राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, १४ मे, २०२५

 

गुरुजींचे विचारधन


प्रचंड बुद्धिमत्ता असलेले संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी हे जेवढे स्पष्टवक्ते होते तेवढेच ते निर्भीड लेखकही होते.  आपले विचार कोणाला पटोत वा ना पटोत, ते राष्ट्राच्या भल्यासाठी व हिंदू समाजाच्या हितासाठी आहेत याची त्यांना पूर्ण खात्री होती आणि त्यामुळे ते नि:संकोचपणे मांडत. गुरुजींचे तर्कज्ञान अतिशय प्रगल्भ होते. भाषेवर त्यांची पकड होती. त्यामुळे अतिशय कमी शब्दांमध्ये ते संदेश पोहोचविण्यात यशस्वी झाले. गोळवलकर गुरुजींनी अनेक  पुस्तके लिहिली. लेख    विविध लोकांना लिहिलेल्या पत्राद्वारे, तसेच जाहीर सभेत, संघ शिबिरात व संघाच्या कार्यक्रमात त्यांनी आपले विचार मांडले. या सर्व विचारांमागे एका प्रखर राष्ट्रभक्ताची राष्ट्राप्रती असलेली समर्पितता, निष्ठा, अभिमान व प्रेम आहे तसेच देशबांधवांबाबत अपार करुणा आहे हे आपल्या लक्षात येते.


एका पत्रकाराने गुरुजींना प्रश्न केला की “भारत केवळ हिंदूंसाठीच आहे का?” त्यावर गुरुजींनी दिलेले “हिंदूंसाठी केवळ भारतच आहे” हे उत्तर समस्त हिंदूंनी कायमचे लक्षात ठेवून वागण्याची गरज आहे. परदेशात होणाऱ्या स्त्रियांच्या सौंदर्यस्पर्धेसाठी जेव्हा भारतात निवड प्रक्रिया सुरू होती तेव्हा ते अतिशय मार्मिकपणे म्हणाले होते की “ वूइ रियली मिस इंडिया इन द होल अफेअर


हिंदू जीवनपद्धती आणि सेवाभाव यांच्यामधील परस्पर संबंध वर्णन करताना गुरुजी म्हणतात की सेवा हे हिंदू जीवनपद्धतीचे एक प्रमुख अंग आहे. निस्वार्थ बुद्धीने सेवा करणे हा हिंदूंचा स्वभाव आहे. जिथे स्वार्थ आहे तिथे सेवा होऊ शकत नाही. जिथे स्वार्थाचा शिरकाव होतो तिथे सेवा न राहता व्यापार होतो”.


गुरुजी स्वदेशीचा आग्रह धरत. स्वदेशीमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो. वस्तू माफक किमतीत मिळतात. एवढेच नव्हे तर स्वदेशी वस्तू त्यामानाने पर्यावरणपूरक असल्यामुळे निसर्गाची हानी टळते. जोडीस जोड म्हणून परकीय चलनही वाचते.  याबाबत आपले विचार स्पष्ट करताना गुरुजी म्हणतात की स्वदेशीच्या विषयावर फार काही बोलण्याची आवश्यकता नाही. स्वराज्य मिळविण्याचे मुख्य अस्त्र हे स्वदेशी आहे. त्यानंतर स्वराज्याला सुरक्षित ठेवण्याचा आधार पण स्वदेशी आहे. आम्ही सुद्धा संघाच्या माध्यमातून काम करताना स्वदेशीचा आग्रह तीव्र करून त्याचा प्रचार करण्याचा निश्चय केला आहे” 


भारतीय भाषांना प्राधान्य मिळाले पाहिजे हे गुरुजींचे मत होते. ते इंग्रजीचा दुस्वास करीत नसत. परंतु भारतीय भाषांवर परकीय भाषांनी कुरघोडी करणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर मध्यप्रदेश सरकारने जेव्हा प्रथमच हिंदी मराठी भाषांचा राज्यात वापर करण्याचा अध्यादेश काढला तेव्हा गुरुजींनी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. त्यात ते म्हणाले की आजपासून आपण एका कायद्याद्वारे मध्यप्रदेशमधील राज्यशासनात इंग्रजीला दूर करून मराठी तसेच हिंदी या दोन भाषांचा व्यवहारात उपयोग करण्यास सुरुवात केली आहे हे ऐकून मला अतिशय प्रसन्नता वाटली  व माझे पूर्ण समाधान झाले” 


श्रद्धेच्या विषयावर भाष्य करताना गुरुजी अतिशय स्पष्टपणे म्हणतात की जेव्हा विषय श्रद्धेचा असतो तेव्हा त्याला आर्थिक मापदंड लावणे योग्य नाही. जर कोणी आपल्या देशाचा ध्वज तोडून फोडून टाकला तर काय फारसा फारसे आर्थिक नुकसान होणार आहे? एक दांडी, थोडासा कपडा एवढेच त्याचं आर्थिक रूप आहे. परंतु जर एखाद्या शत्रूने आपल्या राष्ट्रध्वजाचा असा अपमान केला तर ध्वजाच्या रक्षणासाठी आपण आपले प्रचंड पैसे व असंख्य लोकांचे प्राण पणाला लावून त्याचे रक्षण करण्यासाठी सज्ज होतो. हेच आपले कर्तव्य आहे. देशाला एकत्रित करण्यासाठी व चैतन्य निर्माण करण्यासाठी कितीही धनदौलत व प्राण खर्च झाले तरी ते समर्थनीय आहे” 


जिवंत राहायचं असेल तर ताकदवान बनवण्यास पर्याय नाही असे मत व्यक्त करताना गुरुजी सांगतात की याला योग्य म्हणा किंवा अयोग्य, पण परिस्थिती अशी आहे की या जगात जो ताकदवान आहे तो दुर्बळावर हल्ला केल्याशिवाय रहात नाही. पंचशील आणि सहजीवन यांच्या संदर्भात आपण कितीही घोषणा केल्या तरी ताकदवान आणि दुर्बळ यांच्यातील सहजीवनाची रम्य कल्पना संपूर्ण जगामध्ये आजपर्यंत सत्यात उतरलेली दिसली नाही. जीवनातील कटू सत्याचा विचार करून व प्रत्यक्ष अनुभवाने आपल्या पूर्वजांनी जीओ जीवस्य जीवनम् असे म्हटले आहे ते खर आहे. त्यामुळे व्यक्तीला किंवा राष्ट्राला स्वतःला जिवंत ठेवायचं असेल तर त्याला स्वतःलाच ताकदवान बनावं लागेल. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करण्याचा कोणी विचारही करणार नाही” 


भारताने अणुबॉम्ब बनवावा या ठाम मताचे गुरुजी होते. म्हणून त्यांनी सरकारला असा सल्ला दिला की आपण अशी शस्त्रास्त्र बनवली पाहिजेत की जी शत्रूंकडे असलेल्या शस्त्रास्त्राहून अधिक प्रभावी असायला हवीत. शत्रूराष्ट्राकडे जर अणुबॉम्ब असेल तर आपल्याकडेही तो असणे आवश्यक आहे. यामुळेच लढाईतील अंतिम विजय आपलाच असणार याबद्दल सेनेला व जनतेला विश्वास वाटेल” 


देश आत्मनिर्भर असावा असं त्यांचं मत होतं. जो देश इतर देशांच्या मदतीवर अवलंबून आहे तो देश स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकणार नाही. यामुळे गुरुजी म्हणतात की सर्व शेतकरी, कामगार, उद्योजक तसेच जीवनातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या बंधूंनी आपल्या सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनवाढीसाठी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे. अगदी अन्नधान्यांसाठी देखील आपण दुसऱ्यावर अवलंबून आहोत हे कुठेतरी थांबलं पाहिजे” 


अस्पृश्यतेच्या प्रश्नाचे मूळ कारण स्पष्ट करताना गुरुजी म्हणतात की आश्रित आणि आश्रयदाता या भूमिकाच मुळी अशास्त्रीय आहेत. अस्पृश्यता ही केवळ अस्पृश्यांचाच प्रश्न नसून तथाकथित सवर्ण लोकांच्या मनातील जो संकुचित भाव आहे तेच अस्पृश्यतेचे मूळ आहे. जोपर्यंत सवर्णांच्या मनातील अस्पृश्यता समाप्त होत नाही तोपर्यंत ही समस्या संपूर्णपणे नष्ट होणार नाही. परस्परांबद्दलच्या आत्मीयतेने व कौटुंबिक संबंधानेच हा प्रश्न सुटू शकतो” 


संघ ही उत्तम माणूस घडविण्याची फॅक्टरी आहे ही कल्पना स्पष्ट करताना गुरुजी म्हणतात की काम कोणतेही असो, ते यशस्वी करण्यासाठी चांगल्या लोकांची आवश्यकता असते. ज्यांच्या हृदयात समाजाबद्दल आत्मीयता आहे, समाज कल्याणाची भावना आहे, जी लोकं समाजातील दुःख पाहून व्यथित होतात, अशी लोकं आपल्याला समाजात निर्माण करावी लागतील. अशा माणसांच्या मनामध्ये कोणताही वैयक्तिक स्वार्थ नसेल आणि समाज कल्याणासाठी कितीही त्रास सहन करण्याची शक्ती असेल. देशाच्या विविध भागात आपल्या शाखांच्या माध्यमातून आपण अशी माणसे निर्माण करीत आहोत


पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयाची कल्पना मांडली. परंतु या कल्पनेचे बीज गुरुजींनी आधीच पेरून ठेवले होते. यासंदर्भामध्ये गुरुजी म्हणतात की सर्व समाज आपला आहे असे मानणे, सर्व समाजाचा विचार करणे आणि प्रत्येक व्यक्ती स्वतःच पालनपोषण करण्यात सक्षम होईल एवढा स्वाभिमान त्याच्यात निर्माण करणे हाच खरा धर्म आहे. जेवढे जेवढे म्हणून दुःखी-कष्टी लोक आहेत ते सर्व ईश्वराचे स्वरूप आहे. प्रत्यक्ष परमेश्वराने त्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला दिली आहे असे समजून त्यांची सेवा करणे हाच खरा धर्म आहे” 


भारतीय जीवन पद्धती संस्कृती आणि परंपरा यांच्यावर भाष्य करत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हेतूही गुरुजी स्पष्ट करतात व सांगतात की आपण सारे एक आहोत. आपली संस्कृती, आपली परंपरा एक आहेआपली राष्ट्रीय  जीवनपद्धती एक आहे. आपला इतिहास एक आहे. या साऱ्यांबद्दल अभिमान बाळगून, ज्ञान प्राप्त करून आत्मविश्वास, पुरुषार्थ तसेच पराक्रमाच्या आधारावर भारतीय संस्कृतीच्या परंपरागत विचारधारेच्या माध्यमातून संपूर्ण समाजाला उपयुक्त अश्या एका विशाल राष्ट्राची निर्मिती करायची आहे” 


गुरुजींचे विचार हे कालातीत आहेत व ते सर्व मानवजातीला दीपस्तंभाप्रमाणे सदैव मार्गदर्शक ठरतील यात कोणतीही शंका नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा