राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, १४ मे, २०२५

 

केशव वा


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी चिंतन, मनन व प्रचंड विचारमंथन करून संघस्थापना केली. जगातील सर्वात मोठ्या अराजकीय व बिनसरकारी संघटनेला गेली ०० वर्ष अविरतपणे नुसते कार्यरत ठेवण्यासाठीच नाही तर उत्तरोत्तर संघटना वाढीसाठी जो वैचारिक पाया लागतो तो त्यांनी तयार केला. आपल्या १५ वर्षाच्या संघआयुष्यात त्यांनी अनेक भाषणे, बौद्धिके, लेख व मुलाखतीद्वारा संघाच्या ध्येय-धोरणाबद्दल जे विचार मांडले ते १०० वर्षानंतर आजही तेवढेच महत्त्वाचे व देशाला तसेच हिंदू समाजाला दिशादर्शक आहेत.


हिंदू आणि हिंदुस्तान यांचे नाते उलगडून दाखवताना संघाचे संस्थापक म्हणतात की संघाला 'हिंदूंचा हिंदूस्थान' हे ब्रीदवाक्य खरे करून दाखवायचे आहे. इतर राष्ट्रांप्रमाणे (उदा. जर्मन लोकांचा जर्मनी, फ्रेंच लोकांचा फ्रांस इत्यादी) हे हिंदू लोकांचे राष्ट्र आहे. केवळ एखाद्या जमिनीच्या तुकड्याला 'राष्ट्र' ही संज्ञा प्राप्त होऊ शकत नाही. जिथे एका विचाराचे, एका संस्कृतीचे व एका परंपरेचे लोक, सनातन काळापासून राहत आले, त्या लोकांचे ते 'राष्ट्र' बनत असते. याच कारणामुळे या देशाला 'हिंदूस्थान' हे नामानिधान प्राप्त झाले आहे. अगदी निर्भय वृत्तीने 'हिंदूंचा हिंदुस्थानही घोषणा करा. मनाचा कमकुतपणा सर्वस्वी नष्ट करा. गैर-हिंदूंनी व परकीयांनी या देशात राहू नये असे आमचे म्हणणे नाही. परंतु त्यांना या गोष्टीची जाणीव असावयास पाहिजे की ते हिंदूंच्या हिंदुस्थानात राहत आहेत. हिंदूंच्या अधिकारावर त्यांना अतिक्रमण करता येणार नाही. संघ हा परकीय किंवा परधर्मीय अशा कोणत्याही लोकांचा कधीही तिरस्कार किंवा द्वेष न करता केवळ हिंदू संघटनाचे काम करीत असल्यामुळे याला 'कम्यूनल' हा शब्द लागू शकत नाही".


छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पराकोटीचा आदर व्यक्त करत हे महान राष्ट्रभक्त म्हणाले की शिवाजी महाराजांना आदर्श ठेवले तर त्यांनी हिंदुत्वाच्या रक्षणार्थ जे पराक्रम केले ते आठवतात. जितके सामर्थ्य भगव्या ध्वजाचे आहे, तितकेच शिवरायाचे आहे. जो इतिहास ध्वजाच्या दर्शनाने आठवतो आणि त्यापासून जी स्फूर्ति मिळते, तीच स्फूर्ति शिवरायाच्या चारित्रापासून मिळते. जो ध्वज खरोखरीच धुळीत पडला होता, तो शिवरायाने उचलून हिंदुपदपादशाहीची प्राणप्रतिष्ठा केली व मरू घातलेले हिंदुत्व जागवले. तेव्हा तुम्हाला जर व्यक्ती आदर्श ठेवायची असेल तर शिवरायालाच ठेवा.


हिंदूंच्या पीछेहाटीचे कारण स्पष्ट करताना प्रथम सरसंघचालक म्हणतात की स्वार्थीपणा आणि निष्क्रीयता यांचा एकदम त्याग करा. समाजहीतांच्या बाबतीत आपण सर्वस्वी उदासीन असल्यामुळे, आपली मने अतिशय दुर्बल झाली आहेत. 'समाजाची राख-रांगोळी झाली तरी हरकत नाही, मला त्याच्याशी काय करायचे आहेमाझ्या स्वार्थाला धक्का पोहोचला नाही म्हणजे झाले.' अशा प्रकारचे समाजासंबंधी उदासीनतेचे भाव आपल्यात फार खोलवर रुजलेले दिसून येतात. याच कारणास्तव आज आपला समाज दुर्बल झालेला आहे

 

संघाचे ध्येय अतिशय सुस्पष्ट रीतीने समजावून सांगताना हे दृढनिश्चयी पुरुषोत्तम म्हणतात की संघ म्हणजे व्यायामशाळा किंवा मिलिटरी स्कूल नव्हे हे पक्के लक्षात ठेवा. संघ ही हिंदूंची राष्ट्रव्यापी व अभेद्य संघटना आहे. ती पोलादापेक्षाही कणखर असावयास पाहिजे. हिंसा करण्याकरिता आम्हाला बलवान व्हायचे नसून जगातली सारी हिंसा आणि अत्याचार यांना कायमचा पायबंद घालण्याकरता आपल्याला सामर्थ्य संपादन करायचे आहे. स्व-धर्म आणि स्व-राष्ट्र यांचे संरक्षण करण्याकरता बलसंवर्धन करणे हाच संघाचा एकमात्र उद्देश आहे.


संघाचे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे यावर त्यांचा ठाम विश्वास होता म्हणूनच डॉक्टरांनी सांगितले की भगवंतांचा आम्हाला आशीर्वाद आहे अशी आमची खात्री आहे. आमचे कार्य आक्रमणाचे नसून शांततेचे व संघटनेचे आहे. हिंदू-धर्म व हिंदू-संस्कृती याकरता हे पवित्र कार्य केले पाहिजे व आपली उज्ज्वल संस्कृती राखली पाहिजे व वृद्धिगत केली पाहिजे. तरच या सुधारलेल्या जगात आपला व आपल्या समाजाचा निभाव लागेल.


संघ हा सर्वांचाच आहे यावर जोर देताना हे व्रतस्थ पांथस्थ म्हणाले की ह्या भारतवर्षावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक हिंदुशी आपली वागणूक बंधुप्रेमाची असली पाहिजे. आपले कार्य समस्त हिंदू समाजासाठी असल्यामुळे समाजाच्या कोणत्याही अंगाची उपेक्षा करून चालणार नाही. सर्व हिंदू बांधवांबरोबर, श्रेष्ठ-कनिष्ठतेचा भाव मनात न आणता, आपण सारख्याच प्रेमाने वागले पाहिजे. कुणाही हिंदू व्यक्तीला तुच्छ समजून धिक्कारून टाकणे, म्हणजे पाप होईल. हा संघ आपल्या सर्वांचा आहे. यात मोठेपण कुठल्याही जातीचे नाही, यात कोणत्याही व्यक्तीचा मोठेपणा नाही. यात कोणाच्याही स्थानाचा बडेजाव नाही. 


संघकार्याचे महत्त्व पटवून सांगताना हे हिंदूहृदयसम्राट म्हणतात की संघाची संघटना ही जिवंत संघटना असून ती एकसारखी अनिरुद्धपणे वाढतच गेली पाहिजे. संघटन निर्माण करून आपल्या समाजाला बलवान आणि अजिंक्य बनवण्याखेरीज दुसरा कोणताच उद्देश आपल्या दृष्टीसमोर नाही. आपल्यावर आजपर्यंत जे-जे अत्याचार झाले किंवा होत आहेत, त्या साऱ्यांना उत्तर एकच. आपण विलक्षण बलवान बनले पाहिजे. ही शक्ती आपण केवळ संघटन करूनच निर्माण करू शकतो. आपला धर्म आणि संस्कृती कितीही श्रेष्ठ असो, जोपर्यंत त्यांचे संरक्षण करण्याकरिता आवश्यक ती शक्ती आपल्या ठायी नाही, तो पर्यंत ते जगाच्या आदरास कधीही पात्र होणार नाहीत. 


दृढनिश्चय आणि प्रयत्न या दोन गोष्टींचे महत्त्व विशद करताना हे महान हिंदू संघटक म्हणतात की आपल्या देशाचे गतवैभव प्राप्त करून घेण्याकरता सर्वस्वाचा त्याग आणि परिश्रम आपणांशिवाय अन्य कोण करू शकेल? आपण कितीही व्याख्याने दिली अथवा ऐकली तरी, जोपर्यंत बोलण्याप्रमाणे कृती आपल्या हातून होत नाही, तोपर्यंत आपण ध्येयसिद्धीची चुकूनही आशा करू नये. केवळ इच्छा बाळगल्याने कामे घडत नसतात. प्रत्यक्ष भगवंतांनादेखील दशावतार घेऊन मनुष्य शक्तीच्या द्वारेच काम करावे लागले.


संघशाखेचे महत्व अधोरेखित करताना हे द्रष्टे कर्मयोगी म्हणतात की एवढी गोष्ट आपण सर्वांनी नेहमी लक्षात बाळगावी की, हे सामर्थ्य आपणा सर्वांच्या दररोज एके ठिकाणी जमण्यात आहे. जोपर्यंत आपण दररोज एके ठिकाणी जमून अन्तःकरण मोकळे करून एकमेकांशी विचारविनिमय करीत राहाल तोपर्यंतच हे सामर्थ्य आपल्यात दृग्गोचर होईल.


संघस्वयंसेवकांकडून संघाच्या अपेक्षा व्यक्त करताना आद्य सरसंघचालक म्हणतात की शिस्त हा आपल्या संघटनेचा पाया आहे. याच पायावर आपल्याला ही प्रचंड इमारत उभारावयाची आहे. कोणाच्याही चुकीने का होईना, इमारतीचा पाया जर एखाद्या बाजूला कच्चा राहून गेला तर त्या बाजूचा इमारतीचा भाग खाली दबून तो मुख्य इमारतीपासून अलग होतो व परिणामी त्या सर्व इमारतीचा नाश करण्याला कारणीभूत होतो. आपण स्वतः संघाशी समरस व्हा, इतकेच नाही तर लोकांनाही तसेच बनवा.


संघस्वयंसेवकांना आवाहन करताना हे प्रथम संघस्वयंसेवक म्हणतात की आपल्या कोणत्याही कृत्यामुळे संघाच्या ध्येयाला व कार्याला यत्किंचितही धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने चालताना, बोलताना घेतली पाहिजे. तुम्ही नेहमी आत्मनिरीक्षण करून व स्वतःचे दुर्गुण पूर्णपणे काढून टाकून कार्याला पोषक होणारे व इतरांना स्वतःकडे आकर्षून घेणारे सद्गुण आपल्या अंगी बाणवून घेण्याचा प्रयत्न करीत जा. एखाद्या ठिकाणी कार्य कमी झाले किंवा नाही झाले तरी चालेल, परंतु परिस्थिती बिघडणार नाही व संघाला शत्रू उत्पन्न होणार नाहीत याची अवश्य काळजी घ्या


सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांचे विचारधन उद्धृत करणाऱ्या या लेखाचा उद्देश त्यांच्या विचारांवर वाचकांनीच मनन-चिंतन करावे व ते काळाच्या कसोटीवर घासून घ्यावेत हा आहे.  त्यामुळे हे विचार आजच्या काळातही कसे तंतोतंत लागू होतात याची वाचकांना प्रचीती येईल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा