजक आहे. समस्त भारतीयांची श्रद्धास्थाने विविध देव देवतांच्या मूर्तीच्या स्वरूपात पल्यापुढे प्रकट होत असतात. या सर्व मूर्त्या, प्रतिकरुपाने आसन, वाहन, अस्त्र, शस्त्र, वाद्य, फुले, फळे, आभूषणे, पक्षी व प्राणी आदींसह सुशोभित असतात.

 

शांततेच्या काळात विद्येची देवता माता सरस्वतीच्या हातातील वीणा व भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी जर भारतीय संस्कृतीतील संगीत, सूर, ताल यांचे महत्त्व विषद करत असेल, मनोरंजन करत असेल  तर त्याच वेळी युद्धकाळात तांडव करणाऱ्या महादेवाच्या हातातील डमरू किंवा भगवान विष्णूच्या हातातील शंख हे युद्धाला सामोरे जाताना व शत्रूला आव्हान देताना शक्तीप्रदर्शनासाठी, शत्रूच्या ह्रदयात धडकी भरवण्यासाठी लागणाऱ्या वाद्यांचे महत्त्व अधोरेखीत करतात. महाभारतात अर्जुनाने देवदत्त तर भगवान श्रीकृष्णाने पांचजन्य या शंखांचा असा ध्वनी केला की त्या आवाजानेच कौरवांची ह्रदये विदीर्ण झाली होती. प्रभू श्रीरामाच्या धनुष्याच्या प्रत्यंचेचा टणत्कार ऐकून लंकेचा स्वामी व महापराक्रमी रावण सुद्धा गर्भगळीत झाला होता.

 

भारतात युद्ध संगीताचा इतिहास व परंपरा खूप जूनी आहे. प्राचीनकाळी युद्धसंगीतात अनेक वाद्यांचा उपयोग केला जात असे. नगारा (ड्रम), शंख (शेल ट्रम्पेट), ढोल (ड्रम), रणशिंग आदी वाद्यांचा उपयोग सैन्याला सूचना देण्यासाठी, एकत्र करण्यासाठी तसेच शत्रूला घाबरविण्यासाठी केला जात असे.


संघाच्या संचालनाच्या समयी म्हणजे परेडच्या दरम्यान अशाच वाद्यांचा उपयोग केला जातो ज्याला घोष अर्थात नाद अर्थात ध्वनी असे म्हणतात. यालाच रणसंगीत असेही म्हणतात. पाश्चात्य जगतात पाश्चात्य वाद्यांच्या साहाय्याने बँड पथकाची उभारणी केली जाते. आपल्या येथही लष्कर, पोलिस, अग्नीसुरक्षा दल, होमगार्ड वा तत्सम मिलिटरी आणि पॅरा मिलिटरी दलांमधे अजूनही पाश्चात्य वाद्यांच्या साहाय्याने बँड पथके तयार केली जातात व स्वतंत्रदिनी, प्रजासत्ताक दिनी, परदेशी राष्ट्रप्रमुखाच्या आगमन प्रसंगी, अंत्यसंस्कार प्रसंगी किंवा परेडच्या दरम्यान वाजवली जातात. संघामध्ये घोषात भारतीय वाद्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून घेतला गेला आहे. घोषामुळे उत्साह दुणावतो, ऊर्जा उत्पन्न होते व त्याच्या तालावर परेड करणे सोपे जाते.

 

वीरपुरुषाच्या माथ्यावरील टीळ्याला जेवढे महत्व, तेवढेच महत्व संघामध्ये घोषाला आहे. १९२७ च्या अभ्यासवर्गात सर्वप्रथम पणव अर्थात बास ड्रम, त्रिभुजअर्थात ट्रँगल शंख अर्थात बिगुलचा उपयोग केला गेला. संघामध्ये घोषवृंदाला तेथुन सुरुवात झाली असे मानले जाते.

 

सुरवातीच्या काळात संघ स्वयंसेवकांना घोषाचे प्रशिक्षण देणे सोपे काम नव्हते. एकतर ती वाद्ये महाग होती व पारतंत्र्याच्या काळात घोष येणारी माणसे फक्त फौजेत होती. या माणसांना फौजेव्यतिरिक्त कोणालाही घोष शिकविण्याची परवानगी नव्हती. अशा परिस्थितीत सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी बॅ. गोविंदराव देशमुख यांच्या मदतीने संघ स्वयंसेवकांना घोष शिकविण्याची जबाबदारी सैन्यातील एका निवृत बँड इन्स्ट्रक्टरला दिली.

 

पाश्चिमात्य संगीत, ताल व सुरांवर आधारीत घोष भारतीय मनाला भावणार नाही हे ओळखून संपूर्ण भारतीय रागदारीवर आधारित केदार, भुप, सावरी आदी रागांवर संघाच्या घोषातील सुरवातीच्या सूरावटी होत्या. संघाच्या घोषवृंदाला आजचे स्वरूप देण्याचे अतिशय अवघड काम प्रथम अखिल भारतीय घोष प्रमुख श्री सुब्बू श्रीनिवास जी यांनी केले. सुब्बू जी स्वतः उत्कृष्ट दंड संचलन करीत. परेड चालू असतानाच, अतिशय सहजपणे ते १५ ते २० फूट उंचीवर दंड फेकून लीलया झेलीत असत. विविध पद्धतीने दंड चालविण्याच्या त्यांच्या कौशल्याने दर्शकही मंत्रमुग्ध होत असत. वाद्यांच्या निर्मितीसाठी तसेच संघ स्वयंसेवकांच्या प्रशिक्षणासाठी त्यांनी संपूर्ण देश पालथा घातला. ते अनेक गायक, संगीतकार, वादक व संगीत अभ्यासकांना भेटले. अनेक पारंपारिक वाद्यांमध्ये भारतीय सूरावटीला योग्य असे बदल त्यांनी करुन घेतले व अतिशय परिश्रमपूर्वक त्यांनी संघासाठी एक अतिशय उच्च दर्जाचा घोषवृंद तयार केला.

 

आज संघाच्या घोषवृंदात पणव (बास ड्रम), शंख (बिगुल), आनक (साईड ड्र्म), तुर्य (ट्रम्पेट), गोमुख (युफोनीयम), स्वरद (क्लार्नेट), नागांग (सेक्सोफोन), त्रिभुज (ट्रँगल)   सारखी वाद्ये अंतर्भूत आहेत व ७०००० हून अधिक वादक स्वयंसेवक आहेत.

 

संघाच्या घोषाच्या ताकदीची पोचपावती १९८२ च्या एशियाड क्रीडा स्पर्धांच्या वेळी मिळाली. त्यावेळी भारतीय नौदलाने संघाच्या घोषाने तयार केलेली शिवराय ही सूरावट वाजवून सर्वांची वाहवा मिळविली. आजपर्यंत संघ घोषाने तयार केलेल्या ४० सूरावटी भारतीय नौदलाने वाजविल्या आहेत ही संघ घोषाच्या यशाची पावती नव्हे का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा