राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
रविवार, २ फेब्रुवारी, २०२५
संघ : माणूस घडविणारी फॅक्टरी
संघाचा उद्देश ‘निःशेष हिंदू समाजाचे संघटन’ हा जरी असला तरी हिंदू समाजामध्ये असलेल्या आणि काही कारणामुळे परंपरांचा भाग
बनलेल्या अनिष्ट प्रथा बदलून जातीपाती विरहित हिंदू समाज घडविणे आणि या भारतभूमीला आपली माता समजणाऱ्या, हिंदुस्तानी संस्कृतीला आपले मानणाऱ्या व
या देशात असलेल्या सर्व नागरिकांना समान न्यायाने वागवणाऱ्या एका सशक्त बलशाली
समाजाची निर्मिती करणे हा देखील आहे.
व्यावहारिक जीवनात जगत असताना आपला अनेक क्षेत्रांची संबंध
येतो. विविध क्षेत्रात विविध प्रकारचे, मतांचे,
विचारांचे, आचारांचे लोक कार्य
करत असतात. त्यांच्या चांगल्या-वाईट
वागण्याचा आपल्यावर निश्चितच परिणाम होतो. जर आदर्श आचारांचे लोक आपण निर्माण करू शकलो तर असे लोक कोणत्याही क्षेत्रात
गेले तरी आपल्या परीने हे लोक त्या क्षेत्रात प्रभावी कामगिरी करू शकतील यावर संघाचा विश्वास आहे. आणि त्यामुळेच की काय, जर समाज सुदृढ करायचा असेल तर चांगली लोकं घडविणे जरुरीचे आहे असे संघ मानतो.
समाज म्हणजे दगड, माती, धोंडे नव्हे. समाज म्हणजे नदी, नाले, डोंगर
नव्हे. समाज म्हणजे मोठमोठ्या इमारती व भव्य दिव्य आस्थापना
नव्हे. समाज म्हणजे शस्त्रे किंवा अस्त्रे नाही तसेच समाज
म्हणजे पैसा-अडका, दाग-दागिने, हिरे-मोती-जवाहर पण नाही. समाज म्हणजे माणसांचा समूह. जर माणसे चांगली असतील तर समाज चांगला होतो. जर
माणसेच वाईट असतील तर समाज चांगला कसा बरे होईल? त्यामुळे जर
या देशातील बहुसंख्यांक असलेला हिंदू समाज चांगला हवा असे वाटत असेल तर सर्व
हिंदूंना आधी सर्वप्रथम चांगले व्हावे लागेल. पण चांगले
म्हणजे नेमके काय? आणि समाजाच्या दृष्टिकोनातून चांगले
म्हणजे नेमके काय? हा प्रश्न उद्भवतोच आणि याचे उत्तर
संघाच्या अनेक सरसंघचालकांनी आपल्या अनेक बौद्धिकातुन
या आधीच दिले आहे.
मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे व तो समूहाने
राहतो. त्यामुळे त्याला समूहाच्या शिस्तीत व
मान्यतेने राहावे लागते. जर समूहात राहणारा प्रत्येक प्राणी हा जर समूहाच्या
शिस्तीत राहिला तर त्याला
संरक्षण तर मिळतेच पण त्याचबरोबर समूहाने कमावलेल्या खाद्यामध्ये
वाटादेखील मिळतो. थोडक्यात त्याची अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांची पूर्ती होते. परंतु
माणसाबद्दल बोलायचे झाले तर माणसाला केवळ अन्न, वस्त्र, निवारा या तीनच गोष्टी लागतात असे नाही तर जगण्यासाठी त्याला याहूनही अधिक
गोष्टींची गरज भासते कारण त्याला भावना असतात.
आणि त्यामुळे या गरजांचा पूर्ती करण्यासाठी एका संस्कृतीची
निर्मिती होते अथवा उभारणी केली जाते. या संस्कृतीत स्वतःला जोडून घेणे व
आपल्याबरोबर इतरांचाही विकास करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे. प्रत्येक जण समाजात एकमेकांवर अवलंबून आहेत. रज-तम-सत्व आदी विकारांबरोबर षड्रिपू सुद्धा मानवी
स्वभावाचा एक हिस्सा आहे. पण त्याचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा परस्परांच्या संबंधात कटुता निर्माण
होऊ शकते व ही कटूता कधीकधी समाजाला घातक ठरू शकते.
हे टाळण्यासाठी जर सर्व माणसे गुणवान, नीतिवान
व आदर्श विचारांचे पालनकर्ते झाले तर खऱ्या अर्थाने समाजासमोरील सर्व
प्रश्न सुटतील असा संघाचा विश्वास आहे. त्यामुळे सद्विचारी नागरिक निर्माण करणे हे संघ आपले कर्तव्य मानतो. अशा रीतीने एकदा
का असा माणूस घडला की त्यानंतर त्याने समाजाच्या विविध क्षेत्रात सामान्य रूपाने काम करावे हे संघाचे मत आहे. असे जर झाले तर प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे, योग्यतेप्रमाणे, संधीप्रमाणे प्रत्येकाला योग्य
त्या क्षेत्रात काम करता येईल व हा प्रशिक्षित व सदाचारी, सद्विचारी, गुणवान, नीतिवान माणूस त्या क्षेत्रात काम करत असताना चांगलाच वागून इतरांना मदत
करेल व समाजाला अधिक सुदृढ बनवेल असा संघाला विश्वास आहे.
त्यामुळे संघामध्ये येणारा स्वयंसेवक शारीरिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या,
सांस्कृतिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, धार्मिक दृष्ट्या, व्यावहारिक दृष्ट्या सुदृढ, सुशिक्षित व प्रशिक्षित करून त्याला समाजामध्ये सोडण्याचे काम संघ करतो.
अगदी सामान्य प्रकारची खाजगी नोकरी करताना
सुद्धा ती प्रामाणिकपणे करणे गरजेचे
असते. कुटुंबाशी, नातेवाईकांशी, शेजाऱ्यांशी,
आपल्या समाजबांधवांशी, गावकऱ्यांशी किंवा इतर देशवासीयांशी
वागत असताना जर सुसंस्कृतपणे, प्रेमाने, सन्मानाने वागले तर सर्वांनाच ते आवडेल.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा