राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
सोमवार, १७ मार्च, २०२५
संघ आणि आणीबाणी - उत्तरार्ध
संघबंदीच्या या काळात संघाशी संलग्न अशा अनेक
संघटनांवर, काही घोषित तर काही अघोषित, बंदी आणण्यात आली होती. विश्व हिंदू परिषद,
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ
यासारख्या संघप्रणित संघटनांच्या नेत्यांना सुद्धा अटक करण्यात आली होती. संघाच्या व संघप्रणित संघटनांच्या कार्यालयांना टाळे लावण्यात आले होते. कित्येक कार्यकर्त्यांना जरी अटक झाली नव्हती तरी त्यांच्यावर
पोलिसांची पाळत ठेवण्यात आली होती. फोन टॅप केले जात होते. आलेली पत्रे उघडून, तपासून पाहिली जात होती.
संघस्वयंसेवकांच्या नातेवाईकांना व जवळच्या ओळखीच्या
कुटुंबीयांना सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी बोलावून त्रास दिला जात होता. या काळात संघाचे अनेक कार्यकर्ते भूमिगत राहून आणीबाणीला विरोध करण्याचे
काम करत होते. जनमत संघटित करत होते. या भूमिगत कार्यकर्त्यांमध्ये सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच
सध्याचे सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्यासहित असे
अनेक संघ स्वयंसेवक सामील होते.
या काळात संघाचे सर्वात महत्त्वाचे
योगदान म्हणजे संघस्वयंसेवकांनी देशाच्या अनेक भागात व विविध भाषेत चालू केलेली गुप्त
वर्तमानपत्रे. भारतातील प्रमुख वर्तमानपत्रांचे
मोठ्या प्रमाणात सेन्सॉरद्वारे नियंत्रण केलेले
असल्याने, गुप्त वृत्तपत्रे आणि पॅम्प्लेट्स अन-सेन्सॉरर्ड माहितीचे प्रमुख स्त्रोत बनली.
संघाचे स्वयंसेवक हे साहित्य लिहिणे, छापणे आणि वितरित
करणे यात आघाडीवर होते. देशभरात वैयक्तिक धोका पत्करून आणीबाणीच्या
दुष्परिणामाची माहिती लोकांपर्यंत जावी म्हणून चक्रमुद्रांकित (सायक्लोस्टाईल) मशिनवर छापलेली आणि हातोहात वितरीत केलेली विविध मासिके, पाक्षिक किंवा नियतकालिके प्रकाशित होऊ लागली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या
कार्यकर्त्यांनी साहजिकच धरपकड टाळण्यासाठी, छपाईची
ठिकाणे वारंवार बदलणे आणि वितरणासाठी विश्वसनीय संघस्वयंसेवकांचे नेटवर्क वापरणे याची
पूर्ण खबरदारी घेतली होती. सांकेतिक भाषेचा व
पूर्वनियोजित खाणाखुणा तसेच संकेतांचा वापर करून संघ
प्रचारकांनी संघस्वयंसेवकांशी संवाद आणि
समन्वय राखला. संघाची पाळीमुळे पाळेमुळे समाजात खोलवर रुजल्याचा खूप फायदाही झाला.
अगदी संघाशी संबंधित नसलेले सर्वसामान्य नागरिकही, संघाला
पाठिंबा देऊ लागले. एकंदरीत, तळागाळातील
संघाच्या प्रभावी सपोर्ट नेटवर्कमुळे संघाला तिची आणीबाणी विरुद्धची लढाई भूमिगत चळवळीमुळे
आणीबाणी संपेपर्यंत अखंडपणे चालू ठेवण्यात
ठेवण्यास मदत झाली, एवढेच नव्हे तर ज्येष्ठ पत्रकार
रामनाथ गोएंका यांच्या इंडियन एक्स्प्रेस या
वृत्तपत्राला तीव्र सेन्सॉरशिपचा सामना करावा लागला तेव्हा गुप्तपणे छापलेल्या इंडियन
एक्सप्रेसच्या अनधिकृत आवृत्या वाचकांपर्यंत पोहोचविणे संघाच्या या भूमिगत
कार्यकर्त्यांच्या या जाळ्यामुळे शक्य झाले.
आणीबाणीच्या काळात तुरुंगात
टाकल्यामुळे अनेक संघ स्वयंसेवकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योगधंदे बंद झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर
उपासमारीची पाळी आली. अनेक संघस्वयंसेवकांच्या मुलांना
आपले शिक्षण अर्धवट सोडून उपजीविकेचे साधन शोधण्यासाठी मिळेल ती नोकरी करावी लागली.
आणीबाणीच्या काळात संघाने विभिन्न
विचारांच्या पण आणीबाणी विरोधी पक्षांची संवाद साधत त्यांच्यात दुवा म्हणून काम
केले. जेव्हा जयप्रकाश नारायण यांनी आणीबाणीच्या विरोधात 'संपूर्ण क्रांती' ची हाक दिली तेव्हा संघ
स्वयंसेवकांनी वैचारिक मतभेद बाजूस सारून या चळवळीला पाठिंबा मिळवून देण्यासाठी
महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या १९ महिन्यात संघनेतृत्वाने तुरुंगात असताना विविध
पक्षांच्या व विभिन्न विचारांच्या अनेक नेत्यांची संवाद साधून त्यांच्यात एकजुटीची
भावना निर्माण केली व आणीबाणीला आपापसातील मतभेद विसरून एकसंघ पद्धतीने विरोध
करण्याची मानसिक तयार केली.
याचा परिणाम असा झाला की
आणीबाणीच्या १९ महिन्यानंतर इंदिराजींना त्यांच्या खुश-मस्कऱ्यांनी
सांगितले की सामान्य जनता आणीबाणीवर खुश आहे आणि त्यांचा तुमच्या नेतृत्वावर
विश्वास आहे. जर अशा वेळी आपण निवडणूक
घेतली तर काँग्रेस पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने निवडून येईल. खुश-मस्कऱ्यांच्या या सांगण्यावर विश्वास ठेवून १८ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधींनी
सार्वत्रिक निवडणुका घेण्याची ही घोषणा केली व बहुतेक सर्व राजबंद्यांची
तुरुंगातून सुटका केली. परंतु परिस्थिती अतिशय भिन्न होती ज्याची कल्पना ना इंदिरा गांधींना
होती ना तिचे सुपुत्र संजय गांधी, तत्कालीन संरक्षणमंत्री
बन्सीलाल किंवा तत्कालीन दूरसंचार मंत्री विद्याचरण शुक्ला या बदनाम त्रिकुटाला.
१८ जानेवारी १९७७ साली इंदिरा
गांधींनी निवडणुकीची घोषणा करताच तत्कालीन संघटना
काँग्रेस, भारतीय जनसंघ, स्वतंत्र पार्टी, भारतीय लोक दल, सोशलिस्ट पार्टी (जी पुढे प्रजा समाजवादी पार्टी व संयुक्त
समाजवादी पार्टी या दोन पक्षांत विभागली गेली) या प्रमुख
तसेच अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनी एकत्र येत जनता पार्टीची स्थापना केली व आपापले
पक्ष जनता पार्टीत विलीन केले. सर्वानुमते जनता पार्टीचे
नेतृत्व लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी करण्याचे ठरविले. त्यांच्या
नेतृत्वाखालील जनता पार्टीने १९७७ च्या निवडणुकीमध्ये इंदिरा गांधींच्या
काँग्रेसचा दारुण पराभव केला व जनता पार्टी संपूर्ण
बहुमत घेऊन विजयी झाली. स्वतः इंदिरा गांधी व त्यांचे पुत्र संजय गांधी यांचा
त्यांच्या परंपरागत मतदार संघात पराभव झाला व त्यानंतर २४ मार्च १९७७ रोजी जनता पार्टीच्या व पहिल्या बिगर काँग्रेसी
सरकारचा शपथविधी पार पडला. मोरारजी देसाई यांनी पंतप्रधान म्हणून तर जुन्या भारतीय जनसंघाचे अटल
बिहारी वाजपेयी यांनी परराष्ट्र मंत्री, लाल कृष्ण आडवाणी यांनी माहिती व प्रसारण मंत्री तर सिकंदर भक्त यांनी गृहनिर्माण मंत्री म्हणून
शपथ घेतली.
संविधानाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडवून
कोणत्याही परिस्थितीत सत्ता सोडायची नाही या हव्यासापोटी न्यायालयाने दिलेल्या
निर्णयाला केराची टोपली दाखवत सत्तेची मस्ती आलेल्या अनिर्बंध इंदिरा गांधींनी
स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हा काळाकुट्ट इतिहास लिहून आपल्या सत्तालोलुप वृत्तीचे दर्शन घडविले. पण त्याचवेळी संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या व लोकशाहीला मानणाऱ्या
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लाखो स्वयंसेवकांनी त्यागाचे, बलिदानाचे व समर्पणाचे एक मोठे उदाहरण जगासमोर घालून दिले. त्यांच्यामुळेच १९ महिन्याच्या लढ्यानंतर भारताला पुन्हा एकदा
लोकशाहीचा सूर्योदय पाहत आला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा