राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

रविवार, २ मार्च, २०२५

  

गांधी हत्या आणि संघ - दमनचक्र

 

वास्तविक पाहता गांधीहत्त्येशी संघाचा दूर-दूरचा ही संबंध नव्हता. संघाच्या कोणत्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर नथुराम गोडसे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांचा संबंध नव्हता. नथुराम गोडसे हे पत्रकार व संपादक होते. ते कट्टर हिंदुत्ववादी होते व तसे असणे हा गुन्हा नव्हता. त्यामुळे त्यांना  संघ असो वा हिंदू महासभा, या दोन्ही संघटना  मुस्लिम धार्जिण्या काँग्रेसपेक्षा जवळच्या वाटायच्या. आणि तसे वाटणे अगदी स्वाभाविक होते. संघ-नथुराम व संघ-गांधीहत्या यांचा परस्पर संबंध आहे हे सिद्ध करणारा नेहरू सरकारकडे  एकही कागदोपत्री पुरावा नव्हता किंवा तशी साक्ष देणारा एकही साक्षीदार नव्हता. गांधीजींची हत्या ही एका स्वतंत्र विचाराच्या, पत्रकार व संपादक असलेल्या व्यक्तीने केलेली दुर्दैवी घटना होती. नथुराम व त्यांच्या या अविचारी कृत्याला समर्थन किंवा प्रोत्साहन देण्याचे संघाला काहीच कारण नव्हते.

 

संघ ही संपूर्णपणे अहिंसक मार्गाने चालवली जाणारी व हिंदू हितासाठी, हिंदू हिताचे समर्थन करणारी स्वयंसेवी संस्था असल्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांचे ना कधी संघाने समर्थन केले ना कधी यापुढे करेल. असे असूनही संघाच्या द्वेषापायी, संघाच्या वाढत्या प्रभावामुळे उठलेल्या पोटशूळामुळे, आत्यंतिक हेकेखोर व हट्टी नेहरूंनी त्यांच्या सहकार्यांचे मत डावलून संघावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. गांधीहत्येच्या खटल्यात हिंदू संघटनांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या नेत्यांना आरोपी करण्यात आले व त्यांच्यावर देशद्रोहासहित खुनासारखे गंभीर आरोप करण्यात आले. यावरून संघ व हिंदुत्व हिंदुस्तानातून संपवायला नेहरू किती उतावीळ झाले होते हे स्पष्ट होते. (भविष्यात संघ व संघ-प्रणीत भाजपा नेहरूंच्या कौटुंबिक पक्षाला व विचारधारेला संपविणार आहे याची पुसटशी कल्पना देखील या माणसाला असती तर त्याची मानसिक अवस्था काय झाली असती याची कल्पनाच केलेली बरी). पण सरकारने प्रचंड प्रयत्न करूनही या खटल्यात नेहरू सरकारला संघाच्या एकाही स्वयंसेवकाला गोवण्यात यश आले नाही ही महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

 

गांधी हत्येनंतर काँग्रेसच्या लोकांनी निष्कारण त्याचा संघाशी संबंध जोडला व त्यामुळे अनेक संघ स्वयंसेवकांवर हल्ले झाले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, आयुष्यभर  अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधींच्या तथाकथित अनुयायांनी, वेचून-वेचून ब्राह्मणांच्या घरांवर हल्ले केले, त्यांना आगी लावल्या, कित्येकांच्या तोंडाला डांबर फासून गाढवावरून त्यांची धिंड काढण्यात आली. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक गावातील ब्राह्मण कुटुंबे आपला जीव वाचवण्यासाठी कायमची गाव सोडून दूर निघून गेली ती आजपर्यंत परतली देखील नाहीत. ज्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर शिखांचा नरसंहार करण्यात आला तसाच गांधी हत्येनंतर ब्राह्मणांचा नरसंहार  करण्यात आला. टोकाच्या द्वेषाची व जातीय विचारसरणी असलेल्या काँग्रेसने आजपर्यंत ब्राह्मणांच्या या नरसंहाराबद्दल ना खेद व्यक्त केला, ना खंत व्यक्त केली. माफी मागणे तर दूरच.

 

नेहरू सरकारने संघावर बंदी आणताच, या बंदीचा गुरुजींनी केवळ स्वीकारच केला नाही तर ५ फेब्रुवारीला संघ तात्पुरता विसर्जित करून कायद्याने स्थापन झालेल्या नेहरू सरकारला सहकार्य करण्याचीच भूमिका घेतली. गुरुजींचा हा निर्णय त्यांच्या अद्वितीय नेतृत्वगुणांचा, दूरदृष्टीचा व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा परिचय देणारा होता. त्यावेळी संघ स्वयंसेवकांना उद्देशून काढलेल्या पत्रात गुरुजी म्हणतात की सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही नीती राहिली आहे की सर्व सरकारी नियमांचे पालन करूनच आपण आपले कार्य करावे. संघावरील बंदी मागे घेतली जाईपर्यंत संघ विसर्जित करणे मला योग्य वाटते. परंतु याचबरोबर मी असे सांगू इच्छितो की सरकारने संघावर जे आरोप लावले आहेत ते मला मुळीच मान्य नाहीत”. केवळ सात दिवसातच नेहरू सरकारला केलेली चूक लक्षात आली व गांधीहत्ये संदर्भातील गुरुजींवर लावलेले आरोप बिनशर्त मागे घेण्यात आले. नेहरु व त्यांचे चेले-चपाटे तोंडावर आपटले.

 

गुरुजींचा व संघाचा गांधीहत्तेशी काहीही संबंध नाही हे सरकारने ताबडतोब कबूल केले. परंतु आपली ही चूक  लपवण्यासाठी, ‘गीर गया तो भी टांग उपया म्हणीला अनुसरून कोणतेही कारण नसताना गुरुजींना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली सहा महिन्यांसाठी तुरुंगात ठेवण्याचा आदेश पारित करण्यात आला. ८ ऑगस्ट १९४८ रोजी गुरुजींच्या अटकेचे सहा महिने पूर्ण झाले व गुरुजींची कारागृहातून सुटका करण्यात आली. पण त्याचवेळी गुरुजींवर अनेक बंधने घालण्यात आली. नागपूरच्या बाहेर जायचे नाही, सार्वजनिक सभेत भाषण करायचे नाही व वर्तमानपत्रात लेख लिहायचे नाहीत अशा विचित्र व अस्वीकारहार्य अटी घालण्यात आल्या. परंतु जनमताच्या प्रचंड रेट्यापुढे नेहरू सरकारला झुकावे लागले व दीड-दोन महिन्यातच गुरुजींवरील सारे निर्बंध मागे घेण्यात आले. नेहरु व त्यांचे चेले-चपाटे पुन्हा एकदा तोंडावर आपटले.

 

संघबंदीला विरोध म्हणून आपली बाजू मांडण्यासाठी गुरुजींनी अनेक पत्रे नेहरूंना व सरदार पटेलांना  लिहिली. नेहरूंना लिहिलेल्या कित्येक पत्रांना उत्तर देण्याचे सौजन्यही नेहरूंनी दाखवले नाही. परंतु सरदार पटेलांनी काही पत्रांना उत्तरे दिली व संघाला काँग्रेसमध्ये विसर्जित करण्याचा सल्ला दिला जो गुरुजींनी तडकाफडकी धुडकावून लावला. सरदार पटेल यांनी लिहिलेल्या काही पत्रात त्यांनी संघाचा गांधीहत्तेशी काहीही संबंध नाही हे कबूल केले परंतु नेहरूंच्या दबावाखाली संघावर असलेली बंदी काढून टाकण्यात त्यांना गृहमंत्री असूनही यश आले नाही हे मात्र खरे.


गुरुजींची कारागृहातून सुटका करण्यात आल्यानंतर सरदार पटेलांनी गुरुजींना नागपूरला परत जाण्याचा सल्ला दिला. तोही गुरुजींनी धुडकावून लावत दिल्लीमध्येच राहणे पसंत केले. ११ ऑगस्ट ९४८ ला नेहरूंना तर त्यानंतर तसेच पत्र त्यांनी सरदार पटेलांना लिहिले व संघावरील बंदी हटविण्याची मागणी केली. परंतु संघबंदी उठविणे र दूरच, त्याऐवजी आपल्याला पुन्हा अटक होऊ शकते याची कल्पना गुरुजींना आली होती. तसे जर झाले तर सविनय सत्याग्रहाशिवाय संघासमोर काहीही पर्याय नव्हता. म्हणून ९ डिसेंबरला गुरुजींनी संघाला देशव्यापी सत्याग्रहाची हाक दिली.

 

त्यावेळी त्यांनी संघ स्वयंसेवकांना पत्र लिहिले त्यात ते म्हणतात आपले कार्य श्रेष्ठ आहे, महान आहे व ईश्वरीय आहे. ते करणे हा मानवी धर्माचा अत्युच्च अविष्कार आहे. हे कार्य म्हणजेच भगवंताचा साक्षात्कार आहे. यासाठी उठा आणि दहा महिने बंद पडलेले आपले संघ कार्य पुन्हा सुरू करा. हा धर्माचा अधर्माशी, न्यायाचा अन्यायाशी, विशालतेचा शूद्रतेशी व स्नेहाचा दुष्ट प्रवृत्तीची असलेला संघर्ष आहे. आपला विजय निश्चित आहे. कारण जिथे धर्म असतो तिथे देव असतो व जिथे देव असतो तिथे विजय असतो. त्यामुळे भारतमातेचा जयजयकार करा व आपला लढा यशस्वी झाल्यावरच थांबा.’

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा