राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
गुरुवार, १३ फेब्रुवारी, २०२५
संघाचा शब्दकोश
संघामध्ये प्रत्येक गोष्ट पूर्ण
विचारांती केली जाते. अगदी शब्दांचच पहा ना. एरवी सर्वसामान्य आयुष्यात सहसा न वापरले
जाणारे किती तरी शब्द संघामध्ये प्रचलित आहेत. परंतु त्यामागे ‘आपण काहीतरी वेगळे करतोय’ ही भावना नसून त्या शब्दांमागे शास्त्रीय व उदात्त असा भारतीय परंपरेला, तत्त्वज्ञानाला व व्याकरणाला अनुरूप असाच
अर्थ असतो, असाच भाव असतो. त्यामुळे
संघातील अनेक शब्द अभ्यासताना संघाच्या विचारांची
व्याप्ती किती मोठी आहे
याचा साक्षात्कार होतो.
‘प्रवास’ हा शब्द संघामध्ये प्रचलित आहे. इंग्रजी भाषेत त्यासाठी ट्रॅव्हल किंवा ट्रॅव्हलिंग हे शब्द आहेत. परंतु इंग्रजी भाषेतील ट्रॅव्हलिंग या शब्दाचा ‘एका
ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे’ एवढा सीमित अर्थ आहे.
याउलट संघामध्ये ‘प्रवास’ हा अनेक शब्दांचा,
क्रियांचा व भावनांचा एक समूह आहे. प्रवासामध्ये वास, निवास, सहवास, आदी शब्द देखील अंतर्भूत आहेत. तसेच संपूर्ण
प्रवासासाठी करण्यात येणाऱ्या योजनेचाही समावेश आहे. ‘प्रवास’ म्हणजे नुसतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी
जाणं नव्हे तर ते आपण कशासाठी जात आहोत? तेथे जाऊन नक्की काय
करणार आहोत? ते करून आपल्याला व आपल्या संघटनेला काय फायदा
होणार आहे? याचा विचारही आहे. कुठून
निघायचं? कधी निघायचं? कसं निघायचं? बरोबर काय-काय
न्यायचं? कोणा-कोणाला न्यायचं? याचबरोबर गंतव्य स्थानावर कधी पोहोचायचं? पोहोचल्यावर काय कार्य करायच? याचाही सांगोपांग विचार आहे. त्यामुळे संघस्वयंसेवक प्रवास करत असताना त्यांचा एकही क्षण वाया जात
नाही व प्रवासा दरम्यानही संघकार्य करायला भरपूर वेळ मिळतो.
‘बैठक’ ला इंग्रजीमध्ये तसा समानर्थी शब्द ‘मीटिंग’ हा आहे. परंतु मीटिंग या शब्दाने केवळ ‘भेटणे’ हाच भाव जागृत होते. एका अर्थी हा शब्द कोरडा, थोडक्यात ओलावा नसलेला आहे. परंतु अगदी जेवायला बसताना, पूजेला बसताना आपण
मांडी घालून बसतो त्याला ‘बैठक’ असे
म्हणतात. जेवण सुद्धा ‘उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ असे म्हणत, हे पुण्याचे व ईश्वरीय काम आहे या भावनेने, आसनस्थ होवुनच जेवतो. ‘बैठक’ ही भूमीवर, मातृभूमीवर आसनस्थ होवून करण्याची गोष्ट
आहे. अगदी वेळ काढून चर्चा करण्याची गोष्ट आहे. उभ्या उभ्या उरकण्याची गोष्ट नाही. अगदी तीच भावना आपल्यामध्ये
जागृत व्हावी व एकाच समतलावर म्हणजे सर्वांनी ‘इक्वल लेव्हल’ वर बसून चर्चा करावी यासाठी ‘बैठक’ या शब्दाचा संघामध्ये जाणीवपूर्वक उपयोग केला जातो.
‘चिंतन’ हा आणखीन एक संघामध्ये वापरला जाणारा शब्द आहे. चिंतन करणे म्हणजे ज्याला इंग्रजीत ‘डीप थिंकिंग’ म्हणतात असा केवळ ‘खोलवर विचार करणे’ एवढ्या
अर्थापुरते मर्यादित नाही. चिंतनामध्ये याहून अधिक
गोष्टी अभिप्रेत आहेत. चिंतनामध्ये नुसता खोलवर नाही तर
सर्वदूर व सर्वव्यापी विचार करणे अभिप्रेत आहे. चिंतनामध्ये चित्त
येते व ते चित्त सुद्धा शुद्ध असण्याची अपेक्षा असते. आपल्या संस्कृतीत आधी इंद्रिये
अर्थात शरीर आहे, शरीरापुढे मन आहे, मनापुढे बुद्धी आहे,
व बुद्धीपुढे आत्म्या आहे. या आत्म्यापर्यंत जाऊन
सर्वसमावेशक व सर्वांना संतोषदायक अशा सत्याचा अर्थात निर्णयाच्या अमृतकुंभाचा शोध घेणे म्हणजेच चिंतन होय. चिंतनामध्ये नुसतं ज्ञान नाही तर अनुभवाचा देखील उपयोग करून
घेणे गरजेचे आहे. चिंतन म्हणजे मनाने मनाला विचारलेल्या प्रश्नांना मनाने दिलेली उत्तरे, त्या उत्तरांचा बुद्धीच्या/ तर्कांच्या कसोटीवर कस लावणे व त्याही
पुढे जाऊन शेवटी आत्म्याचे समाधान होईपर्यंत विचारांची प्रक्रिया निरंतर चालू ठेवणे होय.
‘बौद्धिक’ हा शब्द संघामध्ये प्रवचन, लेक्चर,
भाषण आदींसाठी प्रचलित आहे ज्यावर एक वेगळा लेख या आधीच लिहिण्यात आला आहे. पण थोडक्यात असे म्हणावेसे वाटते की बुद्ध म्हणजेच ज्ञान. ज्या प्रवचनात, लेक्चर, भाषणामध्ये ज्ञान नाही ते बौद्धिक नाही व ज्यात ज्ञान आहे तेच फक्त
बौद्धिक आहे. संघामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रवचन, लेक्चर किंवा भाषण ज्ञानाशिवाय करण्याची परंपरा किंवा प्रघात नाही. त्यामुळे संघामध्ये फक्त आणि फक्त बौद्धिके होतात याचे कारण त्यामध्ये
असलेल्या ज्ञानात आहे.
‘घोष’ म्हणजे संघामध्ये संचलनाच्या वेळी जो ‘बँड’ वाजविला जातो तो. संघातील
घोषाबद्दलही एक स्वतंत्र लेख याआधीच लिहिला आहे. परंतु बँड हा शब्द ‘वाद्यांचा समूह’ एवढ्या पुरताच ‘घोष’ या शब्दाशी निगडित
आहे. पण संघाच्या घोषामध्ये (मातृभूमीचा) जयघोष आहे व (समर्पणाची) घोषणा देखील आहे. एवढंच नव्हे तर ‘बाराखडी’ मध्ये जी स्वर आणि व्यंजन असतात त्यातील स्वरांना ‘घोष’ किंवा ‘सघोष’ म्हटलं जातं तर
व्यंजनांना ‘अघोष’ म्हटलं जातं.
उदाहरणार्थ अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अं, अ: हे स्वर केवळ कंठातील
स्वररज्जूंच्या कंपनांनी उच्चारता येतात.
परंतु व्यंजन उच्चारताना मात्र दात, ओठ, जीभ, टाळू आदींचा उपयोग
अनिवार्य असतो, ज्यामुळे ध्वनी अथवा आवाज उत्पन्न होतो. त्यामुळेच
जी वाद्ये केवळ कंपनामुळे ध्वनी उत्पन्न करतात त्यांच्या समूहाला ‘घोष’ असे म्हणणे हे अधिक तर्कपूर्ण व शास्त्रीय
ठरते.
‘थांबणे’ हा शब्द सुद्धा
संघात एका वेगळ्या अर्थाने वापरतात. घरदार सोडून संघ कार्यासाठी पूर्ण वेळ बाहेर
पडलेला प्रचारक १,२,३ किंवा अधिक वर्षानंतर ‘थांबायच’ ठरवतो याचा अर्थ असा नव्हे की त्याने
संघकार्य करण ‘थांबावायच’ ठरवल आहे. याचा संघामधील अर्थ असा की त्या संघ
स्वयंसेवकाने काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे फक्त ‘पूर्णवेळ’ संघकार्य करणे थांबवायचे ठरविले आहे. परंतु पूर्ण वेळ संघकार्य करण
थांबवल्या नंतरही तो जेथे राहणार आहे तेथे तो यापुढे घरदार कुटुंब नोकरी व्यवसाय
सांभाळून संघकार्य करणारच आहे. संघात ‘थांबणे’ हा ‘पूर्णविराम’ नसुन ‘स्वल्पविराम’ आहे हे
आपण समजून घेणे महत्वाचे आहे.
काही साध्या-साध्या वाटणाऱ्या शब्दामधूनही जर आपण अचूक संदेश देऊ शकलो तर त्यासारखे उत्तम ‘कम्युनिकेशन
स्किल’ काहीच नसेल. संघजीवनात अतिशय चपखल शब्दांचा
वापर करून संघाने हेच तर केले आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा