राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
गुरुवार, १७ एप्रिल, २०२५
२९ तारखेला महंत
नृत्यगोपाल दासांना अटक करण्यासाठी पोलीस आले. महंतानी त्यांना विनंती केली की ‘आज कशाला अटक करता. उदया शिलान्यासाला मी ज्यावेळी
निघेन त्यावेळी तुम्ही मला अटक करा.’ पण पोलीस ऐकायला तयार
नव्हते. अशावेळी असंख्य कारसेवक जमा झाले व ते मुलायम सरकार
विरोधात जोरदार घोषणाबाजी करू लागले. गोंधळ एवढा वाढला की
पोलिसांनाही काय करावे ते कळत नव्हते. अशावेळी छत्रपती
शिवाजी महाराजांना आपले दैवत मानणाऱ्या महंत नृत्यगोपाल दासांनी ज्याप्रमाणे
छत्रपतींनी आग्र्याहून आपली सुटका करून घेतली तशीच या गोंधळाचा फायदा घेत त्यांनी
पोलिसांच्या बंदोबस्तातून
नाट्यमय रीतीने आपली सुटका करून घेतली. तिथून ते जे निसटले ते शिलान्यासाच्या
दिवशी ३० तारखेलाच प्रकटले.
एवढा प्रचंड बंदोबस्त असताना आणि एकही कारसेवक अयोध्येत
प्रवेश करू शकतच नाही याची खात्री असताना ३० ऑक्टोबरला कारसेवा होणारच नाही
याच्याबद्दल कारसेवक सोडून सर्वांनाच
खात्री होती. त्या दिवशी
सकाळी सगळीकडे शांतता होती. ९ वाजून ४४ मिनिटांनी कारसेवेचा मुहूर्त
होता अशा वेळी ९ वाजून १० मिनिटे झाली आणि मणीराम
छावणीचा दरवाजा उघडून विहिंपचे सरचिटणीस अशोक सिंहल आपल्या
सोबत चार-पाच कारसेवक घेऊन
बाहेर पडले. तेथून ते
समोरच्या वाल्मिकी रामायण भावनात गेले. नंतर पाचच मिनिटांनी
महंत नृत्यगोपाल दास, स्वामी वामदेव,
विवेकानंदजी महाराज, साक्षीजी महाराज आदी संत वाल्मिकी
रामायण भावनात आले, त्यांच्या मागे हजारो कारसेवक होते.
साधुसंतांना व अशोक सिंहलना रस्त्यावर पाहताच गल्लीबोळातून
कारसेवक प्रगट होऊ लागले. कालपर्यंत कुठेच दिसत नसलेले हे कारसेवक कुठे लपून बसले
होते याची कुणालाच कल्पना नव्हती. बघता बघता कारसेवकांची संख्या लाखांवर गेली. ते पाहून पोलिसांचा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता.
कोणीही लाठीमाराला दाद देत नव्हते. कारसेवा थांबवा व
कारसेवकांना मागे घ्या अशी विनंती पोलीस अधिकाऱ्यांनी महंत नृत्यगोपाल दास यांना
केली. या दरम्यान एक नाट्यमय घटना घडली. हनुमान गढीजवळ उभ्या असलेल्या राखीव पोलिसांच्या एका बसचा ताबा धरमदास
पहिलवान नावाच्या एका साधूने घेतला. अनेक कारसेवकांना घेऊन
ती बस पोलिसांनी रचलेले अडथळे तोडत भरधाव निघाली. त्यामुळे सर्व रस्ता साफ झाला. जन्मभूमीचा परिसर कारसेवकांनी भरून गेला.
काय होतंय ते कुणालाच कळत नव्हतं. यानंतर काही क्षणातच कित्येक कारसेवक त्या जीर्ण इमारतीवर
चढले व त्यांनी तिथे भगवा ध्वज फडकवला. हे पाहताच गहिवरून
आलेले कित्येक पोलीस आपली ड्युटी विसरून कारसेवेत
सहभागी झाले. डीआयजी गिरीधर शर्मा यांचीही आज्ञा कोणी पाळेनासे झाले. जिल्हा पोलीस
अधीक्षक सुभाष जोशी चार-पाच पोलिसांना कसेबसे घेऊन आले. त्यांनी घुमटावर चढलेल्या काही कारसेवकांचा
गोळ्या झाडून खून केला. पण त्याने कोणीही डगमगले नाही. हनुमानगढी जवळ अशोक सिंहल पोलीस हल्ल्यात
जखमी झाले. त्यांचे डोके
फुटले. भळाभळा रक्त वाहू लागले.
त्यामुळे त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले. या
कारसेवेच्या प्रसंगात बारा कारसेवक हुतात्मा झाले. ‘खून देंगे, प्राणही देंगे, लेकीन मंदिर वही
बनायेंगे’ ही घोषणा
कारसेवकांनी सत्यात उतरवून दाखवली.
३० ऑक्टोबरला मिळालेल्या या
पहिल्या विजयानंतर कारसेवकांमध्ये अमाप उत्साह संचारला. ३१ ऑक्टोबर हा विश्रांतीचा दिवस
होता. १ नोव्हेंबरला संध्याकाळी ५०,००० कारसेवकांपुढे
अशोक सिंहल यांचे भाषण झाले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजता रामलल्लाच्या दर्शनासाठी दोन्ही हात वर
करून रामनामाचे भजन करत जायचे आहे असा संदेश दिला. त्याप्रमाणे दोन नोव्हेंबरला सकाळी ९ वाजता मणीराम दास छावणी बाहेर
सुमारे ५०,००० कारसेवक तयार होते. परंतु कारसेवकांना कोणत्याही परिस्थितीत
रोखायचे असा चंगच मुलायमसिंगांनी बांधला होता. त्यामुळे जनरल डायरला सुद्धा लाजवेल अशा
अमानुष रीतीने मुलायमसिंहांनी पोलिसांना त्यांच्यावर प्रसंगी गोळीबार करा पण
त्यांना पांगवा असा आदेश दिला. कोणतीही पूर्वसूचना न देता कारसेवकांवर आधी अश्रुधुराचा मारा करण्यात
आला व त्यानंतर चहूबाजूंनी पोलिसांनी गोळीबार सुरू केला.
यावेळी दुकानात शिरलेल्या एका कारसेवकाला चक्क खेचून बाहेर
काढण्यात आले व त्याच्या
डोक्यात पॉईंट ब्लॅक गोळी झाडून ठार करण्यात आले. त्याला वाचवायला आलेल्या त्याच्या भावालाही
पोलिसांनी निर्दयतेने ठार मारले. रामकुमार आणि शरद हे दोन
कोठारी बंधू जय श्रीराम म्हणत हुतात्मा झाले. त्यांच्या आत्म्याची अमर ज्योत अखंडपणे या
देशाला बलिदानाची व समर्पणाची आठवण देत राहील. पुढे दोनच महिन्यांनी ज्यावेळी अशोक
सिंहल त्यांच्या मात्यापित्यांचे सांत्वन करण्याकरता कलकत्ता येथे पोहोचले तेव्हा
वीरगतीला प्राप्त झालेल्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांनी न खचता पुढील कारसेवेत
स्वतः सहभागी होण्याचा निर्णय अशोक सिंहल यांना बोलून
दाखवला. यावरून कारसेवेचा पगडा
सर्वसामान्य माणसांत किती होता हे लक्षात येते. पोलिसांच्या या गोळीबारात शेकडो कारसेवक
हुतात्मे झाले. ते जिवंत आहेत की नाहीत याची शहानिशा
न करता पोलिसांनी त्यांना शरयू नदीत फेकून दिले. शरयू नदी रक्ताने लाल झाली. याआधी श्रीरामजन्मभूमी
मुक्तीसाठी हिंदूंनी ७६ युद्ध केली पण ही सारी युद्धे
मुघलांविरुद्ध होती. परंतु हे युद्ध सर्वस्वी वेगळे होते. निशस्त्र
रामसेवकांनी केलेल्या सत्याग्रहाला चिरडून टाकण्यासाठी आपलेच हिंदू बांधव त्यांना
ठार मारत होते. पोलिसांच्या व मुलायमसिंहच्या या
अत्याचारांची काळीकुट्ट नोंद पुढील हजारो वर्षे इतिहास पुढील हजारो वर्षे ठेवेल हे
निश्चित.
एकीकडे पुराव्यांची लढाई चालू असतानाच श्रीरामजन्मभूमीसाठी ६ डिसेंबर १९९० ला सुरू झालेला सत्याग्रह १४ जानेवारी १९९१ ला संपला. या ४० दिवसात ३ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी
सहभाग घेतला. यात ३५ हजाराहून अधिक महिला होत्या. १९९१ च्या वर्ष प्रतिपदेला घराघरावर
भगवे ध्वज फडकवण्याचा व २४ मार्चच्या श्रीरामनवमीला ठीकठिकाणी श्रीरामाच्या मिरवणुका
काढण्याचाही निर्णय घेण्यात आला. मुलायम सरकारने या मिरवणुकांवरही बंदी आणण्याचा
निर्णय घेतला. परंतु या
घटनाबाह्य आदेशाला धुडकावून मिरवणुका घेण्यात येतील व आंदोलन करण्यात येईल असा
इशारा विहिंपचे महामंत्री अशोक सिंहल यांनी दिला. त्यामुळे घाबरलेल्या मुलायम सरकारने हे
आदेश मागे घेतले. नुसत्याच उत्तर प्रदेशातच नव्हे तर अशा
प्रकारचे आदेश देशाच्या अनेक ठिकाणी पोलिसांनी दिले होते. परंतु जसजसा हिंदू संघटित होत होता ते
पाहून पोलिसांना असे असंविधानिक आदेश मागे घेण्यापासून पर्याय उरत नव्हता.
२-३ एप्रिल १९९१ ला विहिंपने दिल्ली येथील
तालकटोरा स्टेडियमवर चौथ्या धर्मसंसदेचे आयोजन केले. यात ६ हजाराहून अधिक धर्माचार्य व
साधुसंत एकत्र आले होते. ४ प्रमुख पीठांचे शंकराचार्यही मंचावर उपस्थित होते. ४ एप्रिलला बोट क्लबवर अतिविशाल
महामेळावा संपन्न झाला. ज्यात २५ लाख लोक उपस्थित होते. या महामेळाव्यात अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी सहित संघाच्या
नेत्यांची भाषणे झाली. दिवस निवडणुकांचे होते. निवडणूक प्रचारा दरम्यान दुर्दैवाने राजीव गांधी
यांची हत्या झाली व त्या सहानुभूतीचा फायदा मिळवून अल्प मतातील पीव्ही नरसिंहराव
यांचे सरकार दिल्लीत तर मुलायमसिंह यादव यांचा धुव्वा उडवत भाजपच्या कल्याण सिंहाचे
सरकार उत्तर प्रदेशमध्ये आले. त्यानंतर ताबडतोब चक्रे फिरली व १० ऑक्टोबरला कल्याणसिंह सरकारने श्रीरामजन्मभूमी
जवळील २.७७ एकर जमीन
सरकारच्या ताब्यात घेतली. याचा फायदा असा झाला की यामुळे
विवादित वास्तूचा व मंदिर मंदिराच्या
बांधकामाचा परस्परांशी
असलेला संबंध तुटला.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा