राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १३ जानेवारी, २०२५

 

 

संघ शाखा - संघाचे गंडस्थळ

 




राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे संघ शाखा. दररोज एके ठिकाणी स्वयंसेवकांनी एकत्र जमून देशकार्यासाठी एक तास समर्पित करावा व सोबतच संघ स्वयंसेवकाची शारीरिक, मानसिक व बौद्धिक क्षमता वाढवून स्वरक्षणास व देशाच्या रक्षणास सज्ज असा संस्कारयुक्त, शिस्तबद्ध माणूस घडविणे हा संघ शाखेचा उद्देश आहे. संघ शाखेच्या निमित्ताने दररोज, हमखास स्वयंसेवकांची एकमेकांशी भेट होते. संवाद होतो. एकमेकांची विचारपूस होते. या सहवासाने आपुलकी निर्माण होते, आपुलकीतून प्रेम निर्माण होते व प्रेमातूनच त्यागाची व समर्पणाची भावना जागृत होते. त्यामुळे संघ स्वयंसेवकांनी नित्यनेमाने एकमेकांच्या वैयक्तिक संपर्कात असणे गरजेचे आहे. ही गरज शाखेमुळे पूर्ण होते आणि यामुळेच शाखा ही उत्तम माणूस घडविण्याचा कारखाना आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.


संघ शाखांमध्ये जाणारे स्वयंसेवक वेगवेगळ्या वयोगटातील असतात. त्यांच्या वयानुसार त्यांना शिशु, बाल, किशोर, युवा व प्रौढ स्वयंसेवक असे संबोधले जाते व गटानुसार बौद्धिकाचे विषय ठरवले जातात. संघाच्या शाखेत येण्यास वयाचे कोणतेच बंधन नसते. साधारणपणे शाळेत जाण्याचे जे वय तेच संघ शाखेत जाण्याची सुरुवात करण्याचे वय. सर्वात लहान म्हणजे शिशु स्वयंसेवक ६ वर्षे ते १० वर्षे या वयोगटातील असतो. बाल स्वयंसेवकाचे वय १० ते १४ तर किशोर स्वयंसेवक १४ ते १८ वर्षांचे असतात. १८ ते २९ पर्यंत युवा स्वयंसेवक तर त्याहून वयाने मोठ्या असलेल्या स्वयंसेवकांना प्रौढ स्वयंसेवक असे सर्वसाधारणपणे म्हटले जाते. संघ शाखा ही केवळ पुरुषांसाठी आहे. या व्यतिरिक्त संघ शाखेत येण्यास कोणतेही बंधन नाही. कोणत्याही जातीचा, धर्माचा, प्रांताचा, वर्णाचा, वर्गाचा, पंथाचा , वंशाचा, राज्याचा, कोणतीही भाषा बोलणारा असा कोणीही संघ शाखेत येवू शकतो. संघ शाखेत प्रवेश घेताना कोणत्याही प्रकारचा फॉर्म भरुन घेतला जात नाही. कोणत्याही कागदपत्रांची मागणी केली जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे फी आकारली वा स्वीकारली जात नाही.


सकाळी असणारी प्रात:शाखा, संध्याकाळी असणारी सायंशाखा तर रात्री लागणारी रात्रशाखा. या शाखा कोणतीही सुटी न घेता वर्षाच्या ३६५ दिवस लागत असतात. जिथे हे शक्य नसतं तिथे आठवड्यातून एकदा लागणारी साप्ताहिक शाखा किंवा महिन्यातून एकदा वा दोनदा लागणारी शाखा, ज्याला शाखा मंडल म्हणतात, लावली जाते.


प्रत्येक संघ शाखेची सुरुवात ध्वजारोहण व ध्वजप्रणामाने होते तर समाप्ती सामूहिक संघ प्रार्थनेने होते. या दरम्यान साधारणपणे एक तास सूर्यनमस्कार, योग, प्राणायाम आदी शारीरिक व्यायाम, बैठे व मैदानी खेळ, बौद्धिक, चर्चा सत्र, दंड चालविणे, कुस्ती तसेच कराटे सारखे स्वरक्षणाचे धडे, घोष, परेड, वैयक्तिक तसेच सामुहिक गीत गायन आदी गोष्टींची रेलचेल असते. उत्साहाने पुलकित व चैतन्याने नटलेली, आजच्या भाषेत सांगायचं झाल तर अतिशय लाईव्ह व स्वयंसेवकांच्या दैनंदिन कार्यक्रमाचा एक अविभाज्य घटक असलेली जागा म्हणजे संघ शाखा.


संस्कृत भाषेमधील संघ प्रार्थनेच्या नियमित गायनाने वाचा शुद्धी होते, उच्चार शुद्ध होतात, स्पष्ट होतात. शाखेमध्ये नियमीतपणे प्रातस्मरण तथा एकात्मता स्तोत्र म्हटले जाते. यात भारतभूच्या तमाम प्रात:स्मरणीय सुपुत्र-पौत्रींचे अभिमानाने स्मरण केले जाते. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. भारतभूला अलंकारित करणारे समुद्र, पर्वत, नद्या तसेच या भूमीवर छत्र धरणाऱ्या देवी देवतांची, ग्रह व ताऱ्यांची प्रार्थना करुन त्यांचा सन्मान केला जातो.


संघात खेळल्या जाणाऱ्या विविध मैदानी खेळामुळे खिलाडु वृत्ती वाढीस लागते तसेच सांघिक वृत्ती बळावते. संघात खेळले जाणारे बहुतेक खेळ खेळण्यास कोणत्याही सामग्रीची गरज नसते व हे सारे खेळ पूर्णतः देशी असतात हे वैशिष्ठपूर्ण आहेकवायत व परेडमुळे स्वयंशिस्त तर लागतेच पण आपली चालही सुधारते.


संघ शाखेत वरिष्ठ संघ स्वयंसेवकांची बौद्धिके असतात. बौद्धिके म्हणजे थोडक्यात प्रवचने, भाषणे किंवा लेक्चर्स. या बौद्धिकाला विषयाचे बंधन नसते. शूरवीरांच्या यशोगाथा ते आंतरराष्ट्रीय विषय, राष्ट्रापुढील समस्या ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, पृथ्वीराज चौहान, राणा संग, राजा पौरस, सम्राट अशोक, सम्राट चंद्र गुप्त मौर्य, आचार्य चाणक्य आदी महापुरुषांच्या कथा यावर बौद्धिके घेतली जातात.



१८५७ च्या स्वातंत्रसमरामधील महानायक, ब्रम्हवर्ताचा क्रांतिनेता श्रीमंत नानासाहेब पेशवे, झाशीची समरलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई नेवाळकर, पहिला क्रांतिवीर हुतात्मा मंगल पांडे, दिल्लीचा शेवटचा मुघल बादशाह बहादुर शाह जफर, मराठ्यांचा शेवटचा रणशूर सेनापती तात्या टोपे, जगदीशपुरचा राणा कुमार सिंह यांच्या अभूतपूर्व शौर्याच्या कहाण्या संघ शाखेत सतत वर्णिल्या जातात.


भारतीय स्वातंत्र लढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, क्रांतिकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, थोर क्रांतिकारक गणेश दामोदर सावरकर, हुतात्मा चंद्रशेखर आझाद, सरदार भगत सिंह, शिवराम हरि राजगुरुराम प्रसाद 'बिस्मिल', म सिंहखुदीराम बोस, अशफाक उल्ला खान, अनंत लक्ष्मण कान्हेरे , कृष्णजी गोपाळ कर्वेबटुकेश्वर दत्तजतिन्द्र नाथ दास, दुर्गावती देवी, जी दुर्गावती भाभी म्हणून प्रसिद्ध होती, मदनलाल ढिंगरा, अरबिन्द घोष, रास बिहारी बोस, फणिंद्र नाथ घोष, राजेंद्र लाहिरी, बीना दास, भाई कोतवाल , प्रतिसरकार स्थापन करणारे नाना पाटील, विष्णू गणेश पिंगळे,  हुतात्मा पांडुरंग सदाशिव खानखोजे,  हुतात्मा उमाजी नाईक,  हुतात्मा राघोजी भांगरे, दामोदर हरी चापेकर, बाळकृष्ण हरी चापेकर, वासुदेव हरी चापेकर हे तीन चापेकर बंधू, सुखदेव थापर आदी स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा यावर बौद्धिके घेतली जातात.


याच जोडीला भक्तीमार्गातुन सामाजिक क्रांती करुन सर्व समाजाला एका सूत्रात बांधण्याचे महत्वपूर्ण काम करणारे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरोबा, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत श्री सेना महाराज, संत चोखामेला, संत भानुदास, संत एकनाथ, संत तुकाराम, संत बहिणाबाई, संत रामदास, संत रोहिदास, संत जनाबाई, संत मुक्ताबाई, भक्त पुंडलिक, आदी सर्व संत, महात्मे, महापुरुषांच्या कहाण्या व उपदेश आदी विषयांवर भक्तिरसपूर्ण बौद्धिके घेतली जातात. यामुळे नवनवीन माहिती तर मिळतेच पण आपल्या थोर पूर्वजांबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञतेची भावना उचंबळुन येते.


संघात अनेक वैयक्तिक व सामूहिक गीते गायली जातात. बहुतेक गीते ही भक्तिरसपूर्ण किंवा वीररसपूर्ण असतात. यात मातृभूमीबद्दल कराव्या लागणाऱ्या त्यागाची तयारी, भारताच्या उज्ज्वल भविष्याची खात्री, धेयाकडे वाटचाल करत असताना येवू शकणाऱ्या संकटांना तोंड देण्याची तयारी, समर्पणाची भाना, बंधुत्वाची भावना, समता व समरसतेचा संदेश असे अनेक विषय असतात. संघाच्या प्रथेप्रमाणे गीताच्या लेखकाचे, कवीचे म्हणा फारतर, नाव प्रसिद्ध केले जात नाही. याला जरी काही खास कारण नसल तरी इदम न मम ही संघाची शिकवण लक्षात घेता ते योग्यच आहे असे म्हणावे लागेल.


संघाला फॅसिस्ट, मिलिटरी ऑर्गनायझेशन अश्या अनेक टिकांना सामोरे जावू लागते. संघ शाखात चालणारी परेड व दंड म्हणजे लाठी चालविण्याचे शिक्षण यावर अनेकांचा आक्षेप आहे. परंतु यामुळेच एक शिस्तबद्ध, आत्मनिर्भर स्वयंसेवक घडतो हेही लक्षात घेतले पाहिजे. असेच शिस्तबद्ध, आत्मनिर्भर व सामाजिक कार्यात जीवाची पर्वा न करता झोकून देणाऱ्या स्वयंसेवकांची एक तगडी टीम तयार होते व हीच टीम राष्ट्रावर जेव्हा आस्मानी किंवा सुलतानी संकटे येतात तेव्हा सर्वप्रथम धावून गेल्याचे आपणास दिसते. नव्हे असंख्य वेळा आपण सर्वांनी ते अनुभवले देखील आहे.


सर्व नाही पण काही शाखांत घोष म्हणजे बँडच्या तालमी, तयारी, प्रशिक्षण सुरु असते. संगीतात अधिक रुची असणाऱ्या संघ स्वयंसेवकांना याचे आकर्षण नसले तरच नवल. या घोषाबद्दल अधिक माहिती पुढील भागात.

 

 

 









 

 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा