राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, १४ मे, २०२५

 

सिंहावलोकन


सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैय्या प्रकृतीने अतिशय सौम्य व मृदू होते. ते जेव्हा बोलत तेव्हा ज्या कोमलतेने फुलातून मधु निघतो तसे त्यांच्या मुखातून शब्द निघत असतधर्म, हिंदू राष्ट्र, हिंदुत्व, अस्पृश्यता व जातीभेद, सत्ता, राजकारण, भारतीय मुस्लिम, अर्थव्यवस्था आदी अनेक विषयांवर त्यांनी आपले उद्बोधक विचार वेळोवेळी व्यक्त केले आहेत.

    

संघाची भूमिका आणि धर्म यांचा परस्पर संबंध व्यक्त करत असताना रज्जू भैय्या संबोधतात की संघाची ही भूमिका आहे की समाजामध्ये आपली प्राचीन नीतीमूल्ये व समाजाचा गौरवशाली इतिहास जागृत करून (स्वयंसेवकाने) आपल्या जीवनाद्वारे समाजापुढे सदाचाराचे उदाहरण घालून द्यावे. चारित्र्य निर्माण हे धर्माच्या आधारावरच होईल. धर्म हा या देशाचा प्राण आहे. राजकीय पक्षांनी आजपर्यंत धर्म नाकारला आहे त्याचमुळे ही आजची परिस्थिती उद्भवली आहे. जर आपण धर्माचे अनुकरण केले तर नागरिक पुन्हा सद्गुणी होऊ शकतात. कोळसा व हिरा यात फारसा फरक नाही. फरक त्या दोघांमध्ये असलेल्या अंतर्गत अणूरचनेत आहे”.


हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करताना हे चतुर्थ सरसंघचालक म्हणतात की संघ लोकांना जागृत करून या देशाची संपूर्ण स्थिती बदलण्यासाठी कटिबद्ध आहे.  मातृभूमी प्रति प्रेमाची भावना उत्पन्न करण्याचे काम संघ सातत्याने करत आला आहे. केवळ आपणच नाही तर संपूर्ण जग भारत माता की जय म्हणेल असा (बलशाली) भारत बनविण्याचा आम्ही संकल्प सोडला आहे. आज काही लोक विचारतात की काय तुम्ही हिंदुराष्ट्र बनवू इच्छिता का? मी त्यांना सांगू इच्छितो की हे राष्ट्र तर हजारो वर्षांपासून हिंदूराष्ट्र आहे. हिंदूराष्ट्र बनवायचं नाही. हिंदूराष्ट्र स्थापनही करायचं नाही. हिंदुराष्ट्राची घोषणा पण करायची नाही. परंतु हिंदूराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे”.


हिंदुत्व हाच भविष्यात सत्ताप्राप्तीचा मार्ग राहील अशी भविष्यवाणी करताना हा दृष्टा भाष्यकार भाष्य करतो की हिंदुत्व ही काही एक पूजा पद्धती नाही. हिंदुत्व हा काही संकुचित विचारही नाही. जे हिंदुत्वाला संकुचित समजतात त्यांच्या बुद्धिमत्तेवर कुठला ना कुठलातरी पडदा पडला आहे. ज्यांना जातिवाद संकुचित वाटत नाही, ज्यांना सामाजिक न्यायाच्या नावावर लोकांना आपापसात लढविताना कोणताही त्रास होत नाही. आज हिंदुत्व हाच राष्ट्र जागरणाचा केंद्रबिंदू बनत आहे. (यापुढे) हिंदुत्व हाच वैचारिक धृवीकरणाचा मुख्य आधार होईल. जागृत हिंदू समाजच या देशात हिंदूंच्या हिताची व हिंदूंच्या चिरंतर मूल्यांची काळजी घेणाऱ्यालाच सत्तेवर आणेल. परंतु याबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की फक्त सत्ताप्राप्तीने समाज परिवर्तन होणार नाही”.


अस्पृश्यता व जातीभेदावर कठोर प्रहार करत असताना हे समाजसुधारक  म्हणतात की समाजामध्ये सर्वांनाच काही ना काही तरी काम करावे लागते. परंतु (दुर्दैवाने) जे साफसफाईचे काम करतात त्यांना आपण अस्पृश्य मानू लागलो. आपल्या घरात आपली आई लहान मुलांची शी-सु काढते. झालेली उलटी साफ करते. परंतु असे असूनही आपल्या घरात मात्र सगळे समान असतात मग समाजामध्ये साफसफाईचे काम करणारे अस्पृश्य कसे काय असू शकतात? जो समाज हजारो वर्षे एक होता, ज्या समाजाने मुस्लिम आक्रमकांच्या विरुद्ध तसेच इंग्रजांविरुद्ध एक होऊन लढा दिला तो समाज आज विखुरलेला आहे. आपल्या इकडे कित्येक वेळा हरिजन समाज किंवा वाल्मिकी समाज असे ज्यांना म्हटले जाते तो समाज तर (आपल्या समाजाचा) एक खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. आज समाजातील दलित वर्गाचा विकास देवपूजेहुन अधिक महत्त्वाचा आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला तर ही गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन काळी आपल्याकडे कोणतीही व्यक्ती जातीच्या आधारावर ओळखली जात नव्हती. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्या व्यक्तीच्या योग्यतेवर आणि गुणांवरच होत होती. आपण कुठे आणि कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे कुणाच्याच हातात नाही. अर्थात जात कोणाच्याच हातात नाही. परंतु सद्गुणी व सुयोग्य बनणं आपल्या हातात आहे. खरे पाहता भारतीय संस्कृतीत जातीप्रथेला कोणतेही महत्त्व दिले गेले नाही. प्रत्येक मनुष्य एकाच ईश्वराचा अंश आहे आणि प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे. एकात्मतेचा व परस्परांप्रती बंधुत्वाचा हाच संदेश आपली संस्कृती देत आली आहे".


राजकारणातील जातीय शक्तींवर लताप्रहार करताना हे नृसिंह सांगतात की काही सत्तालोलूप राजकारण्यांनी जातीपातीच्या आधारावर हिंदू समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. या (समाज) विघातक शक्तींना पराभूत करण्यासाठी आणि हिंदूंच्या एकतेचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजात समरसतेचा भाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पारतंत्र्याच्या कालखंडात परकीय राज्यकर्त्यांनी समाजामध्ये फूट पाडून परस्परांबद्दल द्वेषाची व शत्रुत्वाची भावना उत्पन्न होण्यासाठी जाती प्रथेसारख्या अनेक वाईट प्रथांना जन्म दिला. हळूहळू अशा अनेक वाईट प्रथा संपत चालल्या आहेत. परंतु दुर्दैवाने काही राजकारणी आणि नेते आपल्या स्वार्थासाठी जातीवादाला खतपाणी घालून समाजात फूट पाडण्याचे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण खेळत आहेत. समाज तोडण्याचा हा खेळ आता खलास झाला पाहिजे. आपल्याला जातीवादाच्या वर उठून समाजाच्या एकतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत”.


भारतीय मुस्लिमाना आवाहन करत असतानाच त्यांना इशारा देत डॉक्टर प्रोफेसर राजेंद्र सिंह त्यांना स्पष्टपणे ऐकवतात की अयोध्या-मथुरा-काशी यांचे मुसलमानांना काही घेणेदेणे नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की जोपर्यंत अयोध्या-मथुरा-काशी आहे त्या तशाच स्वरूपात राहतील तोपर्यंत हिंदू समाजाच्या हृदयात मुसलमानांबद्दल कधीही प्रेमभाव उत्पन्न होणार नाही. संघ अल्पसंख्यांक यांच्या विरोधात नाही. मी त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आम्हाला साथ द्यावी. जर मुसलमानांनी आम्हाला साथ दिली तर खूपच चांगले होईल. जर ते आमच्या बरोबर आले नाहीत तर चिंता करण्याचे काही कारण नाही. जर ते आमच्या मार्गाच्या मध्ये आले तरीदेखील आम्ही पुढे जाऊ”.


अर्थव्यवस्थेवर आपले विचार व्यक्त करत असताना व डाव्या तसेच उजव्या अर्थव्यवस्थेला नाकारताना स्वदेशीचे हे पुरस्कर्ते बोलतात की आम्हाला समाजवादी अर्थव्यवस्था व पाश्चिमात्य अर्थव्यवस्था, दोन्हीही मान्य नाहीत. भारतीय अर्थव्यवस्था व तिची रचना याहून खूपच वेगळी आहे. समाजवादी अर्थव्यवस्था आणि सरकारने पब्लिक सेक्टर इंटरप्राईजेस वर निष्कारण दिलेला जोर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. भारतीयांनी स्वदेशीचा कधीच तिरस्कार केला नाही. स्वदेशी आंदोलन हे देशभक्तीचे आंदोलन आहे”.

 

राज्जुभैय्यांचे हे वैचारिक धन पुढील अनेक वर्षे समाजाची श्रीमंती वाढवीत राहील यात शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा