राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १३ जानेवारी, २०२५
संघाचे उत्सव व त्यांचे महत्त्व – भाग २
गुरुपौर्णिमा
गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूची पूजा केली जाते. या उत्सवाच्या दिवशी
भगव्या ध्वजाची पूजा केली जाते. संघ हा व्यक्तीपूजक नाही, म्हणून संघाने भगव्या ध्वजाला गुरु मानले आहे व संघात
भगव्या ध्वजाची पूजा केली
जाते. हा सण आषाढ पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. संघाच्या विविध शाखांमध्ये सवडीप्रमाणे वेगवेगळ्या दिवशीही तो साजरा केला जातो. या दिवशी
संघस्वयंसेवक भगव्या ध्वजाला यथाशक्ती गुरुदक्षिणा अर्पण करतात. संघाच्या
पद्धतीप्रमाणे हे दान गुप्त ठेवण्यात येते तेही आपल्या संस्कृतीला अनुरूप आहे.
संघात
स्वयंसेवकांकडून कधीही व कोणत्याही प्रकारे प्रवेश शुल्क किंवा मासिक, वार्षिक अशी सभासद वर्गणी घेतली जात नाही. बहुतेक संघ शिबिरे निःशुल्क
असतात वा अतिशय नाममात्र शुल्क आकारले जाते. गुरुपौर्णिमेच्या उत्सवा दरम्यान संघ
स्वयंसेवकांनी केलेले स्वेछा दान यावरच संघाचा वार्षिक खर्च भागविला जातो.
आजकालच्या जमान्यात सर्वसाधारण एनजीओचे संचालक देखील परदेशी देणग्या घेवून आलिशान
गाड्यातून फिरत असताना जेव्हा पाहतो तेव्हा संघाच्या साधेपणाने संघाबद्दलचा आदरभाव
वाढतोच.
रक्षाबंधन
हा सण भाऊ-बहिणीतील प्रेमळ नात्याचा सण मानला जातो.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी
बांधते आणि भाऊ तिच्या रक्षणाची शपथ घेतो. संघ देखील त्याच भावनेने रक्षाबंधन साजरा करतो. या दिवशी सर्व स्वयंसेवक एकमेकांच्या मनगटावर राखी बांधतात आणि एकमेकांच्या
रक्षणाची शपथ घेतात. संघशाखेत भगव्या संघ ध्वजाला राखी बांधण्याची पद्धत आहे.
दुर्दैवाने आपल्या येथे भ्रमिष्ट डाव्या इतिहासकारांनी जसे
इतिहासाचे विकृतीकरण केले काहीसे तसेच विकृतीकरण त्यांनी आपल्या उत्सवाचे पण केले.
अन्यथा चितोडची राणी कर्णवतीने आपल्या रक्षणासाठी हुमायून नावाच्या परकीय मुघल
आक्रमकाला राखी पाठवली होती यासारखी कवडीचाही ऐतिहासिक आधार नसलेली, तद्दन बोगस कथा इतिहासात
बेमालूमपणे घुसवली नसती.
विजयादशमी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना १९२५
मध्ये विजयादशमी या दिवशी झाली. त्यामुळे संघामध्ये विजयादशमीचा सण ‘संघ स्थापना दिन’
म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी पांडव अज्ञातवासात असताना
त्यांनी शमीच्या झाडामध्ये लपवून ठेवलेली आपली शस्त्रे व अस्त्रे झाडावरून उतरवून
धारण केली होती व ते युद्धाला तयार झाले होते.
याच दिवशी प्रभू रामाने रावणाचा व दुर्गामातेने महिषासुराचा वध केला व असुरांचे
स्वप्न धुळीला मिळविले.
विजयादशमीच्या
दिनी सीमोल्लंघन करण्याची प्राचीन परंपरा आहे.
ज्या भागात संघाचा विस्तार नाही, संघ शाखा नाही त्या भागात संघ विचारांचा
प्रचार व प्रसार व्हावा म्हणून प्रयत्न केले जातात. बहुसंख्य ठिकाणी नव्या संघ
शाखांची सुरुवात विजयादशमीच्या दिनी करण्यात येते.
संघाच्या परंपरेनुसार विजयादशमीच्या दिनी नागपूर तेथील संघ मुख्यालयात संघ
स्वयंसेवकांचा मेळावा आयोजित केला जातो. घोषासहित हजारो संघ स्वयंसेवकांची शिस्तबद्ध
परेड व सरसंघचालकांचे उद्बोधन हे विजयादशमीच्या मेळाव्याचे खास वैशिष्ठ्य आहे. या
दिवशी सरसंघचालक आपल्या भाषणातून काय विचार मांडतात याची साऱ्यांनाच उत्सुकता असते. या उत्सवाच्या दरम्यान परंपरेप्रमाणे शस्त्रपूजन होते. अशा वेळी संघ
सुद्धा आपली शक्ती जगापुढे प्रदर्शित करण्याची संधी का बरे सोडेल?
मकर संक्रांती
ज्या दिवशी
सूर्य कर्क राशीतून मकर राशीत प्रवेश करतो तो दिवस म्हणजे मकरसंक्रांत. हा दिवस सण
म्हणून भारतात अनेक ठिकाणी, विविध नावांनी, साजरा केला जातो. मकर
संक्रांतीला आसाममध्ये माघ बिहू, पंजाबमध्ये
माघी, हिमाचल प्रदेशात माघी साजी, जम्मूमध्ये
माघी संग्रांद किंवा उत्तरायण, हरियाणामध्ये सक्रत, राजस्थानमध्ये सकरत, मध्य भारतात सुकरात, तामिळनाडूत पोंगल अशा विविध नावांनी ओळखले जाते. आंध्र प्रदेशात पेड्डा
पांडुगा, कर्नाटक, तेलंगणा आणि
महाराष्ट्रात मकर संक्रांती, मध्य आणि उत्तर भारतातील काही
भागांमध्ये माघ मेळा म्हणून ओळखले जाते. केरळमध्ये मकर संक्रांती किंवा शंकरांती, काश्मीरच्या काही भागात शिशूर संक्रात म्हणून साजरी केली जाते. पश्चिम बंगालमध्ये हा सण पौष संक्रांती म्हणून ओळखला जातो.
मकरसंक्रांतीपासून
दिवस हळू हळू मोठा व रात्र हळू हळू लहान होत जाते. प्रकाशाची वृद्धी होते तर तम
म्हणजे अंधाराचा क्षय किंवा क्षर होतो म्हणजेच अंधार हळू हळू फिटत जातो, कमी
कमी होत जातो. थंडी तीव्रता कमी होतांनाच उबदारपणा वाढू लागतो, जाणवू
लागतो.
मकरसंक्रांतीच्या दिवशी संघाच्या शाखांमध्ये बलवर्धक तीळ आणि गुळाचे वाटप केले जाते. यादिवशी संघ स्वयंसेवक जी कुटुंबे संघाशी जोडली गेली
नाहीत त्यांच्या घरी प्रत्यक्ष जावून तीळगूळाचे वाटप करतात व त्यांच्यामधे
संघाबद्दलचा स्नेहभाव रुजविण्याचा प्रयत्न करतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या सणांच्या माध्यमातून समाजाच्या
विविध घटकांसोबत घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आणि लोकांना संघाशी जोडून देश
आणि समाजाची सेवा करण्याची जाणीव करून देतो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खुप छान माहिती. आतापर्यंत संघाबद्दल अशी सर्व समावेशक माहिती असलेला ब्लॉग पाहण्यात आला नव्हता तो गरज तुम्ही पूर्ण केलीत, धन्यवाद. पुढील लेखाची प्रतीक्षा आहे
उत्तर द्याहटवाधन्यवाद.
उत्तर द्याहटवा