राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
मंगळवार, १८ फेब्रुवारी, २०२५
आधी हाताला चटके
१९२५ साली स्थापन
झालेल्या संघाच्या गेल्या ९९ वर्षाच्या वाटचालीतील दुसरा टप्पा हा संघाच्या विस्ताराचा होता. १९७३-१९९४ हा २१ वर्षांचा दुसरा कालखंड म्हणजे
ज्यात संघाचे नेतृत्व बाळासाहेब देवरस यांच्याकडे होते तो कालखंड. दुसऱ्या
टप्प्यात लोकशाही टिकवण्यासाठी लढा देताना संघविचारांना जवळ अश्या राजकीय पक्षाला
बळ देवून आसेतू हिमाचल पसरलेल्या खंडप्राय देशातील सर्व प्रदेशात पाय रोवणे हे ध्येय होते.
बाळासाहेबांनी सरसंघचालकपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर माधवराव मुळे यांची सरकार्यवाह
म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी म्हणजे १९७४
साली ज्या छत्रपती
शिवाजी महाराजांना संघात अतिशय मानाचे स्थान आहे, एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या दिवशी हिंदवी स्वराज्य
स्थापन केले तो दिवस संघात एक उत्सव म्हणून साजरा होतो. त्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदू साम्राज्य दिनाची’ तीनशेवी वर्षपूर्ती संघाने संपूर्ण देशभर साजरी
केली. यानिमित्ताने
छत्रपती शिवाजी महाराजांना संघातर्फे मानवंदना
तर देण्यात आलीच
पण त्याचबरोबर हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून
ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तशीच
हिंदूराष्ट्राची स्थापना या देशात व्हावी अशी प्रतिज्ञा ही करण्यात आली.
दुर्दैवाने
त्याच्या पुढील वर्षीच म्हणजे १९७५ साली
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशभर आणीबाणी घोषित केली व संघावर बंदी आणली.
सरसंघचालकांसहित लाखो संघस्वयंसेवकांना
तुरुंगात डांबण्यात आले. अशा वेळी आणीबाणीला सक्रीय विरोध
करण्याचा निर्णय संघाने घेतला व त्यासाठी ‘अखिल भारतीय लोकसंघर्ष समितीची’ स्थापना
करण्यात आली. आणीबाणीच्या काळात काँग्रेसच्या हातातील
बाहुले बनलेल्या सरकारी अधिकाऱ्यांनी
संघस्वयंसेवकांचे अनन्वित हाल केले पण त्याला न डगमगता संघाने आणीबाणी विरुद्ध
जोरदार लढा दिला.
आणीबाणीची १९
महिन्यांची काळीकुट्ट रात्र
संपल्यावर १९७७ साली सरकारने तुरुंगातून संघासहित सर्व पक्षांच्या नेत्यांची सुटका केली. व त्यानंतर सर्व पक्षांनी एकत्र येऊन
काँग्रेस विरुद्ध एकत्रित निवडणूक लढविण्याचा निश्चय
केला. त्यावेळी स्थापन झालेल्या सर्व पक्षांच्या एकत्र
अशा जनता पार्टी मध्ये संघाला
मानणाऱ्या भारतीय जनसंघाचे विलीनीकरण करण्यात आले. १९७७ च्या लोकसभा
निवडणुकीत इंदिरा गांधींचा दारुण पराभव झाला व जनता पार्टीचे सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर २१ महिन्यांची संघावरील बंदी उठवली गेली.
त्याच
वर्षीच्या अखेरीस आंध्रप्रदेशमधील सागरी किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळाने प्रचंड मोठ्या
प्रमाणात वित्तहानी व प्राणहानी झाली. संघाच्या स्वयंसेवकांनी अहोरात्र खपून
नागरिकांना मदत केली. १९७८ साली ज्येष्ठ संघ प्रचारक व भारतीय
जनसंघाचे द्वितीय अध्यक्ष,
थोर विचारवंत व एकात्म मानवतावादाचे जनक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांवर
आधारित संशोधन करण्यासाठी ‘दीनदयाळ
शोध संस्थान’ ही संस्था स्थापन करण्यात आली. त्यानंतर १९७९ साली संघाच्या
पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेचे दुसरे जागतिक धर्म संमेलन
आयोजित करण्यात आले होते.
या संमेलनास दलाई लामांसहित जगभरातील जवळजवळ सर्व धर्माचे प्रमुख जातीने उपस्थित होते.
संघ
विस्तार करण्यासाठी १९८० साली संघाने महाजनसंपर्क अभियान राबविले. ९५
हजार गावातील १ कोटीहून अधिक
कुटुंबांना संघ स्वयंसेवकांनी
प्रत्यक्ष भेटून संपर्क केला.
संघ वाढतो आहे या कल्पनेनेच घामाघूम झालेल्या समाजवादी मंडळींनी दुहेरी सदस्यत्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे जनता पार्टीतील पूर्वीच्या जनसंघामध्ये असलेल्या नेत्यांनी नाईलाजाने बाहेर
पडत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय
जनता पक्षाची स्थापना केली.
१९८१ साली मीनाक्षीपुरम येथे झालेल्या सामूहिक धर्मांतराने
देशभरात संतापाची प्रचंड लाट उसळली. तामिळनाडूमधील ८०० हिंदू
कुटुंबीयांचे इस्लामी कट्टरपंथीयांनी जबरदस्तीने धर्मांतरण केले. संघाने हा मुद्दा देशभर उचलून जनजागृतीचे
काम केले व हिंदू कुटुंबीयांवर धर्माचे संस्कार व्हावेत म्हणून संस्कार भारतीची
स्थापना करण्यात आली. १९८३ साली
संघाच्या संपूर्ण सहकार्याने/
सहभागाने विश्व हिंदू परिषदेने एकात्मता यज्ञाचे आयोजन केले होते. भारतमाता व गंगामाता यांच्यावरील श्रद्धाभाव वाढवा हा यामागील मुख्य
उद्देश होता.
१९८४ साली इंदिरा
गांधींची दुर्दैवी हत्या झाली त्यावेळी हजारो शिख बांधवांना दिल्ली वा आसपासच्या प्रदेशात ठार मारण्यात आले. त्यावेळी शेकडो शिख परिवारांना सुरक्षा
देण्याचे काम स्वयंसेवकांनी केले. त्याचप्रमाणे दिल्ली व
आसपासच्या प्रदेशात शिख दंगल पीडितांना आसरा व जीवनावश्यक गोष्टी पुरवण्यासाठी
रिलीफ कॅम्प उभारण्यात आले. ऑपरेशन ब्लू स्टार मुळे काही
प्रमाणात मोडतोड झालेल्या अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या उभारणीसाठी झालेल्या कारसेवेत संघ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
१९८८ साली
आद्य सरसंघचालक डॉ.
हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संघाने पुन्हा एकदा महाजनसंपर्क अभियान
राबविले. त्या वर्षी
दीड लाख कुटुंबांची प्रत्यक्ष भेट घेऊन ११ कोटी
रुपयांचा सेवा कार्यासाठी लागणारा निधी जमविण्यात आला. व्यापक संपर्कासाठी व
संघविचारांच्या प्रचारासाठी,
प्रसारासाठी वर्षभरात ठिकठिकाणी ७६ हजारहून
अधिक सभा-संमेलने घेण्यात आली. संघाचे हिंदू समाजाला संघटित करण्याचे
प्रयत्न यशस्वी होतात हे लक्षात आल्यामुळे हिंदूधर्माविरोधी अतिरेक्यांनी २५ जून १९८९ रोजी पंजाब मधील
मोगा शहरात संघशाखेवर हल्ला केला.
दुर्दैवाने यात १८
स्वयंसेवक व सहा सामान्य नागरिक
हुतात्मा झाले व
२८ नागरिक गंभीररित्या जखमी झाले. या हल्ल्यामुळे संघ राष्ट्रद्रोही शक्तींच्या निशाण्यावर आहे व संघाचे
देशाला बलशाली करण्यासाठी चाललेले काम भारत विरोधी कारवाया करणाऱ्या देशद्रोही
अतिरेक्यांना मुळीच खपत नाही यावर शिक्कामोर्तब झाले.
याच कालखंडात
श्रीराम जन्मभूमी आंदोलन
पेटले होते. विश्व हिंदू
परिषदेच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या आंदोलनात संघ व संघ परिवार सक्रियपणे उतरला
होता. संपूर्ण देशभर रामशिलांचे पूजन होत होते व रामशिला वाजत गाजत अयोध्येला नेल्या जात होत्या. भविष्यात होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या
उभारणीसाठी लागणाऱ्या या शिला भारतीयांच्या श्रद्धेचे व आस्थेचे
प्रतीक होत्या. सहा डिसेंबर
१९९२ रोजी लाखो कारसेवकांनी
साडेचारशे वर्ष चाललेला हा लढा संपवला व मुघल आक्रमक बाबराने श्रीराम जन्मभूमी
मंदिर उद्ध्वस्त करून बांधलेली अनधिकृत बाबरी मशिदच उध्वस्त केली. सहिष्णू असलेला हिंदू समाज जेव्हा जागा होतो, एक होतो तेव्हा इतिहास घडतो हे या घटनेवरून सिद्ध झाले.
परंतु
बाबरी मशिदीचा पाडाव झाल्यानंतर १० डिसेंबर १९९२ रोजी सरकारने संघावर तिसऱ्या बंदीची घोषणा केली. परंतु यानिमित्त नेमलेल्या आयोगाने संघावरील
बंदी असमर्थनीय व अन्यायकारक असल्याचा निष्कर्ष काढला व ४ जून १९९३ रोजी
संघावरील बंदी उठवण्यात आली. दुसऱ्या तसेच तिसऱ्या संघबंदीच्या
या कालखंडात
तृतीय सरसंघचालक बाळासाहेब
देवरसांनी अतुलनीय धारिष्ट्य,
संयम, मुत्सद्दीपणा व नेतृत्वगुणांचा परिचय दिला व संघाला या
संकटकाळातून सहीसलामत बाहेर काढले.
या
आणि पुढील वर्षी माजी सैनिकांच्या कल्याणासाठी ‘अ.भा. पूर्व
सैनिक सेवा परिषदची’
स्थापना करण्यात आली. १९९४ साली संघाच्या १०० वर्षाच्या वाटचालीतील
दुसऱ्या कालखंडाचे महानायक सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी प्रकृतीच्या कारणावरून सरसंघचालकपदाची
सूत्रे खाली ठेवली व प्रो.
राजेंद्र सिंह उपाख्य रज्जूभैया यांची सरसंघचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. याबरोबरच संघाच्या या शानदार शतकी वाटचालीतील
दुसरा टप्पा संपला व तिसरा टप्पा प्रारंभ झाला. त्याचा आढावा आपण पुढील लेखात घेणार आहोत.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा