राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

गुरुवार, ८ मे, २०२५

 

 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा अशी ओळख असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची (अभाविप) स्थापना सन १९४९ साली गुरुजींच्या प्रेरणेने संघाचे प्रचारक बलराज मधोक यांनी केली. परंतु अभाविप आज जी काही आहे त्याचे सारे श्रेय प्रा. यशवंतराव केळकर यांना जाते. सन १९५८ साली त्यांनी अभाविप ची सूत्रे हाती घेतली व त्यानंतर खऱ्या अर्थाने अभाविप या संघाच्या विद्यार्थी शाखेला मदन दास देवी, भाऊराव देवरस, प्रा. बाळ आपटे, डॉ. अशोक मोडक यांच्यासारखे संघटना कौशल्य असलेले नेते / कार्यकर्ते मिळत गेले व संपूर्ण भारतभर अभाविप वाढत गेली  अभाविप ला खऱ्या अर्थाने स्वतःची ओळख मिळाली.


देशाच्या पुनरुत्थानाची ग्वाही देणारी ही संघटना देशाप्रती समर्पित आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला सकारात्मक व रचनात्मक दिशा देण्याचे महत्त्वाचे काम अभाविप ने केले आहे. आज जवळजवळ सर्व विश्वविद्यालयात व महाविद्यालयात अभाविप च्या शाखा आहेत व तेथे विद्यार्थ्यांच्या हिताचे कार्यक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या व मुख्यत्वे कला व क्रीडा या गुणांना विकसित करीत असतानाच त्यांच्यात नेतृत्व गुण फुलविणे व भविष्यातील एक आदर्श नेता तयार करण्याचे मूलभूत काम अभाविप करीत असते.

 

स्वामी विवेकानंद हे अभाविप चे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंदांची जयंती ही संपूर्ण भारतभर राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरी होते. संपूर्ण जगाला हिंदू धर्माची ओळख करून देणारे एक युवा संत म्हणून विवेकानंद ओळखले जातात. हिंदुत्व व भारतीयत्व हे दोन शब्द समानर्थी आहेत व या देशाचे भविष्य युवकांच्या हाती आहे असे सांगणाऱ्या स्वामी विवेकानंदांनी दाखविलेल्या मार्गावर व शिकवणीवर अभाविप आपली वाटचाल करत असते.

 

अभाविप च्या स्थापनेआधी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष प्रणीत स्टूडेंट्स फेडरेशन ऑफ इंडिया या साम्यवादी विचारसरणीच्या नॅशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया या काँग्रेस प्रणीत छद्म धर्मनिरपेक्ष विद्यार्थी संघटनांनी महाविद्यालयामध्ये आपले जाळे पसरवले होते. विद्यार्थ्यांच्या मनात डावी व नास्तीक  विचारसरणी रुजवून त्यांना अराजकतेकडे न्यायचे हा डाव्यांचा मुख्य उद्देश होता. हा उद्देश जर हाणून पाडायचा असेल तर विद्यार्थी क्षेत्रात संघ विचारांना अनुकूल अशा विद्यार्थी संघटनेची गरज भासत होती. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या प्रेरणेने अभाविप स्थापन झाली व अतिशय यशस्वी रीतीने डावीकडे झुकत चाललेल्या विद्यार्थी चळवळीला अभाविप ने राष्ट्रशक्तीकडे आणण्यात यश मिळविले.

 

स्वातंत्र्यपूर्वकाळात स्वातंत्र्य चळवळीत विद्यार्थ्यांचे योगदान अतिशय मोलाचे होते पण त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात देखील अनेक विद्यार्थी नेते आपापल्या परीने काम करत असताना आपापल्या राज्यात महत्त्वाची कामगिरी बजावीत होते. १९७४ साली  गुजरातमध्ये काँग्रेसच्या चिमणभाई पटेल सरकारच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी सुरू केलेले नवनिर्माण आंदोलन चिमणभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देखील थांबले नाही. या आंदोलनाचे लोण बिहारपर्यंत पसरले आणि त्याला लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व लाभले. त्यानंतरचा ईतिहास आपल्या सर्वांनाच माहीत आहे. आसाममध्ये ऐंशीच्या दशकाच्या अखेरीस सुरू झालेले बांगलादेशी घुसखोरांविरुद्धचे ऑल आसाम स्टुडंट्स युनियनने सुरू केलेले आंदोलन आसाममध्ये सत्तांतराला कारणीभूत ठरले. या दोन गोष्टींवरून राजकारणात मोठा फेरबदल करण्याची विद्यार्थ्यांची शक्ती किती मोठी आहे हे कळते.

 

पण या आधीच संघाच्या दूरदृष्टी असलेल्या नेतृत्वाला याची कल्पना आली होती आणि म्हणूनच १९४९ साली अभाविप चा जन्म झाला. फी वाढ असो की पेपर फुटी, विश्वविद्यालयातील भ्रष्टाचार असो की परीक्षेसंबंधीचा गोंधळ, अभाविप विद्यार्थ्यांच्या हिताचे असे सारे प्रश्न ऐरणीवर आणते. विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी काव्यवाचन, गायन, नृत्य, एकांकिका, वक्तृत्व, वाद-विवाद,  यासारख्या अनेक स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयीन व विश्वविद्यालयीन स्तरावर अभाविप  करीत असते. त्याचप्रमाणे व्यक्तिमत्व विकास, संभाषण कौशल्य तसेच नेतृत्व विकास सारख्या शिबिरांचेही आयोजन केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, नेतृत्वगुणांना वाव तर मिळतोच पण विद्यार्थ्यांमध्ये संघटन कौशल्य विकसित होते. अशा स्पर्धांमुळे/ शिबिरांमधून बंधुभाव वाढीस लागतो व संघटनेचा विस्तार होतो.

 

अभाविप चे मुख्य उद्दिष्ट शैक्षणिक क्षेत्रा आणि विद्यापीठाच्या व्यवस्थांत सकारात्मक बदल घडवून आणणे हे होय. संघविचारांच्या पायावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास व्हावा म्हणून अभाविप कार्य करीत असते. छात्रशक्ती म्हणजेच राष्ट्रशक्ती असे ब्रीद असलेली अभाविप छात्रशक्ती नावाचे एक मासिकही प्रकाशित करते. हिंदी भाषेत असलेले छात्रशक्ती हे मासिक अभाविप चे मुखपत्र आहे. हजारहून अधिक शहरांमधील ९ हजार महाविद्यालयां  ० लाख विद्यार्थी सभासद असलेली अभाविप ही भारतातीलच नव्हे तर साऱ्या जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. अभाविप ने काही काही गोष्टीत संघाचे अनुकरण केले आहे. संघाप्रमाणेच अभाविप मध्ये सुद्धा तरुण विद्यार्थी आपले औपचारिक शिक्षण संपल्यानंतर संघटनेचे काम करण्यासाठी काही वर्षे प्रचारक म्हणून काम करतात. याने संघटनेला मोठाच फायदा होतो.

 

पूर्वोत्तर भारतात असलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्राच्या मुलप्रवाहामध्ये आणण्यासाठी १९६५ साली आचार्य गिरीराज किशोर यांच्या अध्यक्षतेखाली अभाविप ने घेतलेला स्टुडेंट्स एक्सपीरियंस इन इंटरस्टेट लिविंग हा कार्यक्रम अतिशय प्रभावी ठरला. पूर्वोत्तर भारतातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची त्यांच्या वार्षिक रजेच्या काळात भारतातील विविध शहरात व संघाशी संबंधित असलेल्या कुटुंबात राहण्याची-खाण्याची सोय करून त्यांना भारताच्या विविधतेची ओळख करून देण्यात आली. यामुळे पूर्वोत्तर भारतातील हजारो कुटुंबे उर्वरित भारताशी जोडली गेली व त्यांचा एक ऋणानुबंध तयार झाला.

 

गेल्या ७५ वर्षाच्या अभाविप च्या इतिहासात या संघटनेने देशाला अनेक नेते दिले. भारताचे माजी वित्तमंत्री अरुण जेटली हे अभाविप चे राष्ट्रीय अध्यक्ष होते. भारतीय जनता पक्षाचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश नड्डा हे देखील अभाविप चे कार्यकर्ते होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रवीशंकर प्रसाद, व्ही. मुरलीधरन, कैलास चौधरी, भूपेंद्र यादव, नित्यानंद राय या सर्वांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात अभाविप मधूनच झाली. एवढेच नव्हे तर शिवराजसिंह चौहान, मनोहर पर्रीकर, देवेंद्र फडणवीस, रघुवर दास, विजय रुपानी, जयराम ठाकूर, बिप्लवकुमार देब, योगी आदित्यनाथ, तीरथसिंह रावत, पुष्करसिंह धामी, मोहन यादव, भजनलाल शर्मा, विष्णूदेव साई या आजी माजी मुख्यमंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी सुद्धा अभाविप ची आहे.

 

संघाप्रमाणे अभाविप सुद्धा उत्तम माणूस घडविण्याचे ध्येय ठेवते. अभाविप मधून तयार झालेले युवक-युवती समाजाच्या विविध क्षेत्रात आपले योगदान देता. यातील ज्या कार्यकर्त्यांना राजकारणाचे क्षेत्र खुणावत असते ते नैसर्गिकरित्या भाजपात राजकीय कार्य करू इच्छितात यामुळे अभाविप ला भारतीय जनता पक्षाचे प्रवेशद्वार म्हणून देखील म्हटले जाते.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा