राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शनिवार, १० मे, २०२५
भारतीय मजदूर संघ
युरोपमधल्या औद्योगिक
क्रांतीनंतर उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिने भांडवलदारांनी यंत्रसामुग्रींनी
अद्ययावत असे कारखाने उभारले. या
कारखान्यातील कामगारांच्या पिळवणुकीतून भांडवलदारांना फायदा होऊ लागला व त्यातूनच
कालांतराने मालक व कामगार हा वर्ग-संघर्ष
उभा राहिला.
युरोप व अमेरिकेमध्ये याच वर्ग-संघर्षातून
कामगार संघटनांचा उदय झाला.
परंतु भारतामध्ये हा इतिहास
नव्हता. प्रचंड लोकसंख्या असल्यामुळे भारतात
कुशल मनुष्यबळ नेहमीच उपलब्ध असे. पारंपारिकरित्या काम करणाऱ्या बारा बलुतेदारांसोबत काम
करण्यासाठी एक तर त्यांच्या घरचे, जवळचे किंवा गावातलीच लोक
उपलब्ध होत असत. त्यामुळे त्यांचा छळ किंवा पिळवणूक करणं असा प्रकार भारतात
तरी नव्हता. इंग्रज येण्यापूर्वी कामगारांचा संघर्ष वगैरे प्रकारच भारतात
नव्हता.
ईस्ट इंडिया कंपनीसोबत जसा
व्यापार आला तसे कारखाने देखील आले व
हळूहळू युरोप व अमेरिकेमध्ये जसा कामगार-मालकांमध्ये संघर्ष उभा राहिला तसा भारतामध्ये देखील उभा
राहिला. १८७० मध्ये ब्राह्मो समाजाचे नेते शशीपाद बॅनर्जी यांनी
कलकत्ता येथे ‘वर्किंग मेन्स क्लब’ नावाची
एक संघटना स्थापन केली व ‘श्रमजीवी
भारत’ नावाचे पहिले कामगार मासिक प्रकाशित केले. १८८४ मध्ये
आधुनिक कामगार संघटना चळवळीचे जनक नारायण लोखंडे
यांनी मुंबईतील कामगारांना संघटित केले.
आधुनिक भारतातील कामगार
क्षेत्राचे वर्णन तीन भागात करता येईल. पहिला, कामगार क्षेत्रात वर्ग-संघर्षाच्या निमित्ताने, कम्युनिस्ट विचार पसरविण्याच्या उद्देशाने काम करणाऱ्या
डाव्या संघटनांचा कालखंड तर दुसरा, सत्तारूढ काँग्रेसच्या ‘कव्हर’ खाली व प्रसंगी सरकारच्या पाठींब्याने कायदे वाकवून कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या व त्यांच्या मतांच्या बदल्यात
सतत सत्तेत राहणाऱ्या काँग्रेसी नेत्यांच्या संघटनांच्या
भरभराटीचा कालखंड.
तर तिसरा, कारखानदार व कामगार हे
एकमेकांचे शत्रू नसून ते एकमेकांना पूरक आहेत, दोघांच्याही हितात परस्परांचे
हित दडलेले आहे, राष्ट्र व समाज यांचे हित हे कारखानदार व कामगार यांच्या
हिताहून सर्वपरी आहे आणि त्यामुळे कोणी कोणाला ब्लॅकमेल न करता एकमेकांना
त्यांच्या न्याय गोष्टी मिळाल्या पाहिजे यासाठी प्रयत्न करणाऱ्या, कामगारांचे हित जपणाऱ्या व कामगार हितासाठी प्रसंगी सरकारशी दोन हात करणाऱ्या ‘भारतीय मजदूर संघाच्या’ प्रभावाचा कालखंड.
अनेक वर्षांच्या साम्यवादी
विचारसरणीच्या कामगार संघटनांमध्ये प्रत्यक्ष अनुभव घेऊन, त्यांची काम करण्याची पद्धती, ध्येय, धोरण, घटना आदी संपूर्ण गोष्टींचा अभ्यास करून लोकमान्य बाळ
गंगाधर टिळक यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत २३ जुलै १९५५ रोजी दत्तोपंत ठेंगडी या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जेष्ठ स्वयंसेवकाने भारतीय
मजदूर संघाची स्थापना
केली. त्यावेळी विविध
राज्यांमधून फक्त ३५ कामगार उपस्थित होते. इथपासून सुरुवात करून ‘भामसं’ ही केवळ भारतातलीच नव्हे तर आज जगातील सर्वात मोठी कामगार संघटना झाली आहे. तसं पाहिलं तर साम्यवादी चीनमध्ये असलेली कामगार संघटना ही ‘भामसं’ हूनही मोठी आहे. परंतु ती संपूर्णपणे चीन
सरकारच्या आधीन असून त्यांना कामगारासंबंधी निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य
नाही. केवळ सरकार ठरवेल त्याप्रमाणे वागण्याएवढेच त्यांचे स्वरूप
असल्यामुळे चीनमधील कामगार संघटनेला खऱ्या अर्थाने कामगारांची संघटना असे म्हणता
येत नाही.
‘भामसं’ च्या स्थापनेवेळी भारतामध्ये केंद्रात व अनेक राज्यात
काँग्रेसचे सरकार होते. बंगाल, केरळा, त्रिपुरा आदी राज्यात कम्युनिस्टांचे
प्राबल्य होते. राजकीय पाठिंब्यांमुळे काँग्रेस प्रणित ‘इंटक’ व कम्युनिस्टांच्या ‘सीटू’ किंवा ‘आयटू’ या कामगार संघटना नुसत्या
मजबूत नव्हे तर माजोरड्या आणि भ्रष्टपण झाल्या होत्या. अनेक प्रसंगी ‘बंद’ चा धाक दाखवून मालकांना
ब्लॅकमेल करायचे व पैसा कमवायचा हा या लोकांचा एकमेव कार्यक्रम असायचा. त्याचबरोबर वाटाघाटी दरम्यान
मालकांबरोबर संगनमत करून व त्यांच्याकडून पैसे घेऊन कामगारांना कमी वेतनात करार
मान्य करण्यास भाग पाडायच्या. अशा रीतीने यातील बहुतेक संघटना या त्या संघटनेत काम
करणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या व त्या-त्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची कुरण झाली होती. अशा
रीतीने कामगार संघटनांच्या माध्यमातून त्या-त्या पक्षाने प्रचंड पैसा कमावला. त्यामुळे त्यांना कधीही
कामगारांच्या बाजूचे किंवा कामगारांच्या फायद्याचे धोरण राबविता आले नाही. शेवटी यात कामगारच भरडला गेला. मुंबईमधील गिरणीचा संप हे
त्यातील एक अतिशय मोठे उदाहरण आहे.
वर सांगितल्याप्रमाणे ‘भामसं’ च्या स्थापनेच्या वेळी आणि त्यानंतर एखाद दुसऱ्या राज्याचा
अपवाद वगळता ‘भामसं’ ला मदत करेल असे ना केंद्राचे धोरण होते ना कोण्या
राज्याचे. एवढेच नव्हे तर काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्या कामगार
संघटनांमध्ये असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांकडून सातत्याने होणारे हल्ले, मारहाण, दहशत याला सुद्धा ‘भामसं’ च्या कार्यकर्त्यांना सामोरे जावे लागत असे.
वेगवेगळ्या कामगार कायद्यांमुळे
कित्येक वेळा मालक देखील निरुपायाने काँग्रेस किंवा कम्युनिस्ट कामगार
संघटनांबरोबरच वाटाघाटी करण्यासाठी बाध्य असे. मान्यताप्राप्त युनियन म्हणून
काँग्रेस किंवा कम्युनिस्ट संघटनांनी आधीच मान्यता मिळवली असल्यामुळे त्यांच्या बरोबरच वाटाघाटी करणं हे मालकाला देखील कंपल्सरी होतं. याचाच फायदा या कामगार
संघटनांना मिळत असे. ‘बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन एक्ट’ सारखा कायदा करून काँग्रेसने तर कित्येक सरकारी ऑर्गनायझेशन आपल्यामध्ये आणि कम्युनिस्टांमध्ये वाटून
घेतल्या होत्या. एवढेच नव्हे तर त्या कायद्यान्वये त्यांना संपूर्णपणे
वाटाघाटीचे अधिकार दिले होते. हे अधिकार एवढे भयानक होते की जरी १००% कामगारांना वाटाघाटी मान्य
नसल्या व ते दुसऱ्या एखाद्या युनियनचे सभासद होऊन पुन्हा वाटाघाटी कराव्यात अशा
मताचे असले तरी तसे करण्यास या कायद्यान्वये मनाई होती.
अशा अतिशय विपरीत
परिस्थितीमध्ये ‘भामसं’ स्थापन करणे, वाढवणे व भारतातीलच
नव्हे तर जगातील सगळ्यात मोठी कामगार संघटना
बनवणे हे भागीरथ काम दत्तोपंत ठेंगडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले हा विसाव्या शतकातील एक मोठा चमत्कारच म्हणावा लागेल.
इतिहासकार
शिकागोच्या कामगारांनी ८ तास काम करण्याची मागणी करणाऱ्या जगातील पहिल्या
आंदोलनाच्या घटनेचे प्रतीक म्हणून १ मे हा कामगार दिन म्हणून साजरा करतात. पण त्या घटनेच्या २४ वर्षांपूर्वी, एप्रिल-मे
१८६२ च्या काळात,
हावडा येथील सुमारे १,२००
रेल्वे कामगारांनी याच मागणीसाठी संप केला होता याकडे जाणीवपूर्वक
दुर्लक्ष करतात. त्याप्रमाणे भारतातील मीडिया कम्युनिस्ट किंवा
काँग्रेसप्रणित कामगार संघटना ही भारतातील सर्वात मोठी कामगार संघटना आहे असा भ्रम पसरवितात.
आज हिरणमणी पंड्या
यांच्या अध्यक्षतेखाली, सरचिटणीस रवींद्र हिमते यांच्या नेतृत्वाखाली ‘भामसं’ कामगार
क्षेत्रात काम करीत आहे. भारतातील
प्रत्येक राज्यात, विभागात, क्षेत्रात मग ते सरकारी मालकीचे
सार्वजनिक क्षेत्र असो की खाजगी क्षेत्र असो,
उत्पादन
किंवा सेवा क्षेत्र असो, संघटित
किंवा असंघटित क्षेत्र असो,
प्रत्येक क्षेत्रात ‘भामसं’ ही
मान्यताप्राप्त कामगार संघटना म्हणून आपला ठसा उमटवीत आहे. लाखो कारखाने, संस्था, बँका, सरकारी उद्योग यामध्ये अक्षरशः
करोडो कामगारांचे नेतृत्व करणारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांवर कामगार
क्षेत्रात काम करणारी खऱ्या अर्थाने एकमेव राष्ट्रीय कामगार संघटना आहे. एकीकडे कम्युनिस्ट आणि
काँग्रेसच्या कामगार संघटनांच्या चिरफाळ्या उडत असताना कलेकलेने वाढत जाणाऱ्या
चंद्राप्रमाणे ‘भामसं’ वाढत
आहे,
विस्तारत आहे व लोकप्रिय होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा