राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

बुधवार, २८ मे, २०२५

 

इदं न मम

 

भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन अशी शिकवण दिली आहे. याचा अर्थ असा की फळाची आशा न धरता काम करत जा. जे काम तू करतोस ते करणे फक्त तुझ्या हाती आहे परंतु काम केल्यानंतर फळ मिळणे मात्र तुझ्या हाती नाही’. आपण जे कार्य करीत आहोत ते कर्तव्य भावनेने करणे इष्ट आहे आणि त्यासाठी आपण कुठल्याही प्रकारे त्याचे श्रेय घेणे योग्य नाही अशी आपली संस्कृती आपल्याला शिकवते. हे माझे नाही, हे जीवन, ही क्रिया, माझे काहीही नाही, माझ्यासाठी काहीही नाही ही ती शिकवण. यामुळेच की काय भारतीय संस्कृतीत व हिंदू परंपरेत कोणतीही पूजा-अर्च्या-यज्ञ केल्यानंतर त्याचे सारे पुण्य, सारे श्रेय हे प्रत्यक्ष भगवंताला देण्याची प्रथा आणि परंपरा आहे. श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणून आपण उदक सोडतो. उदक सोडणे, पाणी सोडणे याचा अर्थच असा की ते कार्य, ती पूजा, तो यज्ञ भगवंताला अर्पण करणे. एखादी गोष्ट जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा त्या गोष्टीवर आपला काही अधिकार राहत नाही. आणि म्हणून हिंदू धर्मात व संस्कृतीत ब्रह्मचर्यश्रमात, गृहस्थाश्रमात, वानप्रस्थाश्रमात तसेच संन्याशाश्रमात वेगवेगळी कर्तव्य करीत असताना ती स्थितप्रज्ञ वृत्तीने पार पाडावीत असे सांगितले आहे.


माणूस तेव्हा निराश होतो जेव्हा त्याची इच्छापूर्ती होत नाही. जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण आशाच धरली नसेल तर निराश होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा का इच्छा किंवा आसक्तीपासून आपण दूर राहिलो तर निराशेचे ढग आपल्यावर दाटून  येणार नाहीत. एखादं कर्तव्य पार पाडत असताना आपण केवळ निमित्तमात्र आहोत व नियतीच आपल्याकडून काही ना काही प्रयोजनासाठी कार्य करून घेत आहे असे ज्यावेळी मनुष्य मानतो त्यावेळी त्याच्या मधील मी पणा संपतो, अहंभाव नष्ट होतो, अभिमान गळून पडतो व निरपेक्ष भावनेने तो कर्तव्य बजावू लागतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्ती पूजा नाही. कोणत्याही कार्याचे श्रेय कोणालाही वैयक्तिकरित्या घेता येत नाही. जे काही कार्य तुम्हाला नेमून दिले आहे ते संघटनेच्या संपूर्ण कार्याचा एक भाग आहे. तुमचे काम  कितीही महत्त्वाचे असले तरी तुम्ही नाममात्र आहात व संघटन सर्वतोपरी आहे. त्यामुळे तुम्ही केलेले काम हे संघटनेला अर्पण करायचे आहे हा तो भाव आहे


या भावामुळे, या भावनेमुळे संघटनेच्या कार्यातील आपला सहभाग हा जरी कितीही महत्त्वाचा असला तरी मी महत्त्वाचा नाही ही भावना उत्पन्न होते. याच भावनेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेल्या शंभर वर्षात अनेक थोर विभूतींनी आपले सारे जीवन अर्प करून संघकार्य केले आहे. यातील फक्त काही जणांचा उल्लेख इतिहासात आढळतो. असंख्यजण आपापल्या परीने, आपापल्या ठिकाणी संघकार्य करता करता अनंतात विलीन झाले पण त्यांचा उल्लेख मात्र कुठेही आढळत नाही.  याचं कारण संघ स्वयंसेवकांमध्ये असलेली इदम न मम ही भावना होय. नाही चिरा नाही पणती अशी अवस्था या असंख्य पायाच्या दगडांची आहे. परंतु त्याबद्दल कोणाही स्वयंसेवकाला यत्किंचीतही दुःख नाही. मातृभूमीला परम वैभवाकडे नेताना जो मार्ग स्वीकारावा लागतो तो काट्याकुट्यांनी भरलेला आहे हे संघकार्य सुरू करण्याआधीच सर्वांना माहीत असते. स्वातंत्रवीर सावरकरांच्या शब्दात वर्णन करायचे झाले तर असे म्हणता येईल


की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने,

लब्धप्रकाश-इतिहास-निसर्ग-माने|

जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे,

बुद्धाची वाण धरीले करी हे सतीचे||


संघाच्या १०० वर्षाच्या इतिहासात सेवाभावी वृत्तीने काम करणारे, आपले तारुण्य एवढेच नव्हे तर आपले सारे आयुष्य संघकार्यासाठी वाहून देणारे असंख्य प्रचारक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करत होते व काम करीत आहेत. पूर्वोत्तर भारतात काम करत असताना साम्यवादी विचारसरणीच्या तसेच ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हल्ल्यात कित्येक संघस्वयंसेवक बळी पडले. आजही केरळ सारख्या राज्यात जेथे ख्रिश्चन व मुस्लिम कट्टरतावाद जोपासणाऱ्या राज्यकर्त्यांचे पाठबळ असल्यामुळे, साम्यवादी विचारसरणीच्या व जिहादी विचारांच्या लोकांच्या हातून संघस्वयंसेवक बळी पडत आहे. असे असूनही संघात काम करणाऱ्या व करू इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या वाढतच आहे. याला कारण आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मूलभूत तत्त्वांचे आकर्षण व आजच्या परिस्थितीतही संघाची हिंदू समाजाला असलेली गरज.


खरं पाहता जेव्हा सर्व हिंदू समाज जातीभेद विसरून एकत्र येईल व सर्व गोष्टींपेक्षा राष्ट्रहिताला प्राधान्य देईल तेव्हा संघाची गरज संपेल. तोपर्यंत संघ वाढतच राहील, विस्तारत राहील, पसरत राहील, बहरत राहील, फुलत राहील. गेली एक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त गेल्या ९९ वर्षाच्या आणि आता खरं बघता शंभर वर्षाच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. २०२४ च्या विजयादशमीला संघाच्या स्थापना दिनी, संघाला ९९ वर्षे पूर्ण झाली त्या दिवशी माझा पहिला लेख प्रसिद्ध झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त संघाने आरंभलेल्या राष्ट्रयज्ञात समिधा पडाव्यात या हेतूने  छोटासा प्रयत्न करायचे ठरवले त्याची सांगता आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जन्मदिनी होत आहे याचा  आनंद आहे. या प्रवासात मुंबई चौफेरचे संपादक मा. प्रफुल्ल फडके यांनी केलेल्या सहकार्याबद्दल व मुंबई चौफेरच्या सर्व वाचकांचा  ऋणी आहे. संघाचा भ्यासक नाही किंवा लेखक देखील नाही. लहानपणी संघाच्या शाखेवर झालेले संघसंस्कार ही आयुष्यातील मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. या देणगीची  अल्पबुद्धीने परतफेड करण्याचा प्रयत्न  केला आहे. वाचकांना तो आवडला असावा अशी आशा आहे. परंतु आकाशाचा कागद केला, साऱ्या वृक्षांची लेखणी केली व समुद्राची शाई केली तरीही गेल्या शंभर वर्षाचा संघाचा संपूर्ण इतिहास लिहिणं केवळ अशक्य आहे हे  चांगलेच माहीत आहे. म्हणून  जे काही भगव्या ध्वजाच्या कृपेने लिहिले गेले आहे ते इदं न मम.


|| इति श्रीकृष्णार्पणमस्तु ||

 

 

 

 

 

मंगळवार, २७ मे, २०२५

 

विश्वरूपदर्शन

 

या आधीच्या लेखात सांगितल्याप्रमाणे संघ शाखा चालवणे हेच फक्त संघाचे काम आहे. या संघ शाखेमध्ये येणाऱ्या स्वयंसेवकांना चांगले संस्कार देऊन त्यांना समाजामध्ये आपापली कामे करण्यासाठी व आवडत्या कार्यात सहभागी होण्यासाठी पाठविले जाते. संघातील संस्कार घेतल्यामुळे समाजामध्ये असलेल्या अनेक उणीवांची किंबहुना समाजाला असलेल्या अनेक गरजांची संघस्वयंसेवकांना जाणीव होते व त्यामुळे या उणिवा भरून काढण्यासाठी म्हणा किंवा समाजाची गरज पूर्ण करण्यासाठी म्हणा संघ स्वयंसेवक आपल्याला योग्य वाटेल तसंच आपल्या आवडीच्या सामाजिक क्षेत्रात काम करतात.


गुरुजींच्या प्रेरणेने व संघाचे प्रचारक बलराज मधोकांच्या कल्पनेतून स्थापन झालेली व  प्रा. यशवंतराव केळकर यांनी वाढवलेली अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अमृतलाल विठ्ठलदास तथा ठक्कर बाप्पा यांच्या संकल्पनेतून वनयोगी रमाकांत केशव तथा बाळासाहेब देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेला वनवासी कल्याण आश्रम,  दत्तोपंत ठेंगडी यांच्यासारख्या जेष्ठ संघ स्वयंसेवकाने स्थापन केलेला भारतीय मजदूर संघ, मावशीबाई केळकर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली राष्ट्रसेविका समिती, यासारख्या अनेक संस्था संघस्वयंसवकांनी सुरू केल्या, वाढवल्या एवढेच नव्हे तर त्यातील कित्येक संस्था त्या-त्या क्षेत्रातील जागतिक दर्जाच्या संस्था बनविल्या.


सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी स्थापन केलेल्या जनकल्याण सहकारी बँकठाणे जनता सहकारी बँक, कल्याण जनता सहकारी बँक, राजकोट नागरिक सहकारी बँक, जनता सहकारी बँक, जनसेवा सहकारी बँक यासारख्या अनेक सहकार क्षेत्रातील बँका आजगायत कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय अतिशय पारदर्शी व नफ्यात चालल्या आहेत.


वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर हेडगेवार इस्पितळांची एक साखळीच संघ सेवकांनी उघडली आहे आणि त्यायोगे नागपूर आदी अनेक ठिकाणी अतिशय आधुनिक अशी माफक फी करणारी आकारणारी व सर्वसामान्य लोकांना परवडणारी हॉस्पिटल सुरू केली आहे.  मुंबईमध्ये असलेले नाना पालकर हॉस्पिटल हे संघाच्या स्वयंसेवकांनी सुरू केले आहे.


भटक्या व विमुक्त लोकांच्या उन्नतीसाठी पद्मश्री गिरिश प्रभुणे यांनी सेवाग्राम हा आश्रम सुरू केला तर ज्येष्ठ स्वयंसेवक भारतरत्न नानाजी देशमुख यांनी १९६९ मध्ये स्थापन केलेल्या दीनदयाळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून गोंडा ग्रामोदय प्रकल्प सुरू केला. त्यानंतर बीड, नागपूर आणि चित्रकूट येथे प्रकल्प सुरू करण्यात आले. मध्यप्रदेश मधील चित्रकूट प्रकल्प  हा संघाच्या सामाजिक क्षेत्रातील संघ स्वयंसेवकांच्या योगदानाची साक्ष देतो. नानाजींच्या प्रकल्पामुळे सर्वात मागासलेल्या समजल्या जाणाऱ्या समुदायाला काही वर्षांतच विद्यापीठ, आयुर्वेदिक रुग्णालय, आयुर्वेदिक फार्मसी, कृषी विज्ञान केंद्र , आदिवासी मुला-मुलींसाठी शाळा आणि वसतिगृहे, अनुसूचित जातीच्या मुलांसाठी निवासी शाळा, कौशल्य प्रशिक्षण संस्था, गुरुकुल, देशी गायींच्या जातींच्या संवर्धनासाठी संशोधन केंद्र इत्यादी सुविधा मिळाल्या.


संघ स्वयंसेवक मिलिंद कांबळे यांनी सुरू केलेले दलित भारतीय चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री हे दलित उद्योजकांसाठीचे हक्काचे व्यासपीठ असो किंवा संघाचे भूतपूर्व सहकार्यवाह एकनाथजी रानडे यांनी कन्याकुमारी येथे उभारलेले विवेकानंद स्मारक शिलाशिल्प व विवेकानंद स्मारक आज जागतिक स्तरावर विवेकानंदांचे विचार जगभर पसरविण्याचे काम करीत आहेत.


सं कोणतंही क्षेत्र नाही की ज्यात संघ स्वयंसेवकांनी झोकून देऊन काम केले नाही व संस्था उभारल्या नाही. आरोग्य, शिक्षण, बँकिंग, सांस्कृतिक, धार्मिक, व्यावसायिक उद्योग कला शास्त्र माध्यम पत्रकारिता आदी अनेक क्षेत्रांमध्ये संघ स्वयंसेवकांनी भव्य दिव्य काम करून ठेवले आहे. एवढेच नव्हे तर भारतीय किसान संघ, भारतीय रेल्वे मजदूर संघ, संस्कार भारती, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, अखिल भारतीय शिक्षक महासंघ, नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, स्वदेशी जागरण मंच, लघु उद्योग भारती, सहकार भारती, दीनदयाल शोध संस्थान, माय होम इंडिया, भारत विकास परिषद, विवेकानंद मेडिकल मिशन, सेवा भारती, लोकभारती, सीमा सुरक्षा परिषद, शिक्षा भारती, बजरंग दल, धर्म जागरण समिती, राष्ट्रीय हिंदू आंदोलन, राष्ट्रीय शीख संगत, भारतीय बौद्ध संघ, मुस्लिम राष्ट्रीय मंच, हिंदु राष्ट्र सेना, जनजाती धर्म संस्कृती सुरक्षा मंच, एकल विद्यालय, पूर्व सीमा विकास परिषद, सरस्वती शिशु मंदिर, विद्या भारती, अखिल भारतीय शिक्षा संस्था, विज्ञान भारती, भारत-तिबेट मैत्री संघ, भारतीय विचार केंद्र, हिंदू विवेक केंद्र, विवेकानंद केंद्र, इंडिया पॉलिसी फाउंडेशन, अखिल भारतीय इतिहास संकलन योजना, श्यामा प्रसाद मुखर्जी रिसर्च फाउंडेशन, संस्कृत भारती, क्रीडा भारती, भारत तिब्बत सहयो मंच, विश्व संवाद केंद्र यांच्यासारख्या अनेक संस्था संघ स्वयंसेवकांच्या पुढाकाराने निर्माण झाल्या ज्यांच्यामुळे समाजामधील विविध घटकांना मदत मिळत आहे.


देशभरात ५१,५७० ठिकाणी दररोज एकूण ८३,१२९ शाखा लागतात. साप्ताहिक मिलनची संख्या ३२,१४७ आहे.  मासिक मंडळीची संख्या १२,०९१ आहे. सर्व शाखांची एकूण संख्या १,१५,२७६ आहे. संघकार्यात सामील होणाऱ्या तरुणांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. दरवर्षी लाखो विशेषतः १४-२५ वयोगटातील तरुण यातून जोडले जात आहेत. स्वयंसेवक ते कार्यकर्ता असे प्रशिक्षण दिल्या जाणाऱ्या संघाच्या प्रशिक्षण कार्यक्रमातंर्गत देशभरात एकूण ४,४१५ प्रारंभिक वर्ग आयोजित केले आहेत. त्यात २,२२,९६२ जण सहभागी झाले. त्यापैकी १,६३,००० हे १४-२५ या वयोगटातील होते. २० हजारांहून अधिक ४० वर्षांपेक्षा अधिक वयाचे होते. दुसरीकडे www.rss.org या संकेतस्थळाच्या माध्यमातून २१२ पासून ४६,००० हून अधिक महिलांसहित १२,७२,४५३ नागरिकांनी संघामध्ये सहभागी होण्याची आपली इच्छा दर्शविली आहे.


प्रशासकीय रचनेनुसार संघ देशभरात ५८,९८१ मंडलांमध्ये विभागलेला आहे. त्यापैकी ३०,७१७ मंडलांमध्ये दैनिक आणि ९,०० मंडलांमध्ये साप्ताहिक मिलन शाखा सुरु आहेत. यात एकूण ३९,९१७ म्हणजे मागील वर्षीच्या तुलनेत ६७% ची वाढ झाली आहे. मंडलांच्या संख्येत ३,०५ ने वाढ झाली आहे. संघकार्याच्या  विस्तारासाठी शताब्दी विस्तारक म्हणून  २ वर्षे पूर्णवेळ देण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत २,४५३ स्वयंसेवक सहभागी झाले.


 
आज देशभरात संघ स्वयंसेवकांकडून ८९,७०६ सेवा प्रकल्प सुरू आहेत, त्यापैकी ४०,९२० शिक्षण क्षेत्रात, १७,४६१ वैद्यकीय सेवेत, १०,७७९ स्वावलंबन क्षेत्रात आणि २०,५४६ सामाजिक प्रबोधन व इतर उपक्रमांशी संबंधित आहेत. संघाकडून ग्रामीण विकासासाठी ग्रामविकास आणि गो-संरक्षण यासारखे विशेष उपक्रम देखील राबवले जातात.


२०१४ पासून आजपर्यंत गेली अकरा वर्षे या राष्ट्राला एक संघस्वयंसेवक नेतृत्व देत आहे. एवढेच नव्हे तर त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आज करोडो संघस्वयंसेवक राष्ट्रकार्यासाठी जुंपले आहेत. मथुरेला प्रचंड पाऊस पडत असताना आपल्या करंगळीवर गोवर्धन उचलणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने त्या प्रचंड पावसापासून आपल्या प्रजाजणांना वाचवलेत्याच श्रीकृष्णाने ऐन लढाईच्या दरम्यान महाभारतात अर्जुनाला आपले विश्वरूपदर्शन दिले.  आपल्या देशामध्ये सुद्धा जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी हाच श्रीकृष्ण संघस्वयंसेवकांचे रूप धारण करून आपल्या देशबांधवांच्या मदतीला धावून जातो व त्यांचे रक्षण करतो.


जगन्नाथ पुरी येथील जगन्नाथाचा रथ लाखो भाविक ज्यावेळी आपल्या हाताने ओढतात तेव्हाच तो रथ पुढे सरकतो.  भारताला  विश्वगुरू बनविण्यासाठी व परमवैभवाकडे नेण्यासाठी देशोत्थानाचा हा रथ ज्यावेळी असंख्य संघस्वयंसेवक जनता जनार्दनाच्या आशिर्वादाने ओढतील तेव्हा तो इच्छित स्थळी पोहोचेल यात कोणतीही शंका नाही.


भारताची लोकसंख्या १४४ कोटी आहे व त्यातील ६५% लोक हे सज्ञान आहेत असे मानले तर साधारणपणे या देशातील ९४ कोटी लोक हे सज्ञान  आहेत.  यापैकी कमीत कमी २५ कोटी लोक या-ना-त्या कारणाने संघाशी संबंधित असलेल्या कोणत्या ना कोणत्या संस्थेशी जोडले गेले आहेत. ही संख्या साधारणपणे २६.५% एवढी होते. संपूर्ण भारताचा विचार केला असता ही संख्या प्रचंड आहे.  विशेषतः ज्या संघटनेवर भारत सरकारने तीन वेळा बंदी घालण्याचा प्रयत्न केला त्या संघटनेची लोकप्रियता  व विस्तार सामान्यांच्या कल्पनेबाहेर आहे आणि हेच संघाचे विश्वरूपदर्शन आहे.

रविवार, २५ मे, २०२५

 

भागवत कथासार



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतृत्व करणारे आताचे सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे परिचित आहेत. संघाचे तत्त्वज्ञान व विचारप्रणाली अतिशय सोप्या, सरळ व मधुर भाषेमध्ये मांडणे हे त्यांचे कसब आहे. 


कित्येक वेळा तर सर्वसामान्य समाजाला न भावणारे तरीही समाजाच्या हिताचे विषय ते हाताळतात व त्याबद्दलची आपली मते निर्भीडपणे मांडतात. आधुनिकतेचा कास धरणे ही हिंदू संस्कृतीची परंपराच आहे. त्यामुळे विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवून आपल्या उच्च परंपरा जतन करणे व त्यायोगे हिंदू संघटन करणे हे एक प्रकारे संघकार्यच आहे.  मोहनराव उत्कृष्ट वक्ते आहेत व आपल्या रसाळ वाणीतून लोकांना उद्बोधीत करण्याचे त्यांचे कसब अतुलनीय आहे.


आरक्षणाबाबत संघाची भूमिका अतिशय सुस्पष्ट रीतीने मांडताना मोहनराव म्हणतात की जेव्हापासून आरक्षण अमलात आले आहे तेव्हापासून आजपर्यंत, घटनेने संमती दिलेल्या सर्व आरक्षणाला संघ पूर्ण पाठिंबा देत आहे. संघाचे असे मत आहे की  त्यांच्यासाठी आरक्षण आहे त्यांना जोपर्यंत आरक्षणाची आवश्यकता आहे तोपर्यंत किंवा ज्या सामाजिक कारणांमुळे आरक्षण दिले गेले आहे तो भेदभाव जोपर्यंत आहे तोपर्यंत आरक्षण चालूच राहिले पाहिजे.


समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामाजिक समरसतेवर भर देताना मोहन भागवत प्रत्येक गावात एक मंदिर, एक विहीर आणि एक स्मशानभूमी या आदर्शाचा अवलंब करून सामाजिक सौहार्दासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन करतात.


सामाजिक समरसता आणि समाजात सुसंवाद निर्माण होण्यासाठी डॉक्टर मोहन भागवत संघस्वयंसेवकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना आपल्या घरी आमंत्रित करावे. जेणेकरून तळागाळात सुसंवाद निर्माण होईल आणि एकतेचा संदेश पसरेल असा सल्ला देतात.


सशक्त समाज तयार करायचा असेल तर प्रत्येक कुटुंब सशक्त व सुसंस्कृत होणे आवश्यक आहे यावर भर देताना डॉक्टर मोहन भागवत म्हणतात की कुटुंब हे समाजाचे मूलभूत एकक आहे. ते संस्कारातून प्राप्त झालेल्या सशक्त कौटुंबिक मूल्यांवर आधारित आहे. तर व्यक्ती, कुटुंब, समाज आणि मानवता यांची सुरेख गुंफण विणताना ते म्हणतात कीमनुष्याला एक व्यक्ति म्हणून जीवन जगायचे असते. पण व्यक्ती ही तिच्या कुटुंबासाठी असते. कुटुंब समाजासाठी असते  आणि समाज संपूर्ण मानवतेसाठी असतो


हिंदू सणांचे महत्त्व विशद करताना डॉक्टर मोहन भागवत म्हणतात की राष्ट्रवाद आणि सामाजिक एकतेचा पाया मजबूत करण्यासाठी आपण आपले सण मोठ्या प्रमाणात साजरे केले पाहिजेत

 

संघ काय करू इच्छितो? या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देताना डॉक्टर मोहन भागवत म्हणतात की संघ संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करू इच्छितो तर हिंदू समाजाचेच संघटन का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणतात की या देशातील जबाबदार समाज हा हिंदू समाज आहे

 

हिंदुस्तानचे स्वभाव वैशिष्ट्य समजावून सांगताना डॉक्टर मोहनराव भागवत सांगतात की भारत देश हा काही एक केवळ भूगोल नाही. भूगोल तर कमी जास्त होऊ शकतो. परंतु भारत देशाचा स्वतःचा एक स्वभाव आहे. एक संस्कृती आहे. या स्वभावाशी आणि या संस्कृतीशी आपले जमणार नाही असे ज्यांना वाटले त्यांनी आपला स्वतंत्र देश बनवला आहे


आपल्या प्रथा, परंपरा, संस्कृती, मातृभाषा, वेशभूषा, भोजन पद्धती त्याचप्रमाणे उपासना पद्धतीबद्दल नुसता अभिमान बाळगून चालत नाही तर त्या कमीत कमी आपल्या घरात तरी आपण अमलात आणल्या पाहिजेत.  या संबंधात बोलताना डॉक्टर मोहनराव भागवत म्हणतात की आपल्या घराच्या चौकटीच्या आत  भाषा, वेशभूषा, भजन, भवन, भोजन हे सगळ आपले असले पाहिजे. माझ्या घरामध्ये मी माझ्या मातृभाषेचाच उपयोग करीन. इंग्रजीचा करणार नाही. माझ्या घरात मी माझ्या पारंपारिक वेशभूषेतच राहीन. घरामध्ये पूजा-अर्चा आदि धार्मिक कार्यक्रम असतात. त्यामध्ये मी माझ्या पारंपरिक वेशभूषेतच राहीन. पारंपारिक वेशभूषा धारण करीन. या गोष्टींची आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये चर्चा करावी लागेल आणि पुढच्या पिढीला देखील समजावावे लागेल


हिंदू एकता आणि संघटनेची आवश्यकता विशद करताना डॉक्टर म्हणतात की हिंदू समाजाला जर जिवंत राहायचे असेल तर हिंदूंच्या एकतेची आवश्यकता आहे. त्यातूनच शक्ती उत्पन्न होईल. आणि हे सांगायला काही वेगळे उदाहरण देण्याची गरज नाही. सृष्टीचा हा नियम आहे की जो समाज संघटित आहे, एक आहे, त्या समाजाची भरभराट होते आणि जो समाज विखुरलेला आहे, असंघटित आहे त्याचा विनाश होतो. इतिहास आणि वर्तमान हे दोन्ही याचे साक्षीदार आहेत”.


दुर्बळ असण्याचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडताना मोहनराव म्हणतात की आपण जर दुर्बळ आहोत, असंघटित आहोत तर याचा अर्थ असा आहे की आपण अत्याचाराला आमंत्रण देत आहोत. त्यासाठी कुठच्याही निमित्ताची गरज नाही. आपण दुर्बळ आहोत हे एकच कारण आपल्यावर अत्याचार होण्यासाठी पुरेसे आहे


संघ कार्य हे अलौकिक आहे आणि गेली कित्येक शतके अशा प्रकारचे कार्य घडले नाही हे पटवून देताना मोहनराव म्हणतात की संघ कार्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे. कारण शेकडो वर्षानंतर संघ जे कार्य करीत आहे त्यावरून मला तर असे वाटते की तथागत भगवान गौतम बुद्धानंतर प्रथमच अशा प्रकारे स्वभाव निर्माणकरण्याचे  कार्य संपूर्ण देशात होत आहे. हे समजून घेण्यासाठी वेळ लागणार. परंतु ज्यांना असे वाटते की अशा प्रकारच्या कार्यामुळे त्यांची दुकाने बंद होतील ते संघकार्यामध्ये अडथळे निर्माण करण्याचं काम करीत आहेत व संघाबद्दल अप-प्रचार करीत आहेत


उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको, असा सावधानतेचा इशारा देताना सरसंघचालक मोहनरावजी भागवत म्हणतात की परिस्थिती बदलण्यास वेळ लागत नाही. लोक संघाची उपेक्षा करायचे, ते बंद झाले. संघाला विरोध होता, तो कमी झाला. आपण चालतच राहिलो, चालतच राहिलो. आता आपली परिस्थिती बदललेली आहे.  पण आपल्या ध्येयाची दिशा बदललेल्या परिस्थितीत बदलता कामा नये याकडे आपले लक्ष असायला हवे. ज्यावेळी लोक आपली उपेक्षा करायचे त्यावेळी ती उपेक्षाच आपल्याला सावध करायची. ज्यावेळी लोक आपला विरोध करायचे त्यावेळी तो विरोधच आपल्याला सावध करायचा. पण आता सर्व गोष्टी अनुकूल आहेत तेव्हा आपल्याला स्वतःलाच सावध असण्याची गरज आहे”.


राम जन्मभूमी येथे  ज्या दिवशी प्रभू श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली त्यावेळी भारताचे राजकीय स्वातंत्र्य व सांस्कृतिक स्वातंत्र्य यामधील फरक स्पष्ट करताना सरसंघचालक डॉक्टर मोहनराव भागवत यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितले की अनेक शतके परकियांचे आक्रमण झेलणाऱ्या भारताच्या खऱ्या स्वातंत्र्याची प्रतिष्ठा आज झाली आहे. स्वतंत्रता होती पण तिची प्रतिष्ठा झाली नव्हती.


मोहनरावांच्या विचारांनी भारावून जाऊन आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अनेक जणांनी आपल्याला संघ कार्यात झोकून दिले आहे.  संघकार्याची निश्चित दिशा ठरवून हिंदू संघटन करताना समाजामधील अनिष्ट प्रथा परंपरा जातीव्यवस्था आधी गोष्टींना विरोध करणारे मोहनराव यापुढेही हिंदू समाजाला राष्ट्राला व विशेषतः युवकांना सदैव प्रेरणादायी ठरतील असा विश्वास आहे.

गुरुवार, १५ मे, २०२५

 

सु-विचार-दर्शन


 


सरसंघचालक सुदर्शनजी यांचा भारतीय संस्कृती तसेच वेद, उपनिषदे, पुराणे, रामायण, महाभारत, धर्मशास्त्र व इतिहास या विषयांचा  गाढा अभ्यास होता. प्रखर हिंदुत्ववादी असलेल्या सुदर्शनजींचा इस्लाम व ख्रिश्चन धर्मग्रंथांचाही अभ्यास होता. त्यामुळे त्यांच्या वक्तृत्वात नेहमी हिंदू धर्माप्रमाणे इतर धर्माचाही उल्लेख यायचा.  वेद हेच प्रमाण आहेत व वेदांमध्ये कुठेही अस्पृश्यतेचा, वर्णव्यवस्थेचा किंवा जातीव्यवस्थेचा उल्लेख नसल्यामुळे हिंदू धर्माला जातीभेद मान्य नाही असे त्यांचे मत होते.  एवढेच नव्हे तर वेदानंतर आलेल्या काही ग्रंथांमध्ये तसेच शास्त्रामध्ये जर जातीव्यवस्थेचा उल्लेख असेल तर ते ग्रंथ व शास्त्र मानण्याची व त्याप्रमाणे अनुकरण करण्याची काहीही गरज नाही असे त्यांचे स्पष्ट मत होते. सामाजिक समरसतेचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू समाजामध्ये असलेला जातिवाद, उच्च-नीच भेदभाव हा त्यांना पूर्णपणे अमान्य होता.


स्वतः उच्चशिक्षित अभियंता असल्यामुळे ते अचूक तर्कशास्त्र मांडीत व पाखंडी तसेच पुराणमतवादी आणि आधुनिक समाज निर्मितीला विरोध करणाऱ्यांना उघडे पाडीत असत.


संघ शाखा व संघ प्रार्थना याचे महत्त्व सांगताना सुदर्शनजी म्हणतात की एका ठराविक वेळी व ठराविक जागेवर नेहमी जमणे, मातृभूमीबद्दल एकसारखा विचार करणे, तिचे एकसारखे स्मरण करणे, एकसारखी प्रार्थना म्हणणे हे सर्व काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचे अभिन्न अंग आहे, संघाची प्रार्थना आत्मसात करणे किंवा अंगीकारणे याचा अर्थच संघाचे विचार व संघभाव आत्मसात करणे किंवा अंगीकारणे होय


हिंदूंसमोर असलेल्या आव्हानाची हिंदू समाजाला जाणीव करून देताना व चला उठा सज्ज व्हा हा संदेश देत असताना सुदर्शनजी म्हणतात की हिंदुत्वनिष्ठ शक्ती तसेच हिंदुत्व विरोधी शक्ती या दोन्ही आज मैदानात समोरासमोर उभ्या ठाकल्या आहेत. आतापर्यंत तर या शक्ती आपापल्या आखाड्यात सराव करत होत्या. आपापले दंड फुगवत होत्या. पण आज प्रत्यक्ष रणांगणावर महाभारताच्या युद्धासारख्या उभ्या आहेत. आता तर दैन्यम न पलायनम यासारखी स्थिती आली आहे. वैचारिक, संघटनात्मक तसेच शारीरिक पातळीवर सुद्धा आता लढण्याची आवश्यकता आहे


वसुधैव कुटुम्बकम हे जरी आपले ब्रीदवाक्य असले तरी ते साकार करण्यासाठी संपूर्ण जगाचे मानवजाती संबंधी तसेच निसर्गाप्रतीचे नियम सारखेच हवेत याबद्दल ते आग्रही होते. त्या संदर्भामध्ये वक्तव्य करताना सुदर्शनजी म्हणतात की व्यक्ती, समाज, प्रकृती आणि परंपरा यांच्यामधील संबंध ठरविण्याचे जेवढे काही नियम आहेत ते केवळ फक्त भारताला किंवा हिंदूंनाच लागून आहेत असे नाही तर ते साऱ्या विश्वाला लागू आहेत. म्हणून तर याला मानवधर्म असे म्हटले जाते. हे सिद्धांत कालही सत्य होते, आजही सत्य आहेत आणि भविष्यातही तेवढेच सत्य राहतील. सनातन धर्म, हिंदू धर्म, मानवधर्म हे सर्व समानार्थी शब्द आहेत


अस्पृश्यता ही हिंदू समाजामध्ये असलेले सर्वात मोठी कुप्रथा अर्थात वाईट गोष्ट आहे हे ते अगदी निसंकोचपणे सांगतात  व समरसतेचा आग्रह धरतात. अशावेळी सुदर्शनजींच्या अंतःकरणात असलेला सुधारणावादी हिंदू म्हणतो की हिंदू समाजात अतिशय श्रेष्ठ असे विचार असूनही कालांतराने अशा अनेक कुप्रथा त्यात घुसविण्यात आल्या. ज्यामुळे शत्रू आपला पराभव करू शकला. यातील सर्वात वाईट म्हणजे जातीच्या नावावर हिंदूंमध्ये असलेली अस्पृश्यता होय


भारतीय शब्दांना इंग्रजी भाषेत असलेले प्रतिशब्द हे पर्यायी शब्द नाहीत. इंग्रजी भाषेमध्ये असलेले प्रतिशब्द हे भारतीय भाषांमध्ये असलेल्या शब्दांचे अचूक वर्णन व त्या मागील भावना व्यक्त करू शकत नाहीत. त्यामुळे धर्म, संस्कृती, राष्ट्रवाद, देश, सभ्यता सारख्या भारतीय शब्दांचे अचूक प्रतिशब्द किंवा पर्यायी शब्द इंग्रजी भाषेमध्ये नसल्यामुळे पाश्चिमात्य जगताला भारताच्या अध्यात्मिक ज्ञानाची खरी ओळख होत नाही. यावर मत व्यक्त करत असताना सुदर्शनजी म्हणतात की हिन्दुस्तानात प्रचलीत असलेले धर्म, राष्ट्र व संस्कृती अर्थात सभ्यता यांना इंग्रजीत रिलीजन, नेशन आणि सिव्हिलायझेशन हे जे प्रतिशब्द वापरले जातात ते पर्यायी शब्द नाहीत. त्यांच्या अर्थात बराच फरक आहे.


धर्म म्हणजे कर्तव्य व रिलिजन म्हणजे उपासना पद्धती.  जागतिक पातळीवर धर्माची व्याख्या करत असताना सुदर्शनजी म्हणतात ही धर्म म्हणजे रिलिजन नाही. आपल्याकडे धर्माचे चार भाग आहेत. एक आपण स्वतः, दुसरा समाज, तिसरी प्रकृती अर्थात निसर्ग व चौथा भाग म्हणजे परमात्मा. या चौघांमध्ये कोणत्याही आडकाठीशिवाय समजुतदारपणे व्यवहार करण्यासाठी  जी काही व्यवस्था अथवा नियम आहेत ते सर्व धर्माच्या आचरणाखाली येतात. थोडक्यात अशा सर्व नियमांचे पालन करणे म्हणजेच धर्माचे पालन करणे होय.


संघाच्या संरचनेबाबतसंघामध्ये असलेल्या अधिकारपदांबाबत तसेच व्यवस्थेबाबत स्पष्टीकरण देताना सुदर्शनजी सांगतात की कोणत्याही संगठनेत एक व्यवस्था बनवावी लागते. या व्यवस्थेमध्ये काही पदे निर्माण करावी लागतात. पण ही पदे काही मान- सन्मानाच्या जागा नसून संघ स्वयंसेवकांना संस्कारीत करण्यासाठी केली गेलेली एक व्यवस्था आहे. त्यामुळे सरसंघचालक हे सर्वात मोठे पद असूनही एक सामान्य मुख्य शिक्षक जेव्हा संघाच्या शाखेत दक्ष म्हणतो तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या सरसंघचालकांनाही दक्ष स्थितीमधेच उभे राहावे लागते".


सुप्रसिद्ध पत्रकार एम.. अकबर एकदा म्हणाले होते की इंडिया इज सेक्युलर नॉट बिकॉज गांधी वॉज सेक्युलर. गांधी वॉज सेक्युलर बिकॉज इंडिया इज सेक्युलर.’ हे विधान करण्यापूर्वी कदाचित एम.. अकबर यांच्या वाचनात सुदर्शनजींचे हा देश सर्व-धर्म-समभाव मानतो कारण या देशात हिंदू बहुसंख्यांक आहेत हे विधान आले असावे व त्यावरूनच त्यांनी प्रेरणा घेतली असावी असे वाटते.


अनेक भाषा अवगत असलेले सरसंघचालक सुदर्शनजी यांचे विचार हे सनातन संस्कृतीचे सार आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

 

बुधवार, १४ मे, २०२५

 

सिंहावलोकन


सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैय्या प्रकृतीने अतिशय सौम्य व मृदू होते. ते जेव्हा बोलत तेव्हा ज्या कोमलतेने फुलातून मधु निघतो तसे त्यांच्या मुखातून शब्द निघत असतधर्म, हिंदू राष्ट्र, हिंदुत्व, अस्पृश्यता व जातीभेद, सत्ता, राजकारण, भारतीय मुस्लिम, अर्थव्यवस्था आदी अनेक विषयांवर त्यांनी आपले उद्बोधक विचार वेळोवेळी व्यक्त केले आहेत.

    

संघाची भूमिका आणि धर्म यांचा परस्पर संबंध व्यक्त करत असताना रज्जू भैय्या संबोधतात की संघाची ही भूमिका आहे की समाजामध्ये आपली प्राचीन नीतीमूल्ये व समाजाचा गौरवशाली इतिहास जागृत करून (स्वयंसेवकाने) आपल्या जीवनाद्वारे समाजापुढे सदाचाराचे उदाहरण घालून द्यावे. चारित्र्य निर्माण हे धर्माच्या आधारावरच होईल. धर्म हा या देशाचा प्राण आहे. राजकीय पक्षांनी आजपर्यंत धर्म नाकारला आहे त्याचमुळे ही आजची परिस्थिती उद्भवली आहे. जर आपण धर्माचे अनुकरण केले तर नागरिक पुन्हा सद्गुणी होऊ शकतात. कोळसा व हिरा यात फारसा फरक नाही. फरक त्या दोघांमध्ये असलेल्या अंतर्गत अणूरचनेत आहे”.


हिंदू राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करताना हे चतुर्थ सरसंघचालक म्हणतात की संघ लोकांना जागृत करून या देशाची संपूर्ण स्थिती बदलण्यासाठी कटिबद्ध आहे.  मातृभूमी प्रति प्रेमाची भावना उत्पन्न करण्याचे काम संघ सातत्याने करत आला आहे. केवळ आपणच नाही तर संपूर्ण जग भारत माता की जय म्हणेल असा (बलशाली) भारत बनविण्याचा आम्ही संकल्प सोडला आहे. आज काही लोक विचारतात की काय तुम्ही हिंदुराष्ट्र बनवू इच्छिता का? मी त्यांना सांगू इच्छितो की हे राष्ट्र तर हजारो वर्षांपासून हिंदूराष्ट्र आहे. हिंदूराष्ट्र बनवायचं नाही. हिंदूराष्ट्र स्थापनही करायचं नाही. हिंदुराष्ट्राची घोषणा पण करायची नाही. परंतु हिंदूराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा आहे”.


हिंदुत्व हाच भविष्यात सत्ताप्राप्तीचा मार्ग राहील अशी भविष्यवाणी करताना हा दृष्टा भाष्यकार भाष्य करतो की हिंदुत्व ही काही एक पूजा पद्धती नाही. हिंदुत्व हा काही संकुचित विचारही नाही. जे हिंदुत्वाला संकुचित समजतात त्यांच्या बुद्धिमत्तेवर कुठला ना कुठलातरी पडदा पडला आहे. ज्यांना जातिवाद संकुचित वाटत नाही, ज्यांना सामाजिक न्यायाच्या नावावर लोकांना आपापसात लढविताना कोणताही त्रास होत नाही. आज हिंदुत्व हाच राष्ट्र जागरणाचा केंद्रबिंदू बनत आहे. (यापुढे) हिंदुत्व हाच वैचारिक धृवीकरणाचा मुख्य आधार होईल. जागृत हिंदू समाजच या देशात हिंदूंच्या हिताची व हिंदूंच्या चिरंतर मूल्यांची काळजी घेणाऱ्यालाच सत्तेवर आणेल. परंतु याबरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की फक्त सत्ताप्राप्तीने समाज परिवर्तन होणार नाही”.


अस्पृश्यता व जातीभेदावर कठोर प्रहार करत असताना हे समाजसुधारक  म्हणतात की समाजामध्ये सर्वांनाच काही ना काही तरी काम करावे लागते. परंतु (दुर्दैवाने) जे साफसफाईचे काम करतात त्यांना आपण अस्पृश्य मानू लागलो. आपल्या घरात आपली आई लहान मुलांची शी-सु काढते. झालेली उलटी साफ करते. परंतु असे असूनही आपल्या घरात मात्र सगळे समान असतात मग समाजामध्ये साफसफाईचे काम करणारे अस्पृश्य कसे काय असू शकतात? जो समाज हजारो वर्षे एक होता, ज्या समाजाने मुस्लिम आक्रमकांच्या विरुद्ध तसेच इंग्रजांविरुद्ध एक होऊन लढा दिला तो समाज आज विखुरलेला आहे. आपल्या इकडे कित्येक वेळा हरिजन समाज किंवा वाल्मिकी समाज असे ज्यांना म्हटले जाते तो समाज तर (आपल्या समाजाचा) एक खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. आज समाजातील दलित वर्गाचा विकास देवपूजेहुन अधिक महत्त्वाचा आहे. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्यास केला तर ही गोष्ट स्पष्ट होते की प्राचीन काळी आपल्याकडे कोणतीही व्यक्ती जातीच्या आधारावर ओळखली जात नव्हती. प्रत्येक व्यक्तीची ओळख ही त्या व्यक्तीच्या योग्यतेवर आणि गुणांवरच होत होती. आपण कुठे आणि कोणाच्या घरी जन्म घ्यावा हे कुणाच्याच हातात नाही. अर्थात जात कोणाच्याच हातात नाही. परंतु सद्गुणी व सुयोग्य बनणं आपल्या हातात आहे. खरे पाहता भारतीय संस्कृतीत जातीप्रथेला कोणतेही महत्त्व दिले गेले नाही. प्रत्येक मनुष्य एकाच ईश्वराचा अंश आहे आणि प्रत्येकात ईश्वराचा अंश आहे. एकात्मतेचा व परस्परांप्रती बंधुत्वाचा हाच संदेश आपली संस्कृती देत आली आहे".


राजकारणातील जातीय शक्तींवर लताप्रहार करताना हे नृसिंह सांगतात की काही सत्तालोलूप राजकारण्यांनी जातीपातीच्या आधारावर हिंदू समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न चालविला आहे. या (समाज) विघातक शक्तींना पराभूत करण्यासाठी आणि हिंदूंच्या एकतेचे रक्षण करण्यासाठी संपूर्ण हिंदू समाजात समरसतेचा भाव निर्माण करण्याची आवश्यकता आहे. पारतंत्र्याच्या कालखंडात परकीय राज्यकर्त्यांनी समाजामध्ये फूट पाडून परस्परांबद्दल द्वेषाची व शत्रुत्वाची भावना उत्पन्न होण्यासाठी जाती प्रथेसारख्या अनेक वाईट प्रथांना जन्म दिला. हळूहळू अशा अनेक वाईट प्रथा संपत चालल्या आहेत. परंतु दुर्दैवाने काही राजकारणी आणि नेते आपल्या स्वार्थासाठी जातीवादाला खतपाणी घालून समाजात फूट पाडण्याचे अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण खेळत आहेत. समाज तोडण्याचा हा खेळ आता खलास झाला पाहिजे. आपल्याला जातीवादाच्या वर उठून समाजाच्या एकतेसाठी प्रयत्न केले पाहिजेत”.


भारतीय मुस्लिमाना आवाहन करत असतानाच त्यांना इशारा देत डॉक्टर प्रोफेसर राजेंद्र सिंह त्यांना स्पष्टपणे ऐकवतात की अयोध्या-मथुरा-काशी यांचे मुसलमानांना काही घेणेदेणे नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की जोपर्यंत अयोध्या-मथुरा-काशी आहे त्या तशाच स्वरूपात राहतील तोपर्यंत हिंदू समाजाच्या हृदयात मुसलमानांबद्दल कधीही प्रेमभाव उत्पन्न होणार नाही. संघ अल्पसंख्यांक यांच्या विरोधात नाही. मी त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी राष्ट्रसेवेसाठी आम्हाला साथ द्यावी. जर मुसलमानांनी आम्हाला साथ दिली तर खूपच चांगले होईल. जर ते आमच्या बरोबर आले नाहीत तर चिंता करण्याचे काही कारण नाही. जर ते आमच्या मार्गाच्या मध्ये आले तरीदेखील आम्ही पुढे जाऊ”.


अर्थव्यवस्थेवर आपले विचार व्यक्त करत असताना व डाव्या तसेच उजव्या अर्थव्यवस्थेला नाकारताना स्वदेशीचे हे पुरस्कर्ते बोलतात की आम्हाला समाजवादी अर्थव्यवस्था व पाश्चिमात्य अर्थव्यवस्था, दोन्हीही मान्य नाहीत. भारतीय अर्थव्यवस्था व तिची रचना याहून खूपच वेगळी आहे. समाजवादी अर्थव्यवस्था आणि सरकारने पब्लिक सेक्टर इंटरप्राईजेस वर निष्कारण दिलेला जोर यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठे नुकसान सोसावे लागले आहे. भारतीयांनी स्वदेशीचा कधीच तिरस्कार केला नाही. स्वदेशी आंदोलन हे देशभक्तीचे आंदोलन आहे”.

 

राज्जुभैय्यांचे हे वैचारिक धन पुढील अनेक वर्षे समाजाची श्रीमंती वाढवीत राहील यात शंका नाही.