इदं न मम
भगवान श्रीकृष्णाने
भगवद्गीतेमध्ये ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ अशी शिकवण दिली आहे. याचा अर्थ असा की ‘फळाची आशा न धरता काम करत जा. जे काम तू करतोस ते करणे फक्त तुझ्या
हाती आहे परंतु काम केल्यानंतर फळ मिळणे मात्र तुझ्या हाती नाही’. आपण जे कार्य करीत
आहोत ते कर्तव्य भावनेने करणे इष्ट आहे आणि त्यासाठी आपण कुठल्याही
प्रकारे त्याचे श्रेय घेणे योग्य नाही अशी आपली
संस्कृती आपल्याला शिकवते. ‘हे
माझे नाही, हे जीवन, ही क्रिया,
माझे काहीही नाही, माझ्यासाठी काहीही नाही’ ही ती शिकवण.
यामुळेच की काय भारतीय संस्कृतीत व हिंदू परंपरेत कोणतीही पूजा-अर्च्या-यज्ञ केल्यानंतर त्याचे सारे पुण्य, सारे श्रेय हे प्रत्यक्ष भगवंताला देण्याची प्रथा आणि
परंपरा आहे. ‘श्रीकृष्णार्पणमस्तु’ असं म्हणून
आपण उदक सोडतो. उदक सोडणे, पाणी
सोडणे याचा अर्थच असा की ते कार्य, ती पूजा, तो यज्ञ भगवंताला अर्पण करणे. एखादी गोष्ट जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा त्या गोष्टीवर आपला काही
अधिकार राहत नाही. आणि म्हणून हिंदू धर्मात व संस्कृतीत
ब्रह्मचर्यश्रमात, गृहस्थाश्रमात,
वानप्रस्थाश्रमात तसेच संन्याशाश्रमात वेगवेगळी कर्तव्य करीत असताना ती स्थितप्रज्ञ वृत्तीने पार पाडावीत असे सांगितले आहे.
माणूस तेव्हा निराश होतो जेव्हा
त्याची इच्छापूर्ती होत नाही. जर एखाद्या गोष्टीबद्दल आपण आशाच धरली नसेल तर निराश होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. एकदा का इच्छा किंवा आसक्तीपासून
आपण दूर राहिलो तर निराशेचे ढग आपल्यावर दाटून येणार नाहीत. एखादं कर्तव्य
पार पाडत असताना आपण केवळ निमित्तमात्र आहोत व नियतीच आपल्याकडून काही ना काही
प्रयोजनासाठी कार्य करून घेत आहे असे ज्यावेळी मनुष्य मानतो त्यावेळी त्याच्या मधील ‘मी’ पणा संपतो, अहंभाव नष्ट होतो, अभिमान गळून पडतो व निरपेक्ष
भावनेने तो कर्तव्य बजावू
लागतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघात व्यक्ती पूजा नाही. कोणत्याही कार्याचे श्रेय कोणालाही वैयक्तिकरित्या घेता
येत नाही. जे काही कार्य तुम्हाला नेमून दिले आहे ते संघटनेच्या संपूर्ण कार्याचा
एक भाग आहे. तुमचे काम कितीही महत्त्वाचे असले तरी तुम्ही नाममात्र
आहात व ‘संघटन सर्वतोपरी’
आहे. त्यामुळे तुम्ही केलेले काम हे संघटनेला अर्पण करायचे आहे हा तो भाव आहे.
या भावामुळे, या भावनेमुळे
संघटनेच्या कार्यातील आपला सहभाग हा जरी कितीही महत्त्वाचा असला तरी ‘मी’ महत्त्वाचा नाही ही भावना उत्पन्न होते. याच भावनेने राष्ट्रीय
स्वयंसेवक संघात गेल्या शंभर वर्षात
अनेक थोर विभूतींनी आपले सारे जीवन अर्पण करून
संघकार्य केले आहे. यातील फक्त काही जणांचा उल्लेख
इतिहासात आढळतो. असंख्यजण आपापल्या परीने, आपापल्या ठिकाणी संघकार्य करता करता अनंतात
विलीन झाले पण त्यांचा
उल्लेख मात्र कुठेही आढळत नाही. याचं कारण संघ
स्वयंसेवकांमध्ये असलेली ‘इदम न मम’ ही भावना होय. ‘नाही चिरा नाही पणती’ अशी
अवस्था या असंख्य पायाच्या दगडांची आहे. परंतु त्याबद्दल
कोणाही स्वयंसेवकाला यत्किंचीतही दुःख नाही. ‘मातृभूमीला परम वैभवाकडे नेताना जो मार्ग स्वीकारावा लागतो
तो काट्याकुट्यांनी भरलेला आहे’ हे संघकार्य सुरू करण्याआधीच
सर्वांना माहीत असते. स्वातंत्रवीर सावरकरांच्या शब्दात
वर्णन करायचे झाले तर असे म्हणता येईल
की
घेतले व्रत न हे अम्ही
अंधतेने,