संघ गीते
संघ
शाखेवर, संघाच्या जवळजवळ सर्व उत्सवात,
कार्यक्रमात, संघगीतांना अनन्यसाधारण महत्त्व
आहे. संघगीते ही प्रामुख्याने ३ प्रकारची असतात. पहिले म्हणजे एकट्याने गायचे त्याला
म्हणतात ‘वैयक्तिक’ गीत व दुसरे म्हणजे एकाने गायल्यानंतर
उपस्थित श्रोत्यांनी ते तसेच गायचे याला म्हणतात ‘सांघिक’ गीत. वैयक्तिक व सांघिक संघगीते संघाच्या
शाखात व संघाच्या कार्यक्रमात गायली जातात तर तिसरे म्हणजे ‘संचलन’ गीत हे संघाच्या संचलनावेळी घोषाच्या ताला-सूरावर वाजवले जाते. वीररसाने तसेच मातृभूमीवरील निरतिशय
प्रेमाने ओथंबलेली ही गीते संघ स्वयंसेवकांच्या मुखोद्गत असतात. संघाच्या परंपरेने
संघगीताचा कवी कोण हे गुलदस्त्यात ठेवले जाते. साधारणपणे
त्याची प्रसिद्धी केली जात नाही.
संघगीतांचे वैशिष्ट्य असे की संघगीतांचे विषय कालानुरूप
बदलत गेले. सुरुवातीला हिंदू व हिंदुस्तान या दोन विषयांवर आधारित असलेली ‘राष्ट्रगीते’ १९६२ व १९६५ च्या
युद्धकाळात ‘शौर्यगीते’ व ‘वीरगीते’ झाली. राम
जन्मभूमीच्या मुक्ती आंदोलनाच्या दरम्यान श्रीरामाची ‘भक्तीगीते’ झाली तर आताच्या आधुनिक कालखंडात त्यात पर्यावरणाच्या रक्षणासंदर्भामधील
विषय सुद्धा येऊन ती ‘विज्ञानगीते’
झाली. संघाच्या सर्वस्पर्शी जाणीवांचे ‘संघगीते’ हे काव्यमय अविष्कार आहेत.
अनेक संघगीते ही काव्यातील वेगवेगळ्या छंदात रचली जातात. जशी ती मुख्यतः हिंदी व काही वेळा संस्कृत भाषेत असतात तशीच ती इतर जवळजवळ
सर्व भारतीय भाषांमध्ये असतात. महाराष्ट्राचा विचार केला असता महाराष्ट्रामध्ये संघ शाखांमध्ये हिंदी
तसेच मराठी संघगीते गायली जातात. संघगीतांचा हा इतिहास संघा एवढाच
म्हणजे ९९ वर्ष जुना आहे. काही गीते ही प्रासंगिक असतात तर बहुतेक
गीते ही कालातीत असतात. संघाची कित्येक गीते तर स्वतः सरसंघचालकांनी सुद्धा रचली आहेत. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न श्रद्धेय
अटल बिहारी बाजपेयी यांनी रचलेली कित्येक गीते संघाने ‘संघगीते’ म्हणून स्वीकारली आहेत व ती संघाच्या शाखेत व कार्यक्रमात गायली जातात. परंतु असे असूनही कोणत्याही संघगीताला त्याच्या
रचियत्याचे नाव दिले जात नाही.
संघाच्या घोषवृंदात अनेक संघ स्वयंसेवक हे संगीत
क्षेत्रातील तज्ञ व संगीतात पारंगत असतात. संघगीतांना चाली लावण्याचे कामही संघ
स्वयंसेवक करतात. सद्य सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत हे स्वतः उत्तम गायक असून त्यांना संगीतात उत्तम गती आहे. त्यामुळे त्यांनीही अनेक संघगीतांना चाली लावल्या
आहेत. संघगीतांना चाली लावून संघगीत गाणे हा त्यांचा आवडता छंद आहे.
एका सुरात व एका तालात म्हटली जाणारी सांघिक गीते एकतेची
भावना उत्पन्न करतात व ‘हम सब एक है’ अशी जाणीव उत्पन्न करतात. संघगीते संघाच्या बैठकीत, बैठक सुरू होण्यापूर्वी
तसेच मध्यंतरानंतर गाण्याची पद्धत आहे. संघगीतांमुळे उपस्थित
श्रोत्यांमध्ये व्याख्यानाच्या आधी मन एकाग्र करण्यास मदत होते तसेच वीररसाने
भरलेल्या संघगीतांमुळे उपस्थित श्रोत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरते.
मातृभूमीला तन-मन-धन अर्पण
केल्यानंतरही अजूनही काहीतरी अधिक देशाला समर्पित करावे अशी भावना व्यक्त करणारे
मन समर्पित
तन समर्पित
और यह
जीवन समर्पित
चाहता हूँ मातृ-भू
तुझको अभी
कुछ और भी
दूँ
हे गीत असो किंवा अतिप्राचीन भारताच्या इतिहासाची
भव्य-दिव्य गाथा
वर्णन करणारे
युगो युगो से दुनिया चलती,
जिसके दिव्य प्रकाश में
पुरखों की वह पौरुष गाथा,
अजर अमर इतिहास में
हे गीत असेल वा
चरैवेति-चरैवेति,
यही तो मंत्र है अपना
नहीं रुकना, नहीं थकना,
सतत चलना सतत चलना
असा सातत्याने प्रयत्न करत रहा, यश नक्कीच मिळेल हा विश्वास व्यक्त करणारे हे गीत असेल वा संघाने निश्चय केलेल्या ध्येयाच्या संपूर्ण विजयाची ग्वाही देणारे
पूर्ण विजय संकल्प हमारा,
अनथक अविरत साधना
हे गीत असेल वा संघटनेवर ठाम विश्वास व्यक्त करणारे व संघटनेनेच आपण इच्छित ध्येय प्राप्त करू शकतो असा संदेश देणारे
संगठन गढ़े चलो
सुपंथ पर बढ़े चलो
भला हो जिसमें देश का
वो काम सब किए चलो
हे गीत असेल
वा मातृभूमीला स्वर्गाहून पवित्र मानणारे
जननी-जन्मभूमि
स्वर्ग से महान है
इसके वास्ते ये तन है
मन है और प्राण है
हे गीत असेल वा केवळ हिंदू
संस्कृतीच या जगाला योग्य मार्ग दाखवू शकते हे अधोरेखित करणारे
हिन्दु जगे तो विश्व जगेगा
मानव का विश्वास जगेगा
हे गीत असेल, प्रत्येक संघगीत हे देशप्रेमाने
ओतप्रत भरलेले असते हे निश्चित.
भारतीय जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष तसेच संघस्वयंसेवक पंडित
दीनदयाळ उपाध्याय यांची अंत्योदय ही संकल्पनाच मुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘देशातील सर्वात गरीब माणसापर्यंत विकासाची
गंगा पोहोचली पाहिजे. आपलं सारं काम हे अशा दिशेला पाहिजे की
ज्यामुळे समाजातील सर्वात खालच्या स्तरावर असलेला माणूस, रांगेतील
सर्वात शेवटचा माणूस याला सुद्धा विकासाची फळे मिळाली पाहिजेत’ या सामाजिक नीतीवर आधारित आहे. त्यामुळेच
चलो जलाएं दीप वहां
जहां अभी भी अंधेरा है
या गीतात अंत्योदयाची कल्पना स्पष्ट शब्दात मांडली गेली आहे.
आपल्या मातृभाषेत, मराठीत असलेल
हिंदू सारा एक मंत्र हा
दाहि दिशांना घुमवू या
तसेच
आम्ही पुत्र अमृताचे
आम्ही पुत्र या धरेचे
उजळून आज दावू
भवितव्य मातृभूचे
असे काळाला आव्हान देणारे गीत असो किंवा
आम्ही हिंदु ही तर आमची
स्वभाविक ललकारी रे
राष्ट्रभक्तीची विराट शक्ती
प्रकटे जागृत भारी रे
संघटनेने बळ साधावे
दारिद्रयाचे पाश तुटावे
समर्थ मंगल जीवन अमुचे
विश्वास्तव शुभकारी रे
असे संघ विचारांचे सार असलेले गीत असो वा
आम्ही बि-घडलो
तुम्ही बिघडांना
संघाचिया संगे
आम्ही बिघडलो
आम्ही बिघडलो
संघरूप झालो
अशी संघमय झाल्याची जाहीर कबुली असो वा
एक हे वरदान आई
एक हे वरदान दे
संभ्रमी पार्थास या
आज आम्हा हिंदु मी
हे सांगण्या अभिमान दे
विस्मृतीने लोपलेल्या
अस्मितेला जाग दे
हिन्दु हिन्दु एक अवघा
भावना ही जागवी
देशभक्तीची चिरंतन
ज्योत हृदयी चेतवी
केशवाने दाविलेले
ध्येय अमुच्या जीवनी
पूर्ण व्हाया ते करी
या राघवाचा बाण दे
अशी मातृभूमीकडे
याचना करणारे गीत असो, सारी संघ गीते एक साहित्य
म्हणूनही व कविता म्हणूनही उच्च दर्जाची असतात. त्यामुळे ती
गात असताना किंवा ऐकत असताना अलौकिक आनंद प्राप्त होतो.
संघगीतांची हीच तर खासियत आहे.
संघाचा गुरु : भगवा ध्वज
‘गुरु बिन ज्ञान न उपजै,
गुरु बिन मिलै न मोष.
गुरु बिन लखै न सत्य को,
गुरु बिन मैटैं न दोष’.
कबीराच्या या दोह्यात
गुरूचे महात्म्य अतिशय कमी शब्दात पण यथार्थ रीतीने वर्णित केले आहे. व्यक्ती असो वा संस्था, मार्गदर्शनासाठी गुरु हा
लागतोच लागतो. सृष्टीचा निर्माता ब्रम्हा, पालनकर्ता विष्णु व
लयकर्ता महेश यांचे एकत्रित रूप, अत्री कुलोत्पन्न व माता अनुसूयेचा पुत्र दत्तात्रेय यांना ‘गुरूंचे गुरु’ असे संबोधले जाते. त्या
दत्तात्रयांना देखील २४ गुरु होते असा पुराणात उल्लेख आहे. यावरून भारतीय
संस्कृतीत गुरूंचे महत्व अधोरेखित होते.
प्रत्यक्ष परमेश्वर
असलेल्या व जगाला गीतेद्वारे ज्ञान देणाऱ्या श्रीकृष्णाला सांदिपनी ऋषींना गुरु
मानून, त्यांच्या आश्रमात राहून शिक्षण घ्यावे लागले होते तर
मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाला वशिष्ठ ऋषींना शरण जावून, त्यांना गुरु मानून, ज्ञान प्राप्त करावे
लागले. गुरूच्या श्रेष्ठतेची असंख्य उदाहरणे आपल्या संस्कृतीत आहेत. एवढेच नव्हे
तर गुरुआज्ञा ही अंतिम असून मातृआज्ञा, पितृआज्ञा वा राजाज्ञा पेक्षाही
गुरुआज्ञा सर्व श्रेष्ठ आहे असे आपले धर्मग्रंथ सांगतात.
गुरु हा आपला
आदर्श व आपल्यासाठी ‘ज्ञानाचा स्रोत’ असतो. आधुनिक
काळातील गुरु हा ‘विश्वकोष’ असतो. गुरु
आपल्यासाठी सतत दिशा दाखविणारे ‘होकयंत्र’ तर अडचणीच्या
काळात मार्गदर्शन करणारा व अंधारातही प्रकाश देणारा ‘दीपस्तंभ’ असतो. चुकांना पोटात
घालणारा व संकटात धावून येणारा गुरु हा आपला कधी ‘सखा’ असतो, तर कधी मदतीला
धावून येणारा ‘सवंगडी’ देखील असतो. तो कधी पित्याहून पवित्र अशा ‘कुलदैवताच्या’ स्वरूपात भेटतो तर कधी
मातेहून मायाळू अशा ‘इष्टदेवतेच्या’ रूपात प्रकट होतो.
मायेची फुंकर घालणाऱ्या ‘बहिणीसारखा’ तो आपला सांभाळ करतो तर ‘वडील भावाप्रमाणे’ सदैव पाठीशी उभा राहतो. म्हणून आपण
गुरू ब्रह्मा गुरू विष्णु,
गुरु देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रह्म,
तस्मै श्री गुरुवे नमः
अशी प्रार्थना म्हणत गुरूंच्या श्रेष्ठतेला वंदन करीत
असतो.
मनुष्य हा स्खलनशील असतो.
कित्येक वेळा कळत-नकळत त्याच्या हातून चुका होवू शकतात, प्रमाद घडू शकतात, अपराध होवू शकतात. जाणते-अजाणतेपणे त्याच्याकडून इतर व्यक्ती दुखावल्या जावू शकतात, चुकीचे निर्णय घेतले जावू
शकतात किंवा स्वार्थ आड येवून, अप-पर भाव जागृत होवून, कोणाच्या बाबतीत ममत्व
तर कोणाच्या बाबतीत द्वेष भावना उत्पन्न होवून न्यायोचित वर्तन न घडण्याची शक्यता
असते. मानवी स्वभावाचे व्ययछेधक लक्षण असलेले काम क्रोध लोभ मोह मद व
मत्सर हे षड्रिपू कधी एखाद्याचा घात करतील
याची काहीच खात्री नसते. आजच्या युगात तर याचे दाखले
तर पदोपदी मिळतात. पण आपल्या पोथी-पुराणात तसेच रामायण-महाभारता सारख्या अनेक
ग्रंथातही थोरा-मोठ्या लोकांच्या स्खलनाच्या गोष्टी आपण ऐकल्या, वाचल्या आहेत. अगदी
विश्वामित्रासारखे ऋषी सुद्धा याला अपवाद नव्हते. त्यांना मेनकेचा मोह टाळला आला
नाही. तर रामायणात माता सीतेलाही सुवर्णमृगाचा मोह टाळला आला नाही. त्यामुळेच रामायण घडले. मानवी स्वभावाच्या या
मर्यादा अचूक ओळखून संघाच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या दूरदर्शी आद्य
सरसंघचालकांनी अनेक दिवसांच्या चिंतनानंतर संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानून
त्याला वंदन करण्यास सुरुवात केली.
खरे पाहता हिंदूंची
संगठना म्हणून देवाधिदेव
भोलेनाथ शंकर, मर्यादा
पुरुषोत्तम श्रीराम, ‘अहम ब्रम्हस्मी’ अशी घोषणा करून
अर्जुनाला विश्वरूप दर्शन देणारे भगवान श्रीकृष्ण, पार्वतीपुत्र व बुद्धीची
देवता गणाधीश गणपती यांच्यासारखे देव
अथवा शक्तीची देवता उमा पार्वती तथा अंबा माता, १६ विद्या व ६४
कलांची देवता माता सरस्वती, वैभवाची देवता
असलेली माता लक्ष्मी सारख्या देव-देवता, साऱ्या भारताला पूजनीय असलेले हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी
महाराज किंवा धर्मासाठी बलिदान देणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्यापैकी कोणालाही
संघाच्या गुरुस्थानी मानण्यास कोणतीच अडचण नव्हती व तसा निर्णय झाला असता तर त्यात
गैर असे काहीही नव्हते.
एवढेच कशाला, ज्याप्रमाणे शीख धर्मात
गुरु ग्रंथसाहेब या पवित्र ग्रंथाला गुरुस्थान अर्पित करण्यात आले आहे त्याच
परंपरेने चार वेद, भगवतगीता, रामायण अथवा महाभारत यासारख्या हिंदू धर्मातील कोणत्याही
पवित्र ग्रंथाला गुरुस्थानी मानले गेले असते तरी त्याला मान्यता मिळाली असती.
परंतु एवढे सारे पर्याय उपलब्ध असतानाही संघाने भगव्या ध्वजाला गुरुस्थान अर्पित
करणे हे संघ नेतृत्वाच्या दूरदृष्टीचाच नव्हे तर प्रचंड मोठ्या बौद्धिक
क्षमतेचा परिचय आहे.
भगवा ध्वज हा भारताच्या
ऐतिहासिक आणि प्राचीन सांस्कृतीचे प्रतीक आहे. भगवा ध्वज हा हिंदू आणि बौद्धांच्या
पूजनीय प्रतीकांपैकी एक आहे. भगवा रंग त्याग, ज्ञान, पवित्रता आणि सेवा यांचे
प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याचा
म्हणजेच मराठा साम्राज्याचा ध्वज भगवा होता. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन
यांच्या रथांवर भगवा ध्वज फडकवण्यात येत असे. सर्व हिंदू मंदिरांच्या कळसावर हा ध्वज फडकवला जातो. सनातन
हिंदू धर्माचे धर्मगुरू आद्य शंकराचार्य देखील भगव्या ध्वजाला सदैव आपल्या सोबत ठेवत व त्याला धर्मदंडा एवढाच सन्मान देत.
भगवा रंग हा वैराग्याचे व विरक्तीचे
प्रतीक आहे. म्हणूनच हिंदू आणि बौद्ध साधू-संत भगवी वस्त्रे परिधान करतात. मुघलांच्या
आक्रमणाच्या वेळी, जेव्हा आपला पराभव होत आहे हे लक्षात यायचे त्यावेळी आपली अब्रू वाचविण्यासाठी
राजपूत स्त्रिया त्यागाचे प्रतीक असलेली केसरी म्हणजेच भगवी वस्त्रे परिधान
करून अग्नी समर्पण करीत. आधुनिक शास्त्रात हे सिद्ध झाले आहे की भगवा रंग हा अगदी कमी प्रकाशात व ज्यावेळी
दृश्यमानता अतिशय कमी असते त्यावेळीही चटकन उठून दिसतो. रात्री-अपरात्री यात्रा करत असताना
हातात असलेल्या भगव्या ध्वजामुळे व भगव्या वस्त्रामुळे साधुसंत सहजच ओळखू येतात. आपण पाहिले असेलच की रेल्वे व रस्त्यावर काम करणारे अभियंते व कर्मचारी
भगव्या रंगाचे जॅकेट घालतात. त्यामुळे त्यांच्याजवळ येणाऱ्या वाहनांना अंधुक प्रकाशातही ते चटकन दिसू
शकतात.
भगवा ध्वज पवित्र अशा
अग्नीच्या ज्वालांचा आहे. हा रंग उगवत्या सूर्याचा आहे. सर्व शक्तिमान रामभक्त
हनुमानाला आवडणाऱ्या शेंदूरचा रंग भगवा आहे. हिंदूंच्या व हिंदुस्थानच्या
अस्मितेचे प्रतीक व हिंदू राज्यांच्या अद्वितीय पराक्रमाच्या इतिहासाचा भगवा ध्वज
हा साक्षीदार आहे. म्हणूनच की काय राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाने भगव्या ध्वजाला आपला गुरु मानला आहे. संघाच्या प्रत्येक शाखेत
प्रतीदिनी भगव्या ध्वजाचे सन्मानाने आरोहण व अवरोहण केले जाते. ध्वजाला सामूहिक प्रणाम
करून संघ प्रार्थना म्हटली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी भगव्या ध्वजाचे पूजन करून
संघ स्वयंसेवक आपापल्या इच्छेनुसार गुरुदक्षिणा अर्पण करतात. माझ्या माहितीप्रमाणे
ध्वजाला गुरु मानणारी संघ ही एकमेव संघटना असावी. संघाच्या अनेक एकमेवाद्वितीय
बाबींमधील गुरुस्थानी असलेला भगवा ध्वज ही एक बाब असावी यात शंका नाही.
सरकार्यवाह
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सरसंघचालक व सरकार्यवाह
ही दोन अत्युच्च पदे आहेत. त्यातील पहिले पद हे ‘मित्र, तत्वज्ञानी आणि मार्गदर्शकाचे’ आहे तर दुसरे पद हे ‘कार्यकारी’ आहे. सरसंघचालक हा जर संघाचा चेहरा असेल तर सरकार्यवाह हा चेहरा सोडून सर्व काही आहे. सर्वसाधारणपणे संघाच्या दैनंदिन कामकाजात सरसंघचालक लक्ष घालत नाहीत.
आपल्या सोबतीच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार्यवाह संघाचे दैनंदिन कामकाज
पाहतात. संघाची रचना व
कार्यपद्धती हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण संघाच्या रचनेत व
कार्यपद्धतीत बदल किंवा सुधारणा करण्याचे अधिकार सरकार्यवाहांना असतात. सरकार्यवाह झाल्यानंतर सरसंघचालक बनण्याचे भाग्य गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब
देवरस, रज्जूभैय्या व डॉ. मोहनराव भागवतांना लाभले आहे.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक प्रतिवर्षी साधारणपणे मार्चच्या
दुसऱ्या वा तिसऱ्या आठवड्यात बोलावली जाते. या बैठकीत सुमारे १,४०० प्रतिनिधी उपस्थित रहातात. दर ३ वर्षांनी या बैठकीत ‘जिल्हा’, ‘विभाग’
व ‘प्रांत’ संघचालक निवडले जातात. यानंतर, बैठकीच्या
अंतिम दिनी ‘सरकार्यवाह’ या
पदासाठी संघस्वयंसेवकांची नियुक्ती व्हावी यासाठी सर्वांची सहमती होण्यासाठी चर्चा
केली जाते. सर्वसहमती म्हणजेच एकमत न झाल्यास लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जाते. या निवडणुकीत केंद्रीय प्रतिनिधी मतदार
असतात. निवडणूक अधिकारी सरकार्यवाह पदाच्या निवडीची घोषणा करतात व प्रतिनिधी सभा ॐ
शब्द उच्चारून व हात उंचावून त्याला अनुमोदन देते.
आद्य सरकार्यवाह होण्याचा बहुमान १९२९ साली बाळाजी हुद्दार
यांना मिळाला. संघाचे ते पहिले सरकार्यवाह तर २०२१
साली सरकार्यवाह पदावर नियुक्त झालेले दत्तात्रेय होसबाळे हे
सद्य सरकार्यवाह. दत्तात्रेयजींना त्यांच्या
पूर्वसूरींची एक प्रदीर्घ व उज्ज्वल परंपरा लाभली आहे. १९३९ ला गोळवलकर गुरुजी, १९५० साली
भैय्याजी दाणी, १९५६ ला एकनाथजी रानडे,
१९६९ ला बाळासाहेब देवरस, १९७३ ला माधवराव मुळे, १९७८ ला प्रो. राजेंद्र सिंह उपाख्य राज्जूभैय्या, १९८७ ला हो. वे. शेषाद्री जी, २००० साली डॉ. मोहनराव भागवत व २००९ ला
सुरेश उपाख्य भैय्याजी जोशी यांनी सरकार्यवाह पदाची जबाबदारी खांद्यावर घेतली होती
व या सर्वांनी ती अतिशय उत्तमपणे पार पाडली.
संघाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेले व २०२१ साली सरकार्यवाह पदावर नियुक्त झालेले सद्य सरकार्यवाह
दत्तात्रेय होसबाळे हे ६० वर्षांचे असून ते मूळचे कर्नाटकामधील होसबाळे या गावचे आहेत.
वयाच्या अवघ्या १४ व्या
वर्षापासून ते संघाशी जोडले गेले व त्यानंतर संघाच्या विद्यार्थी शाखेत म्हणजेच ‘अभाविप’
मध्ये ते काम करू लागले १९९२ ते २००३ या अकरा वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडात ते ‘अभाविप’ चे
अखिल भारतीय संघटन महामंत्री म्हणून कार्यरत होते.
सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे हे इंग्रजी या विषयात बंगलुरु विश्वविद्यालयातील
पदव्युत्तर पदवीधारक असून समाजातील प्रबुद्ध वर्गाला संघाकडे
आकर्षित करून त्यांना संघाशी जोडण्याचे मोठेच काम त्यांनी केले आहे. विद्यार्थी नेता असताना व ‘अभाविप’ चे
काम पाहत असताना १९७५ साली लागलेल्या आणीबाणीत त्यांना राष्ट्रीय सुरक्षा
कायद्याखाली अटक करण्यात आली होती व तुरुंगातही जावे लागले होते.
संघाकडे उच्च शिक्षित तरुणांचा प्रचंड ओढा आहे. उच्च शिक्षित डॉक्टर, इंजीनियर, चार्टर्ड अकाऊंटंट,
आर्किटेक्ट, व्यवस्थापन तज्ञ तसेच डॉक्टरेट केलेले संशोधक
अगदी तरुणपणी पूर्णवेळ संघकार्याला वाहून घेतात. शेवटी याच तरुणाई मधून संघाच भावी
नेतृत्व आकाराला येते. त्यामुळेच की काय, संघाचे
नेतृत्व करणारे सर्वच सरसंघचालक व सरकार्यवाह हे उच्च शिक्षित होते/आहेत.
विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्र सेविका
समिति, वनवासी कल्याण आश्रम, भारतीय
किसान संघ, भारतीय रेल श्रमिक संघ, अधिवक्ता
परिषद, शिक्षक संघ,
स्वदेशी जागरण मंच, ग्राहक पंचायत,
लघु उद्योग भारती, सहकार भारती, सेवा भारती, लोक भारती, संस्कार
भारती, संस्कृत भारती, क्रीड़ा भारती,
विद्या भारती, विज्ञान भारती, दीनदयाल शोध संस्थान, भारत विकास परिषद, विवेकानंद चिकित्सा मिशन, दुर्गा वाहिनी, मुस्लिम राष्ट्रीय मंच,
एकल विद्यालय, सरस्वती शिशु मंदिर, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी
सारख्या स्वतंत्रपणे चालवल्या जाणाऱ्या अनेक संस्था व संघटना तसेच ‘पांचजन्य’ व ‘हिंदी विवेक’ ही हिंदी, ‘ऑर्गनायझर’ हे इंग्रजी, ‘तरुण भारत’ व ‘विवेक’ ही मराठी व यासारखी विविध भाषांमधे प्रकाशित
होणारी अनेक नियतकालिके, संघाशी, काही औपचारिकरित्या तर काही अनौपचारिकरित्या संबंधीत आहेत.
या संस्था/ संघटनांच्या विचारांचा धागा समान असल्यामुळे
अश्या अनेक संस्था व संघटनांचे पालकत्व सरकार्यवाह असलेल्या व्यक्तीकडे असते.
त्यांना त्यांच्या अडचणीच्या वेळी मदत करणे, मार्गदर्शन करणे तर काही प्रसंगी आवश्यक
असेल तर बैठका घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे काम सरकार्यवाह करत असतात.
करोडो स्वयंसेवक, ५०
हजारांहून अधिक शाखा, हजारो पूर्णकालीन प्रचारक व पदाधिकारी, हजारांच्या
संख्येत देशभरात चाललेली विविध विषयांतील सेवा कार्ये, शेकडोंच्या
संख्येने असलेली कार्यालये व त्यांच्या आस्थापने संबंधीच्या समस्या, कर्मचारी
वर्ग यांचे प्रशासन पाहणे हे कोणत्याही बहुराष्ट्रीय
कंपनीचा कारभार चालवण्याहून अधिक मोठे, कठीण
व जबाबदारीचे काम आहे.
संघाच्या कार्यपद्धतीत सरकार्यवाहांना सहाय्य करण्यासाठी सहसरकार्यवाह
नेमण्याची पद्धत आहे. सध्या अतुल लिमये, कृष्ण गोपाळ, सी. आर. मुकुंद, अरुण कुमार,
राम दत्त चक्रधर, व अलोक कुमार हे सहा जण सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. तसेच
बौद्धिक, शारीरिक, घोष, प्रचार आदी विविध विषय हाताळायला अखिल भारतीय स्तरावर प्रमूख नेमले
जातात. कारभाराच्या सोयीच्या दृष्टीने देशभरात तयार केलेल्या विविध प्रांतात
प्रवास करून तेथील संघ पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे व त्यांना मार्गदर्शन करणे हे
सरकार्यवाहांकडून अपेक्षित असते.
संघातर्फे प्रतीवर्षी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व
तृतीय वर्ष शिक्षणाचे निवासी वर्ग आयोजित केले जातात. हे कॅम्प साधारणपणे १
महिन्याच्या अवधीचे असतात. त्याचबरोबर प्रांतिक स्तरावर एका आठवड्याचे नव्या
स्वयंसेवकांसाठी प्राथमिक निवासी कॅम्प भरविले जातात. प्रतिवर्षी लाखोंच्या संख्येत यात उपस्थिती
असते. या सर्व प्रशिक्षण वर्गाची अंतिम जबाबदारी सरकार्यवाहांची असते.
त्याच्या जोडीला अनेक वेळा
सरकार्यवाह हे सरसंघचालकांचे दूत म्हणून अतिमहत्वाच्या पदावरील व्यक्तीच्या भेटीला
जातात ज्यात अतिशय महत्वाच्या व गोपनीय विषयांवर चर्चा होते. एकदा सद्य सरसंघचालक
म्हणाले होते की “मी संघाचा सामान्य स्वयंसेवक असून माननीय सरकार्यवाहांच्या
आज्ञेनुसार काम करतो“ यावरुन सरकार्यवाह या पदाचे संघातील महत्व अधोरेखित होते.