राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
रविवार, २५ मे, २०२५
भागवत कथासार
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
नेतृत्व करणारे आताचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत हे त्यांच्या
स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहेत. संघाचे तत्त्वज्ञान व विचारप्रणाली अतिशय सोप्या, सरळ व मधुर भाषेमध्ये मांडणे हे त्यांचे कसब आहे.
कित्येक
वेळा तर सर्वसामान्य समाजाला न भावणारे तरीही समाजाच्या हिताचे विषय ते हाताळतात व
त्याबद्दलची आपली मते निर्भीडपणे मांडतात. आधुनिकतेचा कास धरणे ही हिंदू संस्कृतीची परंपराच आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून आपल्या उच्च परंपरा जतन करणे व
त्यायोगे हिंदू संघटन करणे हे एक प्रकारे संघकार्यच आहे. मोहनराव उत्कृष्ट वक्ते आहेत व आपल्या रसाळ वाणीतून लोकांना उद्बोधीत करण्याचे त्यांचे कसब
अतुलनीय आहे.
आरक्षणाबाबत संघाची भूमिका
अतिशय सुस्पष्ट रीतीने मांडताना मोहनराव म्हणतात की “जेव्हापासून
आरक्षण अमलात आले आहे तेव्हापासून आजपर्यंत, घटनेने संमती
दिलेल्या सर्व आरक्षणाला संघ पूर्ण पाठिंबा देत आहे. संघाचे असे मत आहे की त्यांच्यासाठी
आरक्षण आहे त्यांना जोपर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे तोपर्यंत किंवा ज्या सामाजिक
कारणांमुळे आरक्षण दिले गेले आहे तो भेदभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण चालूच
राहिले पाहिजे”.
समाजात
सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक समरसतेवर भर देताना मोहन भागवत “प्रत्येक गावात एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी या आदर्शाचा अवलंब करून सामाजिक
सौहार्दासाठी प्रयत्न करावेत” असे आवाहन करतात.
सामाजिक
समरसता आणि समाजात सुसंवाद निर्माण होण्यासाठी डॉक्टर मोहन भागवत संघस्वयंसेवकांना
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना आपल्या घरी
आमंत्रित करावे. जेणेकरून तळागाळात सुसंवाद निर्माण
होईल आणि एकतेचा संदेश पसरेल” असा सल्ला देतात.
सशक्त समाज तयार करायचा असेल तर
प्रत्येक कुटुंब सशक्त व सुसंस्कृत होणे आवश्यक आहे यावर भर देताना डॉक्टर मोहन
भागवत म्हणतात की “कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे. ते संस्कारातून प्राप्त झालेल्या सशक्त कौटुंबिक मूल्यांवर आधारित आहे”. तर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि मानवता यांची सुरेख गुंफण विणताना
ते म्हणतात की “मनुष्याला एक व्यक्ति म्हणून जीवन जगायचे असते. पण व्यक्ती ही तिच्या
कुटुंबासाठी असते. कुटुंब समाजासाठी असते आणि समाज संपूर्ण मानवतेसाठी
असतो”
हिंदू सणांचे महत्त्व विशद
करताना डॉक्टर मोहन भागवत म्हणतात की “राष्ट्रवाद आणि
सामाजिक एकतेचा पाया मजबूत करण्यासाठी आपण आपले सण मोठ्या प्रमाणात साजरे केले
पाहिजेत”
संघ
काय करू इच्छितो?
या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देताना डॉक्टर मोहन भागवत म्हणतात की “संघ संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करू इच्छितो” तर हिंदू समाजाचेच संघटन का? या प्रश्नाला
उत्तर देताना ते म्हणतात की “या
देशातील जबाबदार समाज हा हिंदू समाज आहे”
हिंदुस्तानचे स्वभाव वैशिष्ट्य समजावून
सांगताना डॉक्टर मोहनराव भागवत सांगतात की “भारत देश हा
काही एक केवळ भूगोल नाही. भूगोल तर कमी जास्त होऊ शकतो.
परंतु भारत देशाचा स्वतःचा एक स्वभाव आहे. एक
संस्कृती आहे. या स्वभावाशी आणि या संस्कृतीशी आपले जमणार
नाही असे ज्यांना वाटले त्यांनी आपला स्वतंत्र देश बनवला आहे”
आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती, मातृभाषा, वेशभूषा, भोजन पद्धती त्याचप्रमाणे उपासना
पद्धतीबद्दल नुसता अभिमान बाळगून चालत नाही तर त्या कमीत कमी आपल्या घरात तरी आपण अमलात आणल्या पाहिजेत. या संबंधात बोलताना डॉक्टर मोहनराव भागवत म्हणतात की “आपल्या घराच्या चौकटीच्या
आत भाषा, वेशभूषा, भजन, भवन, भोजन हे सगळ
आपले असले पाहिजे. माझ्या घरामध्ये मी
माझ्या मातृभाषेचाच उपयोग करीन. इंग्रजीचा करणार नाही. माझ्या घरात मी माझ्या पारंपारिक वेशभूषेतच राहीन.
घरामध्ये पूजा-अर्चा आदि धार्मिक कार्यक्रम असतात. त्यामध्ये मी माझ्या पारंपरिक वेशभूषेतच राहीन.
पारंपारिक वेशभूषा धारण करीन. या गोष्टींची आपल्याला आपल्या
कुटुंबामध्ये चर्चा करावी लागेल आणि पुढच्या पिढीला देखील समजावावे लागेल”
हिंदू
एकता आणि संघटनेची आवश्यकता विशद करताना डॉक्टर म्हणतात की “हिंदू समाजाला जर जिवंत राहायचे असेल तर हिंदूंच्या एकतेची आवश्यकता आहे. त्यातूनच शक्ती उत्पन्न होईल. आणि हे सांगायला काही वेगळे उदाहरण देण्याची गरज नाही. सृष्टीचा हा नियम आहे की जो समाज संघटित आहे,
एक आहे, त्या समाजाची भरभराट होते आणि जो समाज विखुरलेला
आहे, असंघटित आहे त्याचा विनाश होतो. इतिहास आणि वर्तमान हे दोन्ही याचे साक्षीदार आहेत”.
दुर्बळ असण्याचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडताना मोहनराव
म्हणतात की “आपण
जर दुर्बळ आहोत, असंघटित आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपण
अत्याचाराला आमंत्रण देत आहोत. त्यासाठी
कुठच्याही निमित्ताची गरज नाही. आपण दुर्बळ आहोत हे एकच कारण
आपल्यावर अत्याचार होण्यासाठी पुरेसे आहे”
संघ कार्य हे अलौकिक आहे आणि गेली कित्येक शतके अशा
प्रकारचे कार्य घडले नाही हे पटवून देताना मोहनराव म्हणतात की “संघ
कार्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेकडो
वर्षानंतर संघ जे कार्य करीत आहे त्यावरून मला तर असे वाटते की तथागत भगवान गौतम बुद्धानंतर
प्रथमच अशा प्रकारे ‘स्वभाव निर्माण’ करण्याचे कार्य संपूर्ण देशात
होत आहे. हे समजून घेण्यासाठी वेळ लागणार. परंतु ज्यांना असे वाटते की अशा प्रकारच्या कार्यामुळे त्यांची दुकाने बंद होतील ते
संघकार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम करीत आहेत व संघाबद्दल अप-प्रचार करीत आहेत”
उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, असा सावधानतेचा इशारा देताना सरसंघचालक मोहनरावजी भागवत म्हणतात की
“परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. लोक संघाची उपेक्षा करायचे, ते बंद झाले. संघाला विरोध होता, तो कमी झाला. आपण चालतच राहिलो, चालतच राहिलो. आता आपली परिस्थिती बदललेली आहे. पण आपल्या ध्येयाची दिशा बदललेल्या परिस्थितीत
बदलता कामा नये याकडे आपले लक्ष असायला हवे. ज्यावेळी लोक
आपली उपेक्षा करायचे त्यावेळी ती उपेक्षाच आपल्याला सावध करायची. ज्यावेळी लोक आपला विरोध करायचे त्यावेळी तो विरोधच आपल्याला सावध करायचा. पण आता सर्व गोष्टी अनुकूल आहेत तेव्हा आपल्याला स्वतःलाच सावध असण्याची
गरज आहे”.
राम जन्मभूमी येथे ज्या दिवशी प्रभू श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी भारताचे
राजकीय स्वातंत्र्य व सांस्कृतिक स्वातंत्र्य यामधील फरक स्पष्ट करताना सरसंघचालक
डॉक्टर मोहनराव भागवत यांनी अतिशय
स्पष्टपणे सांगितले की “अनेक शतके परकियांचे आक्रमण झेलणाऱ्या
भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची प्रतिष्ठा आज झाली आहे.
स्वतंत्रता होती पण तिची प्रतिष्ठा झाली नव्हती”.
मोहनरावांच्या विचारांनी
भारावून जाऊन आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक जणांनी आपल्याला संघ कार्यात झोकून
दिले आहे. संघकार्याची निश्चित दिशा ठरवून हिंदू
संघटन करताना समाजामधील अनिष्ट प्रथा परंपरा जातीव्यवस्था आधी गोष्टींना विरोध
करणारे मोहनराव यापुढेही हिंदू समाजाला राष्ट्राला व विशेषतः युवकांना सदैव
प्रेरणादायी ठरतील असा विश्वास आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा