राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, १४ मे, २०२५

 

संघाचे आपत्ती व्यवस्थापन

 

१९४७ साली देशाची फाळणी झाली. सध्याच्या पाकिस्तान व बांगलादेशात हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले. करोडो लोक मृत्युमुखी पडले. सारे काही लुटले गेले. करोडो हिंदूंनी रिकाम्या हातांनी भारतात शरणार्थी म्हणून आसरा घेतला. अशा वेळी हिंदू-विस्थापितांना मदत करून, त्यांच्या खाण्यापिण्याची, निवासाची, औषधोपचाराची व्यवस्था करण्यासाठी संघाने पुढाकार घेतला. लाखो संघस्वयंसेवक काही वर्षे याच कार्यात सहभागी झाले. संघाच्या पुढाकाराने भारतभर विस्थापितांच्या सुमारे ३००० छावण्या उभारण्यात आल्या. या प्रयत्नांमुळे हिंदू विस्थापितांचे दुःख जरी कमी झाले नसले तरी त्यांच्या जखमांवर हळुवार फुंकर मारण्याचे ऐतिहासिक कार्य संघाने केले हे निश्चित.


१९६२ च्या चीन विरुद्धच्या युद्धकाळात असो, १९६५ च्या पाकिस्तानशी झालेल्या युद्धादरम्यान असो  वा  १९७१ साली बांगलादेश मुक्तीसंग्राम प्रसंगी पाकिस्तानशी झालेल्या युद्धात असो, संघाने आपत्तीकाळात नागरी सेवा देण्यात नेहमीच पुढाकार घेतला व उत्तम सेवा बजावली.


१९७७ वर्षीच्या अखेरीस आंध्रप्रदेशमधील सागरी किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड मोठ्या प्रमाणात वित्त व प्राणहानी झाली. संघस्वयंसेवकांनी अहोरात्र खपून नागरिकांना मदत केली. १९८४ साली इंदिरा गांधींची दुर्दैवी हत्या झाली त्यावेळी हजारो शिख बांधवांना  दिल्ली वा आसपासच्या प्रदेशात ठार मारण्यात आले. त्यावेळी हजारो शीख परिवारांना सुरक्षा देण्याचे काम संघस्वयंसेवकांनी केले. त्याचप्रमाणे शीख दंगल पीडितांना आसरा व जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी रिलीफ कॅम्प उभारण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टार मुळे काही प्रमाणात मोडतोड झालेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या पुनर्बांधणी झालेल्या कारसेवेत संघस्वयंसेवकांनी भाग घेतला.

 

या कालखंडात आंध्रातील गोदावरी खोऱ्यात चक्रीवादळांनी थैमान घातले. ९०० हून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला व अकल्पातील वित्तहानी झाली. अशा कठीण प्रसंगी तेथील नागरिकांना मदत व त्यांच्यासाठी अनेक रिलीफ कॅम्प तयार करून  त्यांची सेवा करण्याचे काम संघाने केले. याच वर्षी हरियाणामधील चरखी दादरी येथे एक मोठा दुर्दैवी विमान अपघात घडला ज्यात ३५० प्रवासी मृत्युमुखी पडले. याप्रसंगी संघाने केलेल्या बचाव कार्याला जगभरात विशेष करून आखाती देशात विशेष प्रसिद्धी देण्यात आली.


१९९९ साली ओरिसाच्या किनारपट्टीवर अतिभयंकर चक्रीवादळाने धुमाकूळ घातला. आर्थिक दृष्ट्या गरीब असलेल्या ओरिसाला हा प्रचंड मोठा धक्का होता. यात हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. वित्तहानीची तर गणना करणेच अशक्य होते. या अतिशय कठीण प्रसंगी संघाने, विस्थापितांना मदत व त्यांचे पुनर्वसन करण्याचे हिमालयाएवढे मोठे काम केले.


२०१० साली उत्तर कर्नाटकात आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले होते. अशावेळी सुमारे २४०० संघ स्वयंसेवकांनी १८० गावात मदत साहित्याचे वाटप केले. संघाचीच एक संस्था असलेल्या सेवा भारती ने ९ गावात १६८० घरे बांधून पुरामध्ये विस्थापित झालेल्या नागरिकांचे पुनर्वसन केले. दुर्दैवाने याच वर्षी उत्तराखंडमध्ये चार धाम यात्रेदरम्यान अतिशय भयंकर अशी नैसर्गिक आपत्ती ओढवली. नेहमीप्रमाणेच संघाने त्वरितच आपले बचाव कार्य सुरू केले आपले कर्तव्य चोखपणे बजावले.


३० सप्टेंबर १९९३ ला किल्लारी येथे महाभयंकर असा भूकंप झाला. लातूर व उस्मानाबाद या २  जिल्ह्यात त्याचे मोठे परिणाम जाणवले. या भूकंपात ५२ गावे जमीनदोस्त झाली. सुमारे १०,००० लोक दगावले व ३०,००० लोक जखमी झाले. हा भूकंप जगातील सर्वात कुप्रसिद्ध भूकंपापैकी एक होता. या भूकंपानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला पण घटनास्थळी सर्वप्रथम पोहोचला तो संघाचा स्वयंसेवक. हजारो संघस्वयंसेवक हातात मिळेल ती मदत घेऊन भूकंपग्रस्त गावात हजर झाले. भूकंपाचा एकूण आवाका पाहिल्यानंतर या संघस्वयंसेवकांचे विविध गट तयार करण्यात आले व प्रत्येक गटाला काही गावे वाटून देण्यात आली. मृत लोकांच्या अंत्यसंस्कारापासून जखमींच्या औषधोपचारापर्यंत सारी जबाबदारी संघस्वयंसेवकांनी उचलली. बेघर झालेल्यांची तात्पुरती निवासाची भोजनाची व पिण्याच्या पाण्याची, कपडे व औषधोपचार यांची व्यवस्था सुद्धा करण्यात आली. भूकंपामुळे पडझड झालेल्या घरांमध्ये कित्येक जण अडकले होते अशावेळी जीव धोक्यात घालून त्या दुर्दैवी लोकांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्याचे काम जसे सैन्यातील जवान, पोलीस व रेड क्रॉसचे जवान करीत होते तेव्हा त्यांच्या खांद्याला खांदा लावून संघस्वयंसेवक आपल्या गणवेशात उतरले होते होते.  लातूरमध्ये संघाने काही गावे दत्तक घेऊन तेथे भूकंप पीडितांना सर्व सोयींनीयुक्त अशी कायमस्वरूपी पक्की घरेही बांधून दिली.


२००१ च्या प्रजासत्ताकदिनी भुज मधील महाभयंकर भूकंपाने सर्वांचीच परीक्षा घेतली. या भूकंपात १८,६० नागरिक दगावले व एक लाख ६७ हजारांहून अधिक नागरिक जखमी झाले. या भूकंपाची झळा २१ जिल्ह्यांना बसली यामध्ये १८ मोठी शहरे, १८२ तालुके व ९०४ गावांचा समावेश होता. भुज, भाचार, अंजार आणि रापार ही गावे ढिगाऱ्याखाली दबली गेली. या भूकंपाच्या वेळी गुजरात सरकारने केलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. केवळ तात्पुरती मदत देऊन गुजरात सरकार थांबलं नाही तर भूकंपाने उजाड झालेल्या सर्व गावांचा आधुनिक पद्धतीने शाश्वत विकास करण्यात आला. भूजच्या भूकंपाच्या वेळी भूकंपग्रस्तांना मदत करण्यासाठी देशभरातून अनेक संघस्वयंसेवक त्या ठिकाणी पोहोचले व शेकडो रिलिफ कॅम्प तयार करून भूकंपग्रस्तांच्या सुरुवातीच्या अन्न-वस्त्र-निवारा या प्राथमिक गरजांची पूर्तता केली. स्वतः डॉक्टर असलेले प्रशिक्षित संघस्वयंसेवक भारतातील अनेक ठिकाणाहून भूज येथे पोहोचले व त्यांनी आपापली टोळी बनवून विभिन्न भूकंपग्रस्त गावात जाऊन वैद्यकीय मदत देण्याचे  कार्य केले


केरळमध्ये अगदी अलीकडे म्हणजे काही महिन्यापूर्वीच वायनाडमध्ये भूस्खलनामुळे झालेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तेथील खासदारांचा पक्ष नव्हे, तेथील राज्यकर्त्यांचा पक्ष नव्हे तर केरळमध्ये सातत्याने ज्या संघस्वयंसेवकांची हत्या होते तो संघच पुढे आला व संघस्वयंसेवकांनी निरपेक्ष भावनेने बचाव व मदत कार्य केले.

 

२१ व्या शतकातील सर्वात मोठी नैसर्गिक आपत्ती असे जीचे वर्णन करता येईल असे त्सूनामी चक्रीवादळ २६ डिसेंबर २००४ रोजी भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलं. ज्याचे परिणाम पश्चिम किनारपट्टीवर पण जाणवले. आंध्रप्रदेश, तमिळनाडू, ओरिसा व पश्चिम बंगाल या राज्यांना याची प्रचंड झळ लागली. जगभरात या त्सूनामी मुळे सुमारे २३,०००० नागरिक मृत्युमुखी पडले असा अंदाज आहे. या महाभयंकर प्रसंगी आपल्या प्राणाची पर्वा न करता संघस्वयंसेवकांनी जे बचाव कार्य केले व त्यानंतर आपदग्रस्तांना मदत करण्यासाठी व त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी जे कष्ट उपसले ते वर्णन करण्यास शब्द अपुरे ठरतील. २०२१ ला आलेला उत्तराखंडमध्ये, २००७ मध्ये बिहारमध्ये व २०१८ मध्ये केरळमध्ये, कोकण वा कोल्हापूर ला आलेला महापूर असो अशा कित्येक छोट्या-मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये संघस्वयंसेवकांनी कोणाच्या निमंत्रणाची वाट न पाहता सेवा कार्य केले हा इतिहास आहे. कोरोनाच्या महामारी वेळी उद्भवलेली परिस्थिती असो, जेव्हा-जेव्हा राष्ट्र संकटात येते, समाज संकटात येतो तेव्हा-तेव्हा संघ स्वयंसेवक सर्वप्रथम धावून जातो. मदत करत असताना आपण ज्याला मदत करतो त्याची जात, पात, धर्म, गोत्र, भाषा, वंश, वर्ण, लिंग याचा जराही न विचार करता केवळ माणुसकीच्या भावनेतून काम करण्याची शिकवण संघ देतो. शब्दमर्यादेमुळे अशा सर्वच नैसर्गिक आपत्तींचा व त्यामध्ये संघाने केलेल्या कार्याचा उल्लेख करणे शक्य नाही परंतु आपत्ती व्यवस्थापनात संघाचा अनुभव उल्लेखनीय व प्रचंड आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा