राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
शुक्रवार, ४ एप्रिल, २०२५
धुर्त
राजकारणी किती कोलांट्या उड्या मारतात याचा स्पष्ट पुरावा आता बाहेर येणार होता. महंत अवैद्यनाथ यांच्या कणखर भूमिकेमुळे संपूर्ण यंत्रणाच नव्हे तर
सरकारही दृढमग्न होऊन गेले. त्यांनी जेथे शिलान्यास होणार
होता त्या जागेचा नकाशा मागवून घेतला व मोजमाप करण्याचे नाटक केले. आपले काही चालत नाही हे लक्षात आल्यानंतर
बुटासिंग यांनी ‘महंतजी,
मोजमापात चूक झालेली दिसते. तुम्ही जिथे शिलान्यास करू
पाहताय तो भूखंड न्यायालयाने विवादास्पद ठरवलेल्या भूखंड क्रमांक ५८६ च्या बाहेर आहे. तुम्ही तिथे शिलान्यास करू शकता’ अशी
कोलांटीउडी मारली. यावरूनच याआधी सरकार किती खोटं बोलत होतं
हे सिद्ध झालं.
येन-केन-प्रकारेण शिलान्यासाचा
कार्यक्रम हाणून पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस सरकारला आपला पराभव मान्य
करावा लागला व विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने ९ नोव्हेंबर १९८९ ला महंत
अवैद्यनाथ, पुज्य वामदेव, महंत रामचंद्र दास
इत्यादींच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. त्याच्या
दुसऱ्या दिवशी सकाळी साडेनऊच्या शुभमुहूर्तावर गोरक्ष पीठाधीश्वर महंत अवैद्यनाथजी यांच्या हस्ते पाया खणला गेला. त्यानंतर बिहारचे दलित रामभक्त संत कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते प्रचंड
घोषणात व शंखाच्या निनादात विधीपूर्वक शिलान्यास करण्यात आला. हा शिलान्यास केवळ श्रीरामजन्मभूमी मंदिराचाच नव्हता तर ५००० वर्षे पुरातन अशा हिंदू संस्कृतीच्या पुनर्स्थापनेचा होता. सामाजिक समता, ममता, बंधुभाव
व समरसतेचा शिलान्यास होता.
याप्रसंगी संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी एक भावपूर्ण संदेश लिहिला
त्यात ते म्हणतात की ‘राष्ट्राचे महानायक प्रभू
श्रीरामाच्या मंदिराची पुनर्स्थापना करण्यासाठी,
त्याचप्रमाणे श्रीरामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी गेल्या अनेक शतकात ज्यांनी बलिदान
दिले त्या लाखो हिंदू हुतात्म्यांचे या शुभप्रसंगी मी स्मरण करतो. १०
नोव्हेंबरला झालेला शिलान्यास हे शतकानूशतके चालत आलेल्या हिंदूंच्या
संघर्षशीलतेचे द्योतक आहे. ज्याप्रमाणे सोमनाथ मंदिराचा
पुनरुद्धार आपल्या राष्ट्रीय गौरवाचे प्रतीक झाले त्याचप्रमाणे श्रीरामजन्मभूमी मुक्ती
ही आपल्या राष्ट्रीय गौरवाची पुनर्स्थापनाच आहे’.
शिलान्यासाच्या या कार्यक्रम समयी संघाचे सहकार्यवाह हो.वे.शेषाद्री उपस्थित होते.
त्यावेळी ते म्हणाले की ‘हा काही सामान्य मंदिराच्या
निर्मितीचा कार्यक्रम नाही तर
राष्ट्रीय अवमानाचे परिमार्जन व आपल्या राष्ट्रीय अस्मितेला पुन्हा जागृत करण्याचे
एक अनुष्ठानच आहे. शिलान्यास तर झालाच पण पायातील शिला
आता मंदिर शिखराच्या त्या कळसाची वाट पाहत आहेत जो कळस भारतीय जीवनदर्शनाचे स्वरूप
असेल. ज्याच्या प्रकाशात मानवता आपल्या जीवन उद्देशांचे
प्रकट रूप पाहू शकेल’. संघाचे सरकार्यवाह
रज्जूभैया म्हणाले की
‘श्रीराम जन्मभूमीवरील शिलान्यास हे राष्ट्रीय भावनांच्या
सफलतेचे प्रतिक आहे. त्यामुळे हेही आता स्पष्ट झाले आहे की
आता या देशात हिंदूंच्या भावनांचा अनादर करण्याचे दुस्साहस
कोणालाही करता येणार नाही’.
शिलान्यासानंतर
विश्व हिंदू परिषदेच्या पुढाकाराने २७-२८ जानेवारी १९९० रोजी प्रयाग येथे संतसंमेलन भरले होते व त्यात १४ फेब्रुवारीला मंदिराचे बांधकाम सुरू करावे असा निर्णय घेण्यात आला. याच सुमारास देशातील राजकीय परिस्थिती झपाट्याने बदलत होती. काँग्रेसचा पराभव होऊन व्हीपी सिंग यांचे आघाडीचे सरकार
अस्तित्वात आले होते. ते हिंदू नेत्यांकडे चर्चेसाठी
मुदतीहून मुदत मागत होते व प्रश्न लोंबकळत ठेवण्याचा प्रयत्न करत होते. हिंदू नेत्यांनी पंतप्रधान व्हीपी
सिंग यांना दिलेली चार महिन्यांची शेवटची मुदत ९ जूनला संपली आणि त्यानंतर २३-२४ जूनला हरिद्वार येथे संतसंमेलन भरले. या संमेलनात वेगवेगळ्या पिठांचे, पंथांचे व मतांचे ६६४ प्रमुख संत उपस्थित होते. या संमेलनात श्रीरामजन्मभूमीवरील श्रीराम मंदिराबद्दल देखील निर्णय घेण्यात आला.
२४ जूनला भरलेल्या विशाल हिंदू संमेलनाला संबोधित करताना विहिंपचे महामंत्री
अशोक सिंगल यांनी घोषणा केली की ‘३० ऑक्टोबर हा श्रीराम मंदिर उभारणीचा दिवस आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार
नाही. सरकारने लोकभावना लक्षात घेऊन सहकार्य करावे. या कालखंडात प्रत्येक गावातून किमान १ कारसेवक आपल्या गावच्या प्रमुखाचा आशीर्वाद व गावकऱ्यांच्या प्रेमाची शक्ती
घेऊन अयोध्येस येईल व असे एकूण ५,००,०००
कारसेवक देशातील विविध भागातून अयोध्येला थडकतील. सरकारने अडथळा आणला तर ते संघर्ष करतील. अटक झाली
किंवा गोळ्या खाव्या लागल्या तर त्याही खावू. संघर्षाच्या या कार्यक्रमात आम्ही
संतांच्या आज्ञांचे
पालन करू’. असेही त्यांनी
जाहीर केले. हे संमेलन संपताच २८ जून १९९० ला भाजपाचे
नेते लालकृष्ण आडवाणी यांनी ‘भाजपा सर्वशक्तीनिशी या आंदोलनात
उतरेल’ असे जाहीर केले. ‘जर सरकारने श्रीराममंदिर उभारणीच्या कार्यात
काही विघ्न आणले तर भारतात पूर्वी कधीच झाले नव्हते एवढे मोठे जनआंदोलन उभे राहील’ असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. मंदिर
उभारणीच्या कार्यात जर सरकारने अडथळे आणले किंवा बंदुकीचा वापर केला तर बलिदान
देण्यासाठी बजरंग दलाने ७०,००० बजरंगींची नोंदणी केली होती व बलिदानास
तयार असलेल्या २,५०,००० बजरंगींची नोंदणी करण्याची तयारी ठेवली होती.
देशभरातून आयोध्येमध्ये केवळ कारसेवक आणायचे नव्हते तर ते
ज्या गावातून येतात त्या गावात श्रीरामजन्मभूमी मुक्तीच्या अभियानाचे वातावरण तयार
करून जनमत संघटित करण्याचे व देशातील सारा हिंदू एक करण्याचे ध्येय होते. १ सप्टेंबर १९९० ला श्रीरामज्योत
प्रज्वलित करण्यात आली. मोरोपंत पिंगळे यांच्या हस्ते महंत श्रीविश्वनाथ दास शास्त्री
ब्रह्मचारी यांच्या आश्रमात हा सोहळा संपन्न झाला.
त्यानंतर स्वामी राम नारायणाचार्य यांनी श्रीरामज्योती सहित संकल्पित श्रीराममंदिर
स्थानी जाऊन तेथे रामलल्लाची आणि नंतर शिलान्यास झालेल्या जागेची पूजा केली. या श्रीरामज्योतीने प्रज्वलित झालेल्या ज्योती साऱ्या प्रांतातील
साऱ्या जिल्हा स्थानी पोहोचवून विजयादशमीला त्यांची भव्य विजययात्रा काढण्यात आली.
विजयादशमी ते दीपावलीच्या दरम्यान गावोगावी श्रीरामज्योती यात्रांचे आयोजन व
प्रत्येक हिंदू बांधवाने या ज्योतीवरून आपल्या घरातील ज्योत प्रज्वलित करून या
यात्रेची सांगता करावी असा एक हिंदूमिलनाचा, जन-जागरणाचा अनोखा कार्यक्रम राबविण्यात आला. हा कार्यक्रम राबविण्यासाठी
संघाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपली वैयक्तिक कामे बाजूला ठेवून यात भाग घेतला.
शिलापूजनाप्रमाणेच या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी गावोगावी
प्रवास केला. अयोध्येवरून आलेल्या श्रीरामज्योतीला
गावोगावी पोहोचवणे व तेथून ती ज्योत पुन्हा अयोध्येला पोहोचवणे हा महत्त्वकांक्षी
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संघाच्या असंख्य स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. यादरम्यान आचार्य धर्मेंद्रजी, साध्वी
ऋतुंबरा यांच्या सभांनी देशभर वातावरण तयार केले.
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर मुंबईहून निघालेली
श्रीरामज्योत २३ सप्टेंबर १९९० ला नाशिकच्या प्रसिद्ध काळाराम
मंदिरात आली. या मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांना भूतकाळात सत्याग्रह करावा लागला होता. त्या सत्याग्रहात भाग
घेतलेल्या रंभाजी पगारे, देवराम डांगळे व शंकरराव लोखंडे
या दलित बांधवांनी सहकुटुंब येऊन श्रीरामज्योतीचे पूजन केले. श्रीरामज्योतीने देशभर समरसतेची ज्योत पेटवली. एकावेळी श्रीरामज्योत यात्रा देशातील अनेक
ठिकाणी निघत होत्या तर त्याच दरम्यान १२ सप्टेंबर १९९० ला भाजपचे नेते लालकृष्ण आडवाणी
यांनी भारतीय जनसंघाच्या द्वितीय अध्यक्ष पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या
जन्मदिनापासून म्हणजेच २५ सप्टेंबर
पासून ते ३० ऑक्टोबर दरम्यान सोमनाथ ते आयोध्या अशी
रथयात्रा निघेल व भाजपचे १०० हून अधिक खासदार व ६०० हून अधिक आमदार कारसेवेत भाग घेतील असे
जाहीर केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा