राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

सोमवार, १० मार्च, २०२५

 संघाची संरचना

 

संघाची कार्यपद्धती जशी आगळी-वेगळी आहे तशीच संघाची संरचना सुद्धा आगळी-वेगळी आहे. स्वयंसेवक ते सरसंघचालक या दोन अतिमहत्त्वाच्या घटकाना खालून-वर तसेच वरून-खाली जोडणारी संघाच्या संरचनेची साखळी मुळापासून समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

वाडी-वस्तीमध्ये लागणारी संघशाखा ही संघस्वयंसेवकांना एकत्र करणारी संघ संरचनेची पाहिली पायरी आहे तर संघातील सर्वोच्च निर्णय घेणारी अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही संघ संरचनेतील अंतिम पायरी आहे. संघाने संघशाखा ते अखिल भारतीय प्रतिनिधी सभा या दोन शेवटच्या टोकांवर असलेल्या पायऱ्यांना अतिशय साध्या परंतु प्रभावी पद्धतीने जोडले आहे. त्यात संघ शाखेनंतर वस्ती किंवा ग्राम, भाग किंवा तालुका, नगर किंवा जिल्हा, विभाग, प्रांत, क्षेत्र असे विस्तारित जाणारे कार्यक्षेत्र व त्या कार्यक्षेत्रात काम करणाऱ्या संघाच्या अधिकाऱ्यांची विशिष्ट जबाबदारी देऊन केलेली नेमणूक व नेमणुकीची पद्धत महत्त्वाची आहे.

 

सर्वसाधारणपणे आठ ते दहा हजार लोकवस्तीचा भाग तयार करून त्याला वस्ती किंवा ग्राम असे संबोधण्यात येते. त्याच्या प्रमुखाला वस्तीप्रमुख किंवा ग्रामप्रमुखअसे म्हटले जाते.  सोयीप्रमाणे या वस्त्यांमध्ये अनेक शाखा लावण्यात येतात. प्रत्येक शाखेच्या मुख्य स्वयंसेवकाला शाखा कार्यवाह म्हटले जाते, ज्याच्यावर संपूर्ण शाखेची जबाबदारी असते.  दररोज शाखेत उपस्थित राहून शाखेतील दैनंदिन कार्यक्रम करण्याची ज्या स्वयंसेवकाची जबाबदारी असते त्याला मुख्यशिक्षक असे म्हटले जाते. साधारणपणे शाळेत जाणाऱ्या बाल स्वयंसेवकांसाठीमहाविद्यालयामध्ये जाणाऱ्या युवा स्वयंसेवकांसाठी४० वर्षापर्यंतच्या नोकरी, शेती किंवा व्यवसाय करणाऱ्या तरुण स्वयंसेवकांसाठी व ४० वर्षाहून अधिक य असलेल्या प्रौढ स्वयंसेवकांसाठी वेगवेगळ्या शाखा लावणे अपेक्षित आहे. पण हे न जमल्यास सर्वजण एकत्र येऊनही संयुक्त शाखा लावू शकतात.

 

सात ते दहा वस्त्यांचा मिळून शहरात नगरतर ग्रामीण भागात तालुका तयार होतो. अशा नगराच्या प्रमुखाला नगर संघचालक व त्याला मदत करण्यासाठी  जो स्वयंसेवक  जबाबदारी घेतो त्याला सह नगरसंघचालक असे म्हणतात.  त्याचप्रमाणे  नगराचे दैनंदिन  कामकाज पाहण्यासाठी नगर कार्यवाह व त्याच्या जोडीला सह नगरकार्यवाह नेमले जातात. बौद्धिक प्रमुख, शारीरिक प्रमुख, व्यवस्था प्रमुख, सेवाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रचार प्रमुख, बाल स्वयंसेवक प्रमुख, व्यवसाय स्वयंसेवक प्रमुख, महाविद्यालयीन विद्यार्थी स्वयंसेवक प्रमुख अशी त्या-त्या क्षेत्रात काम करण्यासाठी स्वयंसेवकांवर जबाबदारी दिली जाते. अशाप्रकारे साधारणपणे १३  जणांची समिती त्या-त्या नगरात किंवा तालुक्यात चालणाऱ्या संघकार्यास जबाबदार असते. प्रत्येक नगरात किंवा तालुक्यात संघाचे पूर्णवेळ काम करण्यासाठी पूर्णवेळ प्रचारकाची नियुक्ती केली जाते त्याला ‘नगर प्रचारक किंवा तालुका प्रचारक असे म्हणतात. प्रचारकाचे मुख्य काम हे संघ वाढविणे हे असून त्याच्या दिलेल्या कार्यक्षेत्रात नवीन स्वयंसेवकांना जोडणेनवीन कुटुंबांना जोडणेशाखेच्या संख्येत वाढ करणेसंघाने घेतलेले वेगवेगळे विषय व कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचविणे व आपल्या कार्यक्षेत्रात राबवणे हे आहे.

 

शहरी भागात सात ते दहा नगरांचा एक भागतर ग्रामीण भागात सात ते दहा तालुक्यांचा एक जिल्हा तयार होतो व त्यातही संघकार्य करण्यासाठी अगदी आधी सांगितल्याप्रमाणे व नगर किंवा तालुक्याला असते काहीशी तशीच संरचना केली जाते. या विस्तारित क्षेत्रात असलेल्या पूर्णवेळ प्रचारकाला भाग प्रचारक किंवा जिल्हा प्रचारक असे म्हणतात.

 

दोन ते तीन जिल्ह्यांचा किंवा भागांचा एक विभाग तयार होतो व या विभागात असलेल्या पूर्णवेळ प्रचारकाला विभाग प्रचारक असे म्हणतात. सहा ते नऊ विभागांचा एक प्रांत तयार होतो व या प्रांतात असलेल्या पूर्णवेळ प्रचारकाला प्रांत प्रचारक असे म्हणतात.

 

दोन ते तीन प्रांत एकत्रित करून त्यांना क्षेत्र असे संबोधले जाते ज्यामध्ये क्षेत्र प्रचारक या नावाने ओळखला जाणारा ज्येष्ठ संघस्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ काम करीत असतो. नगर वा तालुका, भाग वा जिल्हाविभाग, प्रांत, क्षेत्र असो, संघाची संरचना तालुका किंवा नगरामध्ये असलेल्या संरचनेसारखीच असते.

 

संघाच्या या उभ्या म्हणजेच व्हर्टिकल ऑर्गनायझेशन बरोबरच संघाची आडवी म्हणजेच हॉरीझोंटल ऑर्गनायझेशन देखील संघटना बांधणीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असते. वेगवेगळ्या विषयांवर त्या - त्या विषयांमध्ये अधिक रुची असणारे, प्रशिक्षित व पारंगत असे संघस्वयंसेवक संघाचे बौद्धिक, शारीरिक, व्यवस्था, सेवा, संपर्क व प्रचार आदी विषय हाताळतात. त्यांना अनुक्रमे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख’, अखिल भारतीय शारीरिक प्रमुख’, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख’, अखिल भारतीय सेवा प्रमुख’, अखिल भारतीय संपर्कप्रमुखअखिल भारतीय प्रचार प्रमुख असे म्हटले जाते. आपल्या दिलेल्या विषयांसाठी नगर किंवा तालुक्यापासून अगदी क्षेत्रापर्यंत त्या-त्या विषयाशी संबंधित संघस्वयंसेवकांची निवड करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी जबाबदारीचे वाटप करणे हे अखिल भारतीय प्रमुखाचे काम असते.

 

सर्वसाधारणपणे नगरापासूनच्या प्रांतापर्यंत संघाच्या जबाबदाऱ्यांची मुदत ही तीन वर्षापर्यंतच मर्यादीत असते.  र तीन वर्षानंतर अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत जबाबदाऱ्यांमध्ये गरजेनुसार बदल केले जातात. याचबरोबर याच सभेत एका स्वयंसेवकाची सरकार्यवाह म्हणून निवड होते व त्याच्या जोडीला सहसरकार्यवाह’, आदी एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारी पदाधिकाऱ्यांची निवड केली जाते.  तसेच अखिल भारतीय स्तरावर बौद्धिक, शारीरिक, व्यवस्था, सेवा, संपर्क व प्रचार प्रमुख ही निवडले जातात. पदाधिकारी निवडीची ही संपूर्ण प्रक्रिया अतिशय लोकशाही पद्धतीने, सर्वांच्या संमतीने व उघडपणे केली जाते.

 

प्रतिनिधी सभेने निवडलेल्या सरकार्यवाह, सहसरकार्यवाह तसेच अखिल भारतीय स्तरावर बौद्धिक, शारीरिक, व्यवस्था, सेवा, संपर्क व प्रचार प्रमुख आदी पदाधिकाऱ्यांची व काही महत्वाचे निमंत्रित अशा सुमारे ६० जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी बनते. या कार्यकारिणीला संघाचे धोरण ठरविण्याचे अधिकार असतात. कार्यकारिणीत प्रत्येक विषयांवर सांगोपांग चर्चा होते व नंतर त्या धोरणाची सरसंघचालक अथवा सरकार्यवाह यांच्यापैकी एकाकडून घोषणा केली जाते. दरवर्षी होणाऱ्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत वेगवेगळ्या विषयांवरील ठराव पारित होतात ज्यांच्या पूर्ततेसाठी पुढील वर्षातील संपूर्ण कार्यक्रम ठरविला जातो ज्यात सहसा बदल केला जात नाही.  हा संपूर्ण कार्यक्रम एकदा ठरला की अगदी वाडी-वस्तीपर्यंत तो पोहोचविण्याची व अमलात आणण्याची संघाची क्षमता ही जशी संघाने निर्माण केलेल्या या अद्वितीय संघटन साखळीमध्ये आहे तशीच ती ध्येयासक्तीने भारलेल्या, संघसमर्पित स्वयंसेवकांमुळे ही आहे. आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा अपवाद वगळता गुरुजींपासून अगदी सद्य सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवतांपर्यंत सर्वांनीच सरसंघचालक म्हणून जबाबदारी घेण्याआधी संघातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून आपले वक्तृत्व, कर्तृत्व व नेतृत्व गुण सिद्ध केले व त्यामुळेच की काय आद्य सरसंघचालकांना अपेक्षित असलेले संघकार्य त्यांच्या हातून यशस्वीपणे घडत गेले.

 

ज्याप्रमाणे सुरेख वस्त्र विणत असताना कुशल विणकर अतिशय काळजीपूर्वक उभ्या व आडव्या धाग्यांचा उपयोग करतो, ज्याला ताना-बाना असेही म्हणता, तशाच प्रकारे उभ्या व आडव्या संघटन पद्धतीचा संघाने सुरेख मेळ घालून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सातत्याने वाढणारी १०० वर्ष जुनी अभेद्य संघटना उभी केली आहे.  संघाच्या या अद्वितीय संघटन कौशल्याचा जगाच्या अनेक महाविद्यालयात अभ्यास होत आहे व त्यावर कित्येकांनी  संशोधन करून विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट ही पदवी ही प्राप्त केली आहे.

२ टिप्पण्या: