राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १० फेब्रुवारी, २०२५
संघ प्रचारक
संघ विचार, संघ स्वयंसेवक व सर्वसामान्य नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे
संघाचे पूर्णकालीन प्रचारक. सर्वसाधारणपणे शाखेमध्ये जात
असताना संघ विचारांचे गारुड मनावर स्वार होते व या देशासाठी,
धर्मासाठी, समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे
वाटू लागते. या देशाने, धर्माने व
समाजाने आपल्याला आतापर्यंत जे काही दिले आहे त्याची किंचित का होईना, परतफेड करावी अशी कृतज्ञतेची भावना मनात उत्पन्न होते व हा भावना उत्पन्न
होण्याचा क्षण एका सर्वसामान्य स्वयंसेवकाचे प्रचारकात रूपांतर होण्याचे बीजारोपण असते.
सर्वसाधारणपणे औपचारिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर व
गृहस्थाश्रमाला सुरुवात करण्यापूर्वीचा काळ हा प्रचारक होण्याचा सर्वोत्तम काळ
समजला जातो. वय तरुण असतं. शरीर सशक्त असतं. उत्साह अमाप असतो व काहीतरी वेगळे करण्याची उमेद असते. अशावेळी आपल्या आयुष्यातील एक, दोन किंवा तीन वर्षे संघासाठी द्यावीत असे वाटून अनेक संघ स्वयंसेवक
स्वतःहून संघाचे पूर्णकालीन प्रचारक बनतात. अशा प्रचारकांना
प्रशिक्षित बनवून, योग्य असे मार्गदर्शन देऊन, देशाच्या विविध भागात पाठविले जाते. या भागात राहत
असलेल्या संघ स्वयंसेवकांच्या घरातच त्यांच्या निवासाची व भोजनाची सोय केली जाते. प्रवासासाठी सायकल किंवा दुचाकी यांची देखील सोय केली जाते. प्रचारक संघ स्वयंसेवकांच्या घरी जात-येत असतात. त्यांच्या घरात संपर्क वाढवत असतात. आपलेपणा वाढवत
कौटुंबिक जिव्हाळा जपत असतात. संघवाढीच्या दृष्टिकोनातून
ज्या भागात ते प्रचारक म्हणून काम करीत असतात, त्या भागात
राहणाऱ्या विविध समाजाच्या महत्त्वपूर्ण लोकांच्या ते भेटीगाठी घेत असतात व
त्यांना संघाबद्दल माहिती देऊन जर त्यांच्या मनात संघाबद्दल काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करीत असतात.
असे म्हणतात ‘कॅच देम यंग’. याचा
अर्थ असा की जर तुम्ही एखाद्याला लहानपणीच जवळ केले,
त्याच्यावर तुमचे संस्कार केले तर तो आयुष्यभर तुमचा होतो. संघात शिशुवयापासूनच
म्हणजे साधारणपणे सहा वर्षापासूनच मुलांना शाखांमध्ये घेण्यास
सुरुवात होते. प्रचारक सुद्धा
आपल्या भागात राहणाऱ्या लहान मुलांना शाखेमध्ये येण्यास आकृष्ट करतात. खेळ, कवायत, गोष्टी, गाणी, ऐतिहासिक कथा, पोवाडे, योग, लाठी चालवणे अर्थात दंड,
लेझीम खेळणे, या लहान मुलांना आवडणाऱ्या अनेक
गोष्टी संघ शाखेत दैनंदिन स्वरूपात केल्या जातात. त्यामुळे अगदी लहान वयापासून मुलांचा संघ शाखेत
जाण्याकडे कल असतो. आपल्या विभागात संघ विस्तार व्हावा
म्हणून शाखा वृद्धी झाली पाहिजे या हेतूने प्रचारक आपापल्या विभागात नव्या शाखा
कुठे लावता येतील याचा अंदाज घेत असतात व त्या दृष्टीने नव्या शाखा सुरू करण्याचा प्रयत्न
करतात.
पूर्वीच्या काळी सोशल मीडिया म्हणजे व्हाट्सअप, ट्विटर, फेसबुक,
इन्स्टाग्राम नव्हते. आजच्या
सारखे दूरचित्रवाहिन्यांचे जाळेही
नव्हते. आजच्या
जमान्यात आहेत तशी प्रचाराला
उपयुक्त अशी माध्यमे देखील उपलब्ध नव्हती. संघ विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी थेट वैयक्तिक भेटीगाठी हेच एकमेव
साधन उपलब्ध होते. तसाही संघाचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट म्हणजेच ‘थेट-भेट’ यावरच अधिक विश्वास आहे. त्यामुळे प्रचारक हा एका अर्थाने संघाचा माध्यम
प्रतीनिधि आहे असे म्हटले तरी वावगे ठरू
नये.
‘संघविचार’ हे संघाचे हृदय आहे तर प्रचारक संघाच्या धमण्या आहेत. हृदयापासून वाहणारे रक्त सर्व अवयवांना
पुरेशा प्रमाणात मिळाले तरच हे सारे अवयव सुदृढपणे कार्य करू शकतात. परंतु या अवयवांपर्यंत पुरेसे रक्त पोहोचविण्याचे काम आपल्या शरीरातील धमण्या करत असतात. निरोगी धमण्या हे सुदृढ शरीराचे व्ययच्छेदक लक्षण आहे. धमण्या सुदृढ असतील तरच शरीर सुदृढ राहील हा शरीरशास्त्राचा नियम
आहे. संघाचे प्रचारक
हे या अर्थाने संघ परिवारात धमण्यांचे काम करतात.
भारतीय प्रशासन सेवेत जर सेवा द्यायची असेल तर त्यासाठी ‘युपीएससी’ ची परीक्षा
पास होणे गरजेचे आहे. जोपर्यंत ‘युपीएससी’ ची परीक्षा उत्तीर्ण होत नाही एवढेच नव्हे तर त्या परीक्षेत चांगले गुण
मिळवून गुणवत्ता यादीत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश
मिळत नाही. सरकारी नोकरीत
जिल्हाधिकारी, सचिव, मुख्य सचिव सारख्या अतिमहत्वपूर्ण जबाबदाऱ्या त्यालाच मिळू शकतात जो
‘यूपीएससी’
ची परीक्षा गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होवून भारतीय प्रशासन सेवेत दाखल
होतो. संघामध्ये
सुद्धा साधारणपणे अशाच प्रकारची मांडणी करण्यात
आली आहे. संघामध्ये
कोणताही संघ प्रचारक, जर त्याच्यात अपेक्षित गुण असतील तर, संघाचा सरसंघचालक बनू शकतो. सरसंघचालक, सरकार्यवाह, सहसरकार्यवाह तसेच बौद्धिक, शारीरिक, घोष, प्रचारक आदी
विभागाचे प्रमुख व्हायचे असेल तर त्याची सुरुवात प्रचारक या जबाबदारी पासून होते.
सर्वसाधारणपणे प्रचारकाला त्याच्या गावापासून दूरच्या
ठिकाणी, संघाला जशी आवश्यकता असेल तसं पाठवलं जातं. कित्येक वेळा तर एका प्रांताच्या
स्वयंसेवकाला दुसऱ्या प्रांतात प्रचारक म्हणून पाठवले जाते.
अशावेळी भाषेची अडचण येते पण तीच तर नवी भाषा शिकण्याची संधी असते. संघाच्या नियमानुसार प्रचारक हा ‘अविवाहित’ असावा लागतो. प्रचारकाचा
सुरुवातीचा एक, दोन किंवा तीन वर्षाचा किंवा त्याला वाटेल
तेवढा कालखंड पूर्ण झाल्यावर तो
लग्न करून संसारिक जीवनाची सुरुवात करू शकतो किंवा त्यापुढेही प्रचारक म्हणून
किंवा त्याहून मोठ्या जबाबदाऱ्या घेण्याचे आपल्या
इच्छेनुसार ठरवू शकतो.
एकदा का संघ स्वयंसेवकाने प्रचारक म्हणून थांबायचे ठरवल्यानंतर तो त्याच्या मूळ
गावी येतो व गृहस्थाश्रमात प्रवेश करतो. अशावेळी जरी तो प्रचारक नसला तरी त्याचे
संघकार्य थांबत नसते. संघ
शाखेवर शिक्षक म्हणून किंवा भागात, विभागात किंवा नगरात तो
संघ-कार्यवाह अथवा संघ-चालक म्हणून
संघकार्य करत राहतो.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा