राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
मंगळवार, २७ मे, २०२५
विश्वरूपदर्शन
या आधीच्या लेखात
सांगितल्याप्रमाणे ‘संघ शाखा चालवणे’ हेच फक्त संघाचे
काम आहे. या संघ शाखेमध्ये येणाऱ्या स्वयंसेवकांना चांगले संस्कार देऊन त्यांना
समाजामध्ये आपापली कामे करण्यासाठी व आवडत्या कार्यात सहभागी होण्यासाठी पाठविले
जाते. संघातील संस्कार घेतल्यामुळे समाजामध्ये
असलेल्या अनेक उणीवांची किंबहुना समाजाला असलेल्या अनेक गरजांची संघस्वयंसेवकांना जाणीव होते व त्यामुळे या उणिवा
भरून काढण्यासाठी म्हणा किंवा समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी म्हणा संघ स्वयंसेवक
आपल्याला योग्य वाटेल तसंच आपल्या आवडीच्या सामाजिक क्षेत्रात काम करतात.
गुरुजींच्या प्रेरणेने व संघाचे
प्रचारक बलराज मधोकांच्या कल्पनेतून स्थापन झालेली व प्रा. यशवंतराव केळकर यांनी वाढवलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमृतलाल विठ्ठलदास तथा ठक्कर
बाप्पा
यांच्या संकल्पनेतून व ‘वनयोगी’ रमाकांत केशव तथा
बाळासाहेब देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला वनवासी कल्याण आश्रम,
दत्तोपंत ठेंगडी
यांच्यासारख्या जेष्ठ संघ स्वयंसेवकाने स्थापन केलेला भारतीय मजदूर संघ, मावशीबाई केळकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली राष्ट्रसेविका समिती, यासारख्या अनेक संस्था संघस्वयंसवकांनी सुरू केल्या, वाढवल्या एवढेच नव्हे तर त्यातील कित्येक संस्था त्या-त्या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संस्था बनविल्या.
भटक्या व विमुक्त लोकांच्या
उन्नतीसाठी पद्मश्री गिरिश प्रभुणे यांनी
सेवाग्राम हा आश्रम सुरू केला तर ज्येष्ठ स्वयंसेवक भारतरत्न नानाजी देशमुख यांनी १९६९ मध्ये स्थापन केलेल्या दीनदयाळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून गोंडा
ग्रामोदय प्रकल्प सुरू केला. त्यानंतर बीड, नागपूर
आणि चित्रकूट येथे प्रकल्प सुरू करण्यात आले. मध्यप्रदेश
मधील चित्रकूट प्रकल्प हा संघाच्या सामाजिक क्षेत्रातील संघ
स्वयंसेवकांच्या योगदानाची साक्ष देतो. नानाजींच्या प्रकल्पामुळे सर्वात मागासलेल्या समजल्या जाणाऱ्या समुदायाला काही
वर्षांतच विद्यापीठ, आयुर्वेदिक रुग्णालय, आयुर्वेदिक
फार्मसी, कृषी विज्ञान केंद्र , आदिवासी मुला-मुलींसाठी शाळा आणि वसतिगृहे, अनुसूचित
जातीच्या मुलांसाठी निवासी शाळा, कौशल्य प्रशिक्षण संस्था, गुरुकुल, देशी
गायींच्या जातींच्या संवर्धनासाठी संशोधन केंद्र इत्यादी सुविधा मिळाल्या.
संघ स्वयंसेवक
मिलिंद कांबळे यांनी सुरू केलेले दलित भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे
दलित उद्योजकांसाठीचे हक्काचे
व्यासपीठ असो किंवा संघाचे भूतपूर्व सहकार्यवाह
एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारी येथे उभारलेले विवेकानंद स्मारक शिलाशिल्प व
विवेकानंद स्मारक आज जागतिक स्तरावर विवेकानंदांचे विचार जगभर पसरविण्याचे काम
करीत आहेत.
देशभरात ५१,५७० ठिकाणी दररोज एकूण ८३,१२९ शाखा लागतात. साप्ताहिक मिलनची संख्या ३२,१४७ आहे. मासिक मंडळीची संख्या १२,०९१ आहे. सर्व
शाखांची एकूण संख्या १,१५,२७६ आहे. संघकार्यात सामील होणाऱ्या तरुणांच्या संख्येत सतत
वाढ होत आहे. दरवर्षी लाखो विशेषतः १४-२५ वयोगटातील तरुण यातून जोडले जात आहेत.
स्वयंसेवक ते कार्यकर्ता असे प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या संघाच्या प्रशिक्षण
कार्यक्रमातंर्गत देशभरात एकूण ४,४१५ प्रारंभिक वर्ग आयोजित केले आहेत. त्यात २,२२,९६२ जण सहभागी झाले. त्यापैकी १,६३,००० हे १४-२५ या वयोगटातील होते. २० हजारांहून अधिक ४० वर्षांपेक्षा अधिक
वयाचे होते. दुसरीकडे www.rss.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून २०१२ पासून
४६,००० हून अधिक महिलांसहित १२,७२,४५३ नागरिकांनी संघामध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा दर्शविली आहे.
प्रशासकीय रचनेनुसार संघ देशभरात ५८,९८१ मंडलांमध्ये विभागलेला आहे. त्यापैकी
३०,७१७ मंडलांमध्ये दैनिक आणि ९,२०० मंडलांमध्ये
साप्ताहिक मिलन शाखा सुरु आहेत. यात एकूण ३९,९१७ म्हणजे
मागील वर्षीच्या तुलनेत ६७% ची वाढ झाली आहे. मंडलांच्या
संख्येत ३,०५० ने वाढ झाली आहे.
संघकार्याच्या विस्तारासाठी शताब्दी विस्तारक म्हणून २ वर्षे पूर्णवेळ देण्याचे आवाहन केले होते. या
आवाहनाला प्रतिसाद देत २,४५३ स्वयंसेवक सहभागी झाले.
२०१४ पासून आजपर्यंत गेली अकरा
वर्षे या राष्ट्राला एक संघस्वयंसेवक नेतृत्व देत आहे. एवढेच नव्हे तर त्या
नेत्याच्या नेतृत्वाखाली आज करोडो संघस्वयंसेवक राष्ट्रकार्यासाठी जुंपले आहेत.
मथुरेला प्रचंड पाऊस पडत असताना आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलणाऱ्या भगवान
श्रीकृष्णाने त्या प्रचंड पावसापासून आपल्या प्रजाजणांना वाचवले. त्याच श्रीकृष्णाने ऐन लढाईच्या दरम्यान महाभारतात अर्जुनाला आपले विश्वरूपदर्शन दिले. आपल्या देशामध्ये सुद्धा जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी हाच श्रीकृष्ण
संघस्वयंसेवकांचे रूप धारण करून आपल्या देशबांधवांच्या मदतीला धावून जातो व
त्यांचे रक्षण करतो.
जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाचा
रथ लाखो भाविक ज्यावेळी आपल्या हाताने ओढतात तेव्हाच तो रथ पुढे सरकतो. भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी व परमवैभवाकडे नेण्यासाठी देशोत्थानाचा हा रथ ज्यावेळी
असंख्य संघस्वयंसेवक जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने ओढतील तेव्हा तो इच्छित स्थळी
पोहोचेल यात कोणतीही शंका नाही.
भारताची लोकसंख्या १४४ कोटी आहे व त्यातील ६५% लोक
हे सज्ञान आहेत असे मानले तर साधारणपणे या देशातील ९४ कोटी लोक हे सज्ञान आहेत. यापैकी
कमीत कमी २५ कोटी लोक या-ना-त्या कारणाने संघाशी संबंधित असलेल्या कोणत्या ना
कोणत्या संस्थेशी जोडले गेले आहेत. ही संख्या साधारणपणे २६.५% एवढी होते. संपूर्ण भारताचा विचार केला असता ही
संख्या प्रचंड आहे. विशेषतः ज्या संघटनेवर भारत
सरकारने तीन वेळा बंदी घालण्याचा प्रयत्न केला त्या संघटनेची लोकप्रियता व विस्तार
सामान्यांच्या कल्पनेबाहेर आहे आणि हेच संघाचे विश्वरूपदर्शन आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा