राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
मंगळवार, १३ मे, २०२५
‘निंदकाचे घर असावे शेजारी’ ही संत तुकाराम महाराजांनी
घालून दिलेली शिकवण सार्थ ठरवण्यासाठी का होईना पण संघाच्या विरोधात काहीही बोलू
शकत नसलेले संघाचे ‘हॅबिट्युअल’
टीकाकार नेहमी एक प्रश्न मात्र विचारतात की ‘संघात
स्त्रियांना प्रवेश का नाही’?
पण हा प्रश्न विचारत असताना मशिदीमध्ये स्त्रिया व पुरुष एकत्र नमाज पठण का करत नाहीत? ऑलिम्पिक किंवा एशियाडमधे पुरुष फुटबॉल संघात महिला का नाहीत? भारतीय पुरुष कबड्डी संघात महिला का नाहीत? स्वातंत्र्योत्तर
काळात काँग्रेसने एकही दलित पंतप्रधान का दिला नाही? सद्य
परिस्थितीमध्ये काँग्रेसला पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी नेहरू-गांधी कुटुंबाबाहेरील एकही सक्षम व्यक्ती
(बुजगावणी सोडून द्या) का मिळत नाही? आतापर्यंत कम्युनिस्ट पक्षाच्या अध्यक्षपदी एकाही महिलेची निवड का करण्यात
आली नाही? शिवसेना, राष्ट्रवादी
काँग्रेस, समाजवादी पार्टी, अकाली दल, बिजू जनता दल, द्रमुक आदी
पक्षांमध्ये कुटुंबाबाहेरील एकाही व्यक्तीला अध्यक्षपदी का बसवले नाही? असे प्रश्न मात्र त्याना पडत नाहीत. राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करताना कमीत कमी त्यांनी आपली सारासार
विवेक बुद्धी किंवा लॉजिक तरी वापरायला हवे अशी थोडीशी
अपेक्षाही आपण विरोधकांकडून ठेवू शकत नाही.
देवाने स्त्री व पुरुष या फक्त
दोनच जाती बनविल्या आहेत. या दोन जाती सोडून संघ इतर कुठलीही जात मानत
नाही. त्यामुळे संघामध्ये कोणत्याही जातीतील माणूस
स्वयंसेवक म्हणून काम करू शकतो व आपल्या संघटन कौशल्याच्या जीवावर संघाच्या
सर्वोच्च स्थानापर्यंत पोहोचू शकतो. परंतु संघ ही
दिवाणखान्यात बसून चालविली जाणारी संघटना नसून रोज प्रत्यक्ष फिल्डवर म्हणजेच
मैदानात उतरून काम करणारी संघटना आहे. संघ शाखेमध्ये
आधी सांगितल्याप्रमाणे कवायती व मैदानी खेळ हे सतत चालू असतात. कबड्डी, कुस्ती, आट्यापाट्या, राम-रावण युद्ध आणि
यासारखे मैदानी खेळ हे एकमेकांच्या अंगाला घासून, खेटून व
एकमेकांना धरून, रेटून, खाली पाडून
करण्यासारखे खेळ आहेत. असे खेळ स्त्री आणि पुरुष एकत्र
खेळणे हे सामाजिक तसेच नैतिक दृष्ट्या योग्य तर नाही पण व्यवहार्य देखील नाही.
म्हणून संघ शाखेमध्ये, जी केवळ पुरुषांसाठी असते, त्यामध्ये महिलांची
उपस्थिती अपेक्षित नसते. परंतु याचा अर्थ असा नाही की
संघामध्ये स्त्रियांना बंदी आहे. संघाच्या बैठका, कार्यक्रम, बौद्धिक तसेच सहा उत्सवांमध्ये महिला
भाग घेऊ शकतात, एवढेच नव्हे तर संघ शाखांमध्ये प्रार्थनेच्या
वेळी महिला उपस्थित राहून भाग घेऊ शकतात. फक्त स्त्री
आणि पुरुष हे एकत्र मैदानी खेळ खेळणे याला
समाजाची
व महिलांची मान्यता नसल्यामुळे, संघाची देखील मान्यता नाही व यामुळे संघ शाखांमध्ये महिला अपेक्षित
नाहीत.
समाजामध्ये पुरुषांसाठी व स्त्रियांसाठी
वेगवेगळी स्वच्छतागृहे, आरामगृहे असतात. एवढेच नव्हे तर रेल्वेमध्ये महिलांसाठी स्वतंत्र डबे देखील असतात.
यामागे महिलांना कमी लेखणे नव्हे तर उलट त्यांचा आत्मसन्मान शाबूत
रहावा, त्यांच्या विनयाला धोका उत्पन्न होवू नये, त्यांना प्रायव्हसी मिळावी व
आजूबाजूला केवळ महिला असल्यामुळे वर्तनाची मोकळीक मिळावी असाच उदात्त हेतू असतो. परंतु हे समजून न घेता छद्म सेक्युलर, नास्तिक, छद्म फेमिनाइन,
पाश्चिमात्य संस्कृतीला चटावलेले व विकृत
विचारसरणीचे संघावर निष्कारण
टीका करत असतात.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची
भूमिका जरी वरीलप्रमाणे असली तरी संघाच्या इतर सर्व भातृ संघटनांमध्ये महिलांना प्रवेश, मुक्त वाव व संधी आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद,
भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद,
वनवासी कल्याण आश्रम
यासारख्या सर्व संघ प्रणित संघटनांमध्ये महिला आज पुरुषांच्या बरोबरीने काम करीत
आहेत.
पण त्याचबरोबर जसे पुरुषांना
शारीरिक व संरक्षण विषयक प्रशिक्षण संघ शाखेमध्ये मिळते तसेच प्रशिक्षण महिलांनाही मिळावे या समानतेच्या
भावनेने संघ विचारांच्या लक्ष्मीबाई
केळकर उपाख्य मावशी यांच्या सारख्या काही भगिनींनी एकत्र येत राष्ट्रीय
स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक
डॉक्टर हेडगेवार यांच्या प्रेरणेने १९३६ साली विजयादशमीच्या दिवशी राष्ट्र
सेविका समितीची स्थापना केली. या केवळ महिलांसाठी असलेल्या
संघटनेची स्थापना केली. राष्ट्र सेविका समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या दोन
संघटनांच्या शाखांमध्ये फारसा फरक नाही. फरक फक्त एवढाच
की संघाच्या शाखेमध्ये पुरुष तर समितीच्या शाखेमध्ये स्त्रिया अपेक्षित असतात. इथे एक गोष्ट मुद्दाम नमुद करावी लागेल ती ही की समितीची प्रार्थना व संघाच्या
प्रार्थनेहून थोडीशी भिन्न आहे. दोन्ही प्रार्थनेतील भाव जरी समान असला तरी
समितीची प्रार्थना महिला म्हणत आहेत हे लक्षात ठेवून त्या प्रार्थनेत
स्त्रीतत्वाला प्राधान्य देत त्याची रचना करण्यात आली आहे हे विशेष.
आज समितीच्या देशभरात ५ हजार शाखा असून त्यामध्ये ३ लाखाहून
अधिक युवती व महिला स्वयंसेविका म्हणून आपले योगदान देत आहेत. ज्याप्रमाणे संघ राष्ट्रीय आपदेच्या वेळी सर्वप्रथम धावून जात जातो
त्याचप्रमाणे समिती देखील अशा प्रसंगी आपले योगदान देते.
हिंदू महिलांना स्वसंरक्षणाचे, आत्मनिर्भरतेचे, राष्ट्रप्रेमाचे धडे देत असतानाच या महिलांना स्वतःच्या पायावर उभे
राहण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देखील समिती देत असते. त्याच प्रमाणे दैनिक
आणि साप्ताहिक शाखांचे आयोजन करत असतानाच, शारीरिक शिक्षण, बौद्धिक विकास, व्यक्तिमत्व विकास, नेतृत्व विकास, निर्णय क्षमता संभाषण कला आणि मनोबल वाढविण्यासाठी विविध
कार्यक्रम सुरू करणे, वन शिबिरे आयोजित करणे, अखिल भारतीय आणि राज्य आणि विभागीय पातळीवर विविध
विषयांवर परिषदा आयोजित करणे, महिला
व बालकांसाठी आरोग्य शिबिर, वसतिगृह, उद्योग मंदिर, बाल
मंदिर, संस्कारवर्ग यासह आपलेपणाच्या भावनेने विविध सेवा
उपक्रम करणे, जगात हिंदू धर्माचा प्रसार आणि हिंदू बांधवांचे
संघटन करणे आदी अनेकविध कार्य समिती तर्फे होत असते.
आजपर्यंत मावशी लक्ष्मीबाई केळकर
(१९३६ ते १९७८), सरस्वतीताई आपटे, (१९७८ ते १९९४) उषाताई चाटी, (१९९४ ते २००६) प्रमिलाताई
मेढे (२००६ ते १०१२) यांनी समितीच्या ‘प्रमुख संचालिका’ पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली होती. २०१२ पासून आजमितीला
वी॰
शान्ताकुमारी उपाख्य 'शान्ताक्का' समितीच्या ‘प्रमुख संचालिका’ आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
विचारांच्या मुशीत तयार झालेली व राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई
होळकर यांना आपले आदर्श मानणारी समिती भारतमातेसाठी सुसंस्कृत, तेजस्वी, राष्ट्रप्रेमी, हिंदू
धर्माभिमानी व कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची तयारी
असलेल्या वीरांगनांची एक मोठी
फौजच्या फौज तयार करत आहे ही आपल्या सर्वांसाठी एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा