बौद्धिके
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
बुधवार, ५ फेब्रुवारी, २०२५
चांगला मनुष्य घडवायचा असेल तर शरीराबरोबर मनाचीही मशागत करावी लागते आणि ही
मशागत नियमित करावी लागते.
कित्येक वेळा साध्या-साध्या गोष्टी सुद्धा आपल्या विस्मरणात जातात. शाळा-कॉलेजात
शिकवलेल्या कित्येक गोष्टी फक्त परीक्षेपुरत्या लक्षात राहतात व नंतर त्या
विसरल्या जातात. त्यामुळे कित्येक चांगल्या
गोष्टींची उजळणी वा पारायणे करावी लागतात. आधी सांगितल्याप्रमाणे संघ ही चांगला माणूस घडविण्याची फॅक्टरी आहे. चांगला माणूस तो की जो शरीराने व
मनानेही सुदृढ आहे.
संघशाखांमध्ये खेळ खेळत असताना, योग, व्यायाम, दंड, लेझीम सारखे शरीर धष्टपुष्ट
करणारे क्रीडाप्रकार करत असतानाच, मनाची योग्य ती मशागत होण्यासाठी बौद्धिकांची आवश्यकता असते, याला प्रवचन, भाषण, कीर्तन वा लेक्चर्स असे तुम्ही काहीही म्हणू शकता. एखादंच कीर्तन ऐकल्यावर जसा
माणूस गुणी बनत नाही तसा एकदाच सत्संग
केल्यानंतर त्याला सत्य कळतेच असे नाही. गुणी बनण्यासाठी किंवा सत्य समजण्यासाठी अनेक कीर्तने, प्रवचने, भाषणे पुन्हा-पुन्हा ऐकावी लागतात किंवा नियमितपणे सत्संग करावा लागतो.
ज्ञानप्राप्तीचे तीन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे अनुभवाने मिळणारे ज्ञान.
आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडत असतात, आपण जे काही पाहत असतो त्यातून आपण अनुभव समृद्ध होतो व ज्ञानवर्धन होते. दुसरा मार्ग म्हणजे वाचन. ग्रंथ वाचनाने ज्ञान प्राप्त होते व तिसरा
मार्ग म्हणजे श्रवण किंवा ‘श्रुती’. गुरुमुखातून किंवा ज्येष्ठांच्या, ज्ञानी, तपस्वी व त्या-त्या
क्षेत्रातील तज्ञांच्या प्रवचनांच्या माध्यमातून व ती ऐकून ज्ञान प्राप्त होते. शिक्षणाचा ‘श्रुती’ हा सर्वोत्कृष्ट व सर्वात सोपा
मार्ग आहे. अगदी निरक्षर अथवा दृष्टिहीन सुद्धा केवळ ‘श्रुती’ साधनेने ज्ञानी होवू शकतो. बहुश्रुत होणे
म्हणजेच ज्ञानी होणे होय.
बहुश्रुतता हे वरदान आहे. गुरुमुखातून आलेले ज्ञान आपण ज्यावेळी श्रवण करतो
त्यावेळी आपल्याला
त्याची लगेचच जाण होते व
ज्ञानप्राप्ती होते हे लक्षात घेऊन संघस्वयंसेवक बहुश्रुत, ज्ञानी व्हावेत यासाठीसंघामध्ये बौद्धिकांचे आयोजन केले जाते. इतर अनेक
गोष्टींबरोबर बौद्धिके हे संघ स्वयंसेवकांच्या ज्ञानप्राप्तीचे सर्वात प्रमुख साधन आहे.
संघाच्या शाखेमध्ये वेळेची मर्यादा असल्यामुळे छोटी-छोटी बौद्धिके घेतली जातात
परंतु संघाच्या कार्यक्रमात, संघशिक्षा वर्गात, तसेच वेगवेगळ्या
बैठकांदरम्यान जसा वेळ मिळेल तसा व जशी आवश्यकता भासेल तशी बौद्धिके आयोजित केली जातात. प्रामुख्याने वीररसपूर्ण किंवा
भक्तीरसपूर्ण असलेली ही बौद्धिके काही वेळा
करुणारसपूर्ण देखील असतात. बौद्धिकांचा उद्देश हा भाषणबाजी करण्याचा नसून श्रोत्याला ज्ञानप्राप्ती व्हावी, ज्यामुळे त्याला नेमून दिलेले कार्य करण्यास मदत होईल हा असतो. एवढेच नव्हे तर हाती घेतलेल्या कार्याचा कार्याकारणभाव समजून सांगणे, कर्तव्यांप्रती निष्ठा बाळगण्यासाठी मनाला तयार करणे, ध्येयप्राप्तीसाठी येणाऱ्या
प्रत्येक संकटाला कणखर मनाने सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी करणे हे व असे अनेक उद्देश असतात.
संघामध्ये बौद्धिक म्हणजे प्रवचन देण्याचे दुसरे प्रमुख कारण की
संघस्वयंसेवकांना संघाच्या ध्येयधोरणांशी परिचय व्हावा, संघ कळावा व संघस्वयंसेवक
‘संघानुकूल’ घडावा. संघाची वेगवेगळ्या प्रश्नांवरची भूमिका संघ स्वयंसेवकांपर्यंत पोहोचविण्याचे काम बौद्धिके करतात. यामुळे संघस्वयंसेवक
समाजामध्ये त्याला
विचारण्यात येणाऱ्या
प्रश्नांना उत्तरे देण्यास सक्षम तर होतोच पण त्याला जर एखाद्या प्रश्नासंदर्भात
काही शंका असतील तर त्याचेही
निरसन होते.
कित्येक वेळा वर्तमानातील घटनांवर संघाची भूमिका स्पष्ट करणारी बौद्धिके असतात तर कित्येक वेळा समयोचित विषयांवर बौद्धिके असतात.
उदाहरणार्थ १४ एप्रिल किंवा ६ डिसेंबरच्या
दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयावर बौद्धिक असते तर २५ जूनच्या दिनी नव्या संघस्वयंसेवकांना आणीबाणीच्या काळ्यापर्वाची, त्यावेळी कारागृहात गेलेल्या संघ स्वयंसेवकांची व आणीबाणीविरुद्ध संघाने दिलेल्या लढ्याची आठवण करून दिली
जाते.
बौद्धिकाला विषयाचे बंधन नसते. शूरवीरांच्या यशोगाथा ते आंतरराष्ट्रीय विषय, राष्ट्रापुढील समस्या ते छत्रपती शिवाजी व संभाजी महाराज, महाराणा प्रताप, सम्राट पृथ्वीराज चौहान, राणा संग, राजा पौरस, सम्राट अशोक, सम्राट चंद्रगुप्त मौर्य, आचार्य चाणक्य आदी
महापुरुषांच्या कथा यावर बौद्धिके घेतली जातात. १८५७ च्या स्वातंत्रसमरामधील महानायक, ब्रम्हवर्ताचा क्रांतिनेता श्रीमंत नानासाहेब पेशवे, झाशीची समरलक्ष्मी राणी लक्ष्मीबाई, पहिला क्रांतिवीर हुतात्मा मंगल पांडे, मराठ्यांचा शेवटचा सेनापती तात्या टोपे, जगदीशपुरचा राणा कुमार सिंह
यांच्या अभूतपूर्व शौर्याच्या कहाण्या बौद्धिकांत सतत वर्णिल्या जातात.
भारतीय स्वातंत्रलढ्यातील आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर विनायक व गणेश दामोदर सावरकर, चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंह, शिवराम हरि राजगुरु, रामप्रसाद बिस्मिल, उधम सिंह, खुदीराम बोस, अशफाकउल्ला खान, अनंत लक्ष्मण कान्हेरे , कृष्णाजी गोपाळ कर्वे, बटुकेश्वर दत्त, जतिन्द्रनाथ दास, दुर्गावतीदेवी, मदनलाल ढिंगरा, अरबिन्द घोष, रासबिहारी बोस, फणिंद्रनाथ घोष, राजेंद्र लाहिरी, बीना दास, भाई कोतवाल , प्रतिसरकार स्थापन करणारे
क्रांतीवीर नाना साहेब पाटील, विष्णू गणेश पिंगळे, पांडुरंग सदाशिव खानखोजे, उमाजी नाईक, राघोजी भांगरे, दामोदर , बाळकृष्ण व वासुदेव हरी चापेकर हे तीन
चापेकर बंधू, सुखदेव थापर आदी
स्वातंत्र्यवीरांच्या शौर्यगाथा यावर बौद्धिके घेतली जातात. बौद्धिकांमुळे आपल्या थोर पूर्वजांबद्दल आदर, प्रेम व कृतज्ञतेची भावना उचंबळुन येते हे निश्चित.
संघाचे वरिष्ठ पदाधिकारी व प्रचारक यांच्यावर बौद्धिक घेण्याची जबाबदारी असते.
यासाठी विषय वाटून
दिलेले असतात ज्यामुळे
वक्त्यांना त्या विषयाची पूर्वतयारी आधीच करता येते. बौद्धिकामध्ये विषय मांडत असताना अनेक थोर मंडळींचे, नेत्यांचे, साधू-संतांचे दाखले द्यावे लागतात. परंतु हे दाखले देत असताना ते जर श्रोत्यांच्या माहितीचे असतील तर त्याचा अधिक प्रभाव पडतो. मराठीमध्ये
बौद्धिक देत असताना सर्वसंतश्री ज्ञानेश्वर, नामदेव, गोरोबा, जनाबाई, कान्होपात्रा, सेनामहाराज, चोखामेळा, भानुदास, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई, रामदास, रोहिदास, जनाबाई, मुक्ताबाई, पुंडलिक आदी संतांच्या अभंगाचा उल्लेख केला,
हिंदीमध्ये बौद्धिक देताना
संतकवी तुळशीदास किंवा कबीराच्या दोह्याचा उल्लेख केला, गुजरातीमध्ये बौद्धिक
देताना संत नरसी मेहता याच्या कवनांचा दाखला दिला तर तो श्रोत्यांना अधिक भावतो. कन्नडामध्ये बौद्धिक देताना राणी चेन्नम्मा किंवा स्वामी बसवेश्वर
महाराजांचा उल्लेख
करणे जसे फायद्याचे ठरते
तसेच बंगालीमध्ये बौद्धिक देताना रवींद्रनाथ टागोर, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण परमहंस यांच्या
गोष्टी सांगितल्या तर सकारात्मक फरक पडतो. पण याचबरोबर वेगवेगळ्या प्रांतात असलेल्या वेगवेगळ्या थोर मंडळींची इतर प्रांतातील श्रोत्यांना ओळख
व्हावी म्हणून, बंधूभाव वाढावा म्हणून कित्येक वेळा बौद्धिके घेतली जातात. अशावेळी आपल्याला माहीत
नसलेली माहिती प्राप्त होते. ज्ञानवर्धन होते.
बौद्धिकांचा उद्देश फक्त संघकार्य करण्यापुरता मर्यादित नसून व्यावहारिक जीवन जगण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग व्हावा हा असतो.
संघामध्ये अतिवरिष्ठ पातळीवर ‘अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख’ म्हणून एक पद असते.
या पदावरील अधिकारी व्यक्ती अनेक
विचारवंतांची चर्चा करून आवश्यकतेनुसार बौद्धिकांचे विषय ठरवतात, संदर्भ जुळवतात. बौद्धिके अधिक
काव्यात्मक व आकर्षक व्हावीत यासाठी खास प्रयत्न केले जातात. वेळेची मर्यादा असल्यामुळे थोड्या वेळात, पाल्हाळ न लावता विषय
श्रोत्यांपर्यंत मांडावा लागतो. त्यामुळे नेमकेपणे बोलण्याची सवय लागते. प्रत्येक बौद्धिकांतून संघस्वयंसेवकांना स्पष्ट संदेश
मिळावा म्हणून बौद्धिकाची भाषा सर्वाना कळेल अशी साधी, सोपी व सरळ असते.
वक्त्याच्या स्वभावानुसार बौद्धिकांची मांडणी होते.
काही वक्ते , बौद्धिके एका सरळ स्वरात
ऐकवतात तर काही अनुभवी वक्ते आवाजाचे अचूक चढ-उतार करून बौद्धिके अधिक प्रभावी करतात. संघामधील अनेक ज्येष्ठ प्रचारक त्यांच्या
बौद्धिक घेण्याच्या हातोटीमुळे ओळखले जातात.
अशा प्रचारकांना त्यांच्या क्षेत्राच्या बाहेरही मोठी मागणी असते.
थोडक्यात संघातील बौद्धिके म्हणजे मेंदूचे खाद्य असून नित्यनवीन बौद्धिक ऐकणे
ही एक प्रकारची पर्वणीच असते. त्याने ज्ञानवर्धन तर
होतेच पण श्रोत्यांचे गुणवर्धन पण होते. यामुळेच की काय संघामध्ये बौद्धिकांना एक अनन्यसाधारण स्थान आहे. किंबहुना बौद्धिके हे संघाचे अविभाज्य अंग आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा