राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
गुरुवार, १५ मे, २०२५
सु-विचार-दर्शन
सरसंघचालक सुदर्शनजी यांचा भारतीय संस्कृती तसेच वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण,
महाभारत, धर्मशास्त्र व इतिहास या
विषयांचा गाढा अभ्यास होता. प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या
सुदर्शनजींचा इस्लाम व ख्रिश्चन धर्मग्रंथांचाही अभ्यास होता. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वात नेहमी हिंदू धर्माप्रमाणे इतर
धर्माचाही उल्लेख यायचा. वेद हेच प्रमाण आहेत व
वेदांमध्ये कुठेही अस्पृश्यतेचा, वर्णव्यवस्थेचा किंवा जातीव्यवस्थेचा
उल्लेख नसल्यामुळे हिंदू धर्माला जातीभेद मान्य नाही असे त्यांचे मत होते.
एवढेच नव्हे तर वेदानंतर आलेल्या काही ग्रंथांमध्ये तसेच
शास्त्रामध्ये जर जातीव्यवस्थेचा उल्लेख असेल तर ते ग्रंथ व शास्त्र मानण्याची व
त्याप्रमाणे अनुकरण करण्याची काहीही गरज नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. सामाजिक
समरसतेचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू समाजामध्ये असलेला जातिवाद, उच्च-नीच भेदभाव हा त्यांना पूर्णपणे अमान्य
होता.
स्वतः उच्चशिक्षित अभियंता असल्यामुळे ते अचूक
तर्कशास्त्र मांडीत व पाखंडी तसेच पुराणमतवादी आणि आधुनिक समाज निर्मितीला विरोध
करणाऱ्यांना उघडे पाडीत असत.
संघ शाखा व संघ प्रार्थना याचे
महत्त्व सांगताना सुदर्शनजी म्हणतात की “एका ठराविक वेळी व ठराविक जागेवर
नेहमी जमणे, मातृभूमीबद्दल एकसारखा विचार करणे, तिचे एकसारखे स्मरण करणे, एकसारखी प्रार्थना म्हणणे
हे सर्व काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे अभिन्न अंग आहे, संघाची प्रार्थना आत्मसात करणे किंवा अंगीकारणे याचा अर्थच संघाचे विचार
व संघभाव आत्मसात करणे किंवा अंगीकारणे होय”
हिंदूंसमोर असलेल्या आव्हानाची हिंदू समाजाला जाणीव
करून देताना व ‘चला उठा सज्ज व्हा’ हा संदेश देत असताना सुदर्शनजी
म्हणतात की “हिंदुत्वनिष्ठ शक्ती तसेच हिंदुत्व विरोधी शक्ती
या दोन्ही आज मैदानात समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. आतापर्यंत तर या शक्ती आपापल्या आखाड्यात सराव करत
होत्या. आपापले दंड फुगवत होत्या. पण आज प्रत्यक्ष
रणांगणावर महाभारताच्या युद्धासारख्या उभ्या आहेत. आता तर ‘न दैन्यम न पलायनम’ यासारखी स्थिती आली आहे. वैचारिक, संघटनात्मक तसेच शारीरिक पातळीवर सुद्धा आता लढण्याची आवश्यकता आहे”
‘वसुधैव कुटुम्बकम’ हे जरी आपले
ब्रीदवाक्य असले तरी ते साकार करण्यासाठी संपूर्ण जगाचे मानवजाती संबंधी तसेच निसर्गाप्रतीचे नियम सारखेच हवेत
याबद्दल ते आग्रही होते. त्या संदर्भामध्ये वक्तव्य करताना
सुदर्शनजी म्हणतात की “व्यक्ती, समाज, प्रकृती आणि परंपरा यांच्यामधील संबंध ठरविण्याचे जेवढे काही नियम आहेत
ते केवळ फक्त भारताला किंवा हिंदूंनाच लागून आहेत असे
नाही तर ते साऱ्या विश्वाला लागू आहेत. म्हणून तर याला ‘मानवधर्म’ असे म्हटले जाते. हे सिद्धांत कालही सत्य होते, आजही सत्य आहेत आणि भविष्यातही तेवढेच सत्य राहतील.
सनातन धर्म, हिंदू धर्म, मानवधर्म हे
सर्व समानार्थी शब्द आहेत”
अस्पृश्यता ही हिंदू समाजामध्ये असलेले सर्वात मोठी
कुप्रथा अर्थात वाईट गोष्ट आहे हे ते अगदी निसंकोचपणे सांगतात व समरसतेचा आग्रह धरतात. अशावेळी सुदर्शनजींच्या अंतःकरणात असलेला सुधारणावादी हिंदू म्हणतो की “हिंदू समाजात अतिशय श्रेष्ठ असे विचार असूनही कालांतराने अशा अनेक कुप्रथा त्यात घुसविण्यात आल्या. ज्यामुळे शत्रू आपला पराभव करू शकला. यातील सर्वात वाईट म्हणजे जातीच्या नावावर हिंदूंमध्ये असलेली अस्पृश्यता
होय”
भारतीय शब्दांना इंग्रजी भाषेत असलेले प्रतिशब्द हे
पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी भाषेमध्ये असलेले प्रतिशब्द हे भारतीय भाषांमध्ये
असलेल्या शब्दांचे अचूक वर्णन व त्या मागील भावना व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे धर्म, संस्कृती,
राष्ट्रवाद, देश, सभ्यता सारख्या भारतीय शब्दांचे अचूक प्रतिशब्द किंवा
पर्यायी शब्द इंग्रजी भाषेमध्ये नसल्यामुळे पाश्चिमात्य जगताला भारताच्या
अध्यात्मिक ज्ञानाची खरी ओळख होत नाही. यावर मत व्यक्त करत असताना सुदर्शनजी
म्हणतात की “हिन्दुस्तानात प्रचलीत
असलेले धर्म, राष्ट्र व
संस्कृती अर्थात सभ्यता यांना इंग्रजीत रिलीजन, नेशन आणि सिव्हिलायझेशन हे जे प्रतिशब्द वापरले जातात ते पर्यायी शब्द नाहीत. त्यांच्या अर्थात बराच फरक आहे”.
धर्म म्हणजे कर्तव्य व रिलिजन म्हणजे उपासना पद्धती. जागतिक पातळीवर
धर्माची व्याख्या करत असताना सुदर्शनजी म्हणतात ही “धर्म म्हणजे रिलिजन नाही. आपल्याकडे धर्माचे चार भाग
आहेत. एक आपण स्वतः, दुसरा समाज,
तिसरी प्रकृती अर्थात निसर्ग व चौथा भाग म्हणजे परमात्मा. या चौघांमध्ये कोणत्याही
आडकाठीशिवाय समजुतदारपणे व्यवहार करण्यासाठी जी काही व्यवस्था अथवा नियम आहेत ते सर्व
धर्माच्या आचरणाखाली येतात”. थोडक्यात
अशा सर्व नियमांचे पालन करणे म्हणजेच धर्माचे पालन करणे होय.
सुप्रसिद्ध पत्रकार एम. ए. अकबर एकदा म्हणाले होते की ‘इंडिया इज सेक्युलर नॉट बिकॉज गांधी वॉज सेक्युलर. गांधी वॉज सेक्युलर बिकॉज इंडिया इज सेक्युलर.’ हे विधान करण्यापूर्वी कदाचित एम. ए. अकबर यांच्या वाचनात
सुदर्शनजींचे “हा देश सर्व-धर्म-समभाव मानतो
कारण या देशात हिंदू बहुसंख्यांक आहेत” हे विधान आले असावे व त्यावरूनच त्यांनी प्रेरणा घेतली असावी असे वाटते.
अनेक भाषा अवगत असलेले सरसंघचालक सुदर्शनजी यांचे
विचार हे सनातन संस्कृतीचे ‘सार’ आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा